scorecardresearch

विश्लेषण: ANT ग्रुपमधून जॅक मा पायउतार, चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रासमोरची आव्हानं काय?

अब्जाधीश जॅक मा यांना ANT ग्रुपमधून पायउतार व्हावं लागलं आहे, सरकारविरोधात बोलल्याने त्यांना हा फटका बसला आहे

विश्लेषण: ANT ग्रुपमधून जॅक मा पायउतार, चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रासमोरची आव्हानं काय?
जॅक मा यांना ANT ग्रुपमधून पायउतार व्हावं लागलं आहे

ANT या चीनमधल्या सर्वात मोठ्या ग्रुपमधले सर्वात मोठे दिग्गज आणि अब्जाधीस जॅक मा पदावरून पायउतार झाल्यात जमा आहेत. २०२० च्या उत्तरार्धात चीनमधल्या टेक कंपन्यांवर केलेल्या अभूतपूर्व कारवाईनंतर मा यांना पायउतार व्हावं लागणार हे उघड होतं तेच नेमकं घडलं आहे. अलीबाबा आणि ANT ग्रुपचे या दोन प्रभावशाली कंपन्यांचं नियंत्रण जॅक मा यांना सोडावं लागलं आहे.

२०२० मध्ये काय घडलं?

२०२० मध्ये चिनी अधिकाऱ्यांनी ANT ग्रुपला त्यांचे ब्लॉकबस्टर इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) हे लिस्ट होण्याच्या ४८ तास आधी थांबवण्यास भाग पाडले होते. हा जॅक मा आणि चीन सरकार यांच्यातील संघर्षाचा कडेलोट झाला. एवढंच काय अलीबाबाने त्यांच्या वर्चस्वाचा वापर केल्याने त्यांना २.८ अब्ज डॉलर्सचा भलामोठा दंडही ठोठावला गेला. जॅक मा यांच्या बाबतच्या या घटना विशेषतः २०१९ नंतर घडत गेल्या. जॅक मा यांनी चिनी बँकिंग नियमकांवर ते Pawn Shops सारखे वागत असल्याची टीका केली. त्यानंतर आपलं आता काही खरं नाही असं वाटलं असल्याने जॅक मा एकाएकी चीनमधून गायबही झाले. त्यानंतर ANT ग्रुपची पुनर्रचना, चीनमधल्या महत्त्वाच्या टेक कंपन्यांवर कारवाई हे सगळं का झालं त्याची उत्तरं या प्रसंगांचा विचार केला तर मिळतात.

ANT ग्रुपमध्ये काय बदल झाला?

शनिवारी ANT ग्रुपने एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की यापुढे जॅक मा यांचं कुठलंही नियंत्रण असणार नाही. नव्या बदलांच्या नंतर ANT मध्ये मतदानाचे ५० टक्के अधिकार जे जॅक मा यांच्याकडे होते ते थेट ६ टक्क्यांवर आले. पुनर्चना आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं ANT ग्रुपने म्हटलं आहे.

ANT ग्रुप हा चीनमधलं एक अत्यंत महत्त्वाचं अॅप Alipay चालवतं. ज्याचे १ अब्जापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. या निवेदनात पुढे असं म्हटलं गेलं आहे की जॅक मा आणि त्यांचे नऊ प्रमुख शेअर होल्डर्स यांनी मतदानाचा अधिकार वापरताना एकत्र न राहण्याचे मान्य केलं आहे. त्यामुळे यापुढे ANT ग्रुपवर कुठल्याही एका व्यक्तीचे नियंत्रण असणार नाही. तसंच ते संयुक्तही असणार नाही.

या बदलांनंतर काय होईल?

या बदलानंतर ANT ग्रुपच्या आयपीओला पुनरूज्जीवीत करता येईल. मात्र चीनमधल्या कायद्याचा विचार केला तर लिस्टिंग होणं तीन वर्षे थांबवावं लागणार आहे. कारण अशा प्रकारचे बदल कंपनीत झाल्यानंतर चीमधील कायद्यानुसार त्या ग्रुपला तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. तशीच ती ANT ग्रुपलाही करावी लागणार आहे.

चीनने तंत्रज्ञान क्षेत्रावर कारवाई का केली?

२०२० च्या उत्तरार्धात चीनने एक बहु आयामी कारवाईला सुरूवात केली. अविश्वास चाचण्या आणि नियमांमध्ये बदल हे सूत्र त्यांनी कारवाईसाठी वापरलं. याचा परिणाम उद्योगांच्या श्रेणीवर झाला तसंच स्टार्ट अप्स आणि जुन्या समूहांसाठी अनिश्चिततेची टांगती तलवार निर्माण झाली. अलीबाबा, टेनसेंट, होल्डिंग्ज आणि मीटुआन यांसारख्या स्थानिक पण दिग्गज टेक कंपन्यांना दोषी ठरवलं गेलं. कंपन्यांची ध्येयं धोरणं काय आहेत? निर्णय कसे घेतले जातात? हे उघड करण्यास भाग पाडले गेले. याचा परिणाम असा झाला की अलीबाबा आणि मीटुआन या दोन कंपन्यांना आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल अनुक्रमे २.७५ अब्ज डॉलर्स आणि ५२७ दशलक्ष डॉलर्स इतका दंड ठोठावण्यात आला. टेनसेंट कंपनीलाही कॉपीराइट करारांमध्ये प्रवेश करण्यापासून मनाई करण्यात आली.

गेमिंग कंपन्यांनाही कारवाईचा फटका

अनेक गेमिंग कंपन्यांनाही कारवाईचा फटका याच कालावधीत बसला. चीनने १८ वर्षांखालील मुलांना गेम खेळण्यासाठी शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीचा दिवस असे वार ठरवले. तसंच गेम खेळण्याचा कालावधी फक्त एक तास देण्यात आला. एवढंच काय चीन सरकारने सुमारे सहा ते सात महिने पब्लिशिंग लायन्ससवरही बंदी घातली होती. त्यामुळे १ हजाराहून अधिक गेमिंग कंपन्या बुडीत खाती गेल्या.

मागच्या वर्षी जून महिन्यात काय घडलं?

मागच्या वर्षी जून महिन्यात चीन सायबर सुरक्षा नियमाच्या अंतर्गत DD Chuxing ने न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज मध्ये पदार्पण केल्यानंतर नव्या युजर्सना साइन अप करण्यापासून प्रतिबंधित केलं. तसंच चीनमधल्या अॅप स्टोर्सना २५ मोबाइल अॅप्स हटवण्याचे आदेश दिले.

कोण आहेत जॅक मा? त्यांना कंपनीने का हटवलं?

चीन मधून अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या तुकडीचे प्रतिनिधी जॅक मा होते. चीनमधून अनेक मुलं आजही अमेरिकेला जात असतात. या सगळ्यांनी चीनमध्ये परत यावं यासाठी चीन सरकारकडून केला जातो. असाच अमेरिकेतून शिकून परत आलेला उत्साही मुलगा होता जॅक मा. अमेरिकेत असताना अॅमेझॉनचं सगळं स्वरूप जॅक मा यांनी पाहिलं. असंच काही आपण आपल्या देशात सुरू करू शकतो का? हे स्वप्न जॅक मा यांनी उराशी बाळगलं होतं. चीन मध्ये आल्यानंतर त्यांनी आपलं स्वप्न अलीबाबाच्या रूपाने पूर्ण केलं. अॅमेझॉनला टक्कर देणारं समांतर साम्राज्य म्हणून अलीबाबाचा चीनमध्ये उदय झाला.

सत्ताधाऱ्यांविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करणं जॅक मा यांना भोवलं?

मात्र पुढच्या कालखंडात जॅक मा यांची चिनी राजव्यवस्थेबाबत नाराजी निर्माण झाली. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविषयी काही अनुद्गार बोलला. ते अनुद्गार काय होते ते समोर आलेलं नाही. मात्र शी जिनपिंग यांच्याबाबत वक्तव्य केल्याने जॅक मा यांचे ग्रह फिरले. प्रचंड मोठ्या आर्थिक साम्राज्याचे कर्तेधर्ते असलेले जॅक मा गायब झाले. मधले सहा महिने ते विविध ठिकाणी आहेत अशा बातम्या येत होत्या. जॅक मा हे कधी जपान किंवा कधी हाँगकाँग या ठिकाणी आहेत असंही कानावर येत राहिलं. चिनी व्यवस्था आपल्या माणसांना ते जगात कुठेही गेले तरीही सापळ्यात अडकवतेच. त्यामुळे जॅक मा हेदेखील अशाच प्रकारे सापळ्यात अडकतील हे उघड होतं. त्यामुळे चीन सरकारला खास करून शी जिनपिंग यांना जॅक मा डोळ्यात खुपत होते त्यांनी उभं केलेलं साम्राज्य नाही. त्यामुळे जॅक मा यांना ग्रुपमधून काढण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू होते. राजसत्तेपुढे उद्योजकाची हार असं आज ANT ग्रुपने घेतलेल्या निर्णयाचं वर्णन करता येईल. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 21:35 IST

संबंधित बातम्या