कुठल्याही देशाची, प्रांताची प्रगती ही तिथल्या राजकीय इच्छाशक्तीवर तसेच आर्थिक व्यवस्थेवर अवलंबून असते. या दोन्ही व्यवस्था हातात हात घालून प्रवास करतात. यापैकी एक व्यवस्था ढासळली तरी त्या प्रांताची किंवा देशाची अधोगती निश्चित असते. आणि हेच सिद्ध करणारी एक घटना भारतीय इतिहासात इसवीसनाच्या १८ व्या शतकात घडली. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि इतिहास हा समृद्ध होता. ही समृद्धी केवळ सांस्कृतिक अर्थाने नसून यात आर्थिक सुबत्तादेखील समाविष्ट होती. सिंधू संस्कृतीच्या काळापासून किंवा त्या आधीही भारताचे व्यापारी संबंध इतर युरोपीय तसेच आशियाई देशांशी होते. परंतु कालांतराने राजकीय अस्थिरता, परकीय आक्रमणे, आणि व्यापाराचा ऱ्हास यामुळे भारताची पीछेहाट झाल्याचे इतिहासातून लक्षात येते. तरीही अशा असामान्य परिस्थितीत काही भारतीयांनी हातात काहीही नसताना जागतिक व्यापारावर आपली छाप उमटवली होती. त्याच परंपरेतील नावाजलेले भारतीय व्यापारी घराणे म्हणजे ‘जगत सेठ’. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून बंगालमधील या घराण्याने जागतिक बँकिंगच्या क्षेत्रात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.

कोण होते हे ‘जगत सेठ’ घराणे ?

जगत सेठ हे असे एक घराणे आहे, ज्यांची एकूण संपत्ती १८ व्या शतकात अंदाजे ८.३ लाख कोटी रुपये इतकी होती, किंबहुना त्यापेक्षा जास्तच. त्यांची इतिहासातील ओळख जागतिक दर्जाचे बँकर्स अशी आहे. त्यांचा आर्थिक पराक्रम इतका अफाट होता की, त्यांनी मुघल आणि ब्रिटिश अशा दोघांनाही कर्ज दिले होते. त्यामुळेच त्यांची इतिहासात विशेष दखल घेतली जाते. किंबहुना त्यांची तुलना युरोपातील १७ व्या शतकातील बँकिंग क्षेत्रातील प्रसिद्ध घराणे ‘रोथस्चाइल्ड’ यांच्याशी केली जाते. ‘रोथस्चाइल्ड’ (Rothschild) मूळचे फ्रँकफर्ट येथील एक श्रीमंत अश्केनाझी ज्यू कुटुंब होते. Rothschild या कौटुंबिक बँकिंग व्यावसायकांनी युरोपच्या औद्योगिकीकरणादरम्यान आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा मोठ्याप्रमाणावर केला तसेच जगभरातील रेल्वे प्रणालींना आर्थिक पाठिंबा आणि सुएझ कालव्यासारख्या प्रकल्पांसाठी जटिल सरकारी वित्तपुरवठा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अशा स्वरूपाची कामगिरी भारतीय ‘जगत सेठ’ घराण्याने केल्याचे इतिहासात नमूद आहे. मूलतः हे घराणे; या घराण्यातील १८ व्या शतकातील समृद्ध बँकर ‘फतेह चंद’ यांच्या कर्तृत्त्वामुळे अधिक नावारूपास आले होते. त्यांना मुघलांकडून ” जगत सेठ ” ही पदवी प्रदान करण्यात आली होती, असे असले तरी एकूणच या व्यापारी घराण्याची पाळेमुळे इसवी सनाच्या १६ व्या- १७ व्या शतकापर्यंत मागे जातात.

Narayana Murthy Success Story
Success Story : एकेकाळी नोकरीसाठी मिळाला नकार; जिद्दीने उभी केली स्वतःची कंपनी अन् उभारला हजारो कोटींचा व्यवसाय
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
Gold and silver prices fell, Lakshmi Pujan, Gold price,
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीचे दर घसरले; असे आहेत आजचे दर
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
Prepaid rickshaw booth at Pune railway station closed due to traffic police
ऐन दिवाळीत प्रवाशांची लूट! वाहतूक पोलिसांमुळे पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रीपेड रिक्षा बूथ बंद

अधिक वाचा : हिंदू राजांनी प्राचीन भारतातील बौद्ध वास्तू नष्ट केल्या होत्या का?

‘जगत सेठ’ घराण्याचा पूर्वेतिहास -हिरानंद साहू

एकेकाळी बंगालच्या अर्थव्यवस्थेवर वर्चस्व गाजवणाऱ्या आणि भारतातील मारवाडी उद्योगाची पायाभरणी करणाऱ्या जगत सेठ यांच्या कथेची सुरुवात हिरानंद साहू यांच्यापासून होते. ते दागिन्यांचे प्रसिद्ध व्यापारी होते आणि नंतर सावकार झाले, हिरानंद साहू हे मूळचे राजस्थानमधील नागौरचे रहिवासी होते. त्यांनी १६५० च्या सुमारास नागौर सोडले असे परंपरागत चालत आलेल्या माहितीनुसार सांगितले जाते. एका जैन संताच्या आशीर्वादाने ते अधिक चांगल्या संधींचा शोध घेत पाटणा येथे येवून पोहोचले,आज पाटणा हे आर्थिकदृष्ट्या मागास असले तरी त्याकाळी ते एक समृद्ध शहर आणि महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र होते. हिरानंद साहू यांनी पाटण्यात येवून सावकारी आणि बँकिंग व्यवसाय सुरु केला.

माणिक चंद

हिरानंद साहू लवकर भरभराटीला आले आणि सतराव्या शतकात आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना इतर शहरांमध्ये पाठविले. कौटुंबिक बँकिंग नेटवर्कचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांनी माणिक चंद या त्यांच्या मुलाला तत्कालीन बंगालची राजधानी असलेल्या ढाक्का येथे पाठवले. मक्केशी होत असलेल्या कापूस, अफू आणि रेशमाच्या व्यापारासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध होते. त्यांच्या सर्व मुलांपैकी माणिक चंद यांनी आपले कर्तृत्त्व सिद्ध केले. या प्रक्रियेत, त्याने बंगालचा सम्राट तसेच औरंगजेबाने नियुक्त केलेला दिवाण मुर्शिद कुली खान याच्याशी मैत्री करून आपला आर्थिक प्रभाव वाढवला. माणिक चंद यांनी आपल्या वडिलांनी पायाभरणी केलेल्या व्यवसायाचा पाठपुरवठा केला. त्यांनी त्यावेळेच्या नवाब शासकाशी संपर्क वाढविल्याने, ते राज्याच्या बँकर आणि आर्थिक सल्लागाराच्या पदावर स्थानपन्न झाले. त्यांची आर्थिक गणिते इतकी पक्की होती की आर्थिक बाबतीत त्यांचा सल्ला घेण्यासाठी मुघल सम्राट आणि व्यापारी त्यांच्या भेटीसाठी येत.

सेठ झाले नगरसेठ

असे असले तरी, दिवाण मुर्शिद कुली खान याला आपल्या मित्राला दिलेली सवलत महागात पडली, तत्कालीन बंगाल, बिहार आणि ओडिशा प्रांताचा तत्कालीन सुभेदार अझीम-उश-शान, म्हणजेच औरंगजेबाचा नातू याने १७०४ मध्ये मुर्शिद कुली खान याची बदली मुर्शिदाबाद येथे केली. म्हणूनच माणिक चंद यांनीही आपले स्थळ आपल्या प्रिय मित्रासाठी ढाक्याहून हलविले आणि मुर्शिदाबाद येथे नेले. माणिक चंद यांनी मुर्शिदाबाद येथे स्थलांतरित झाल्यावर महिमापूर येथे एक प्रासादिक निवासस्थान उभारले जे आजतागायत उभे आहे. प्रत्यक्षात, माणिक चंद हे त्या प्रांताचे कर गोळा करणारे आणि खजिनदार झाले.त्यांनी आणि मुर्शिद कुली खान याने एकत्रितपणे नवीन शहर विकसित करण्याचा संकल्प केला; ज्याचे नाव मुर्शिद कुली खानने स्वतःच्या नावावर मुर्शिदाबाद ठेवले होते. माणिक सेठ यांनी या प्रक्रियेत मोठी रक्कम खर्च केल्याचे संदर्भ इतिहासात सापडतात. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेत आलेल्या दिल्लीच्या सम्राट फारुक सियारने माणिक चंद यांना १७१२ साली त्यांचे काम पाहून ” नगरसेठ ” ही पदवी बहाल केली.

जगतसेठ फतेह चंद

१७१४ मध्ये माणिक चंद यांच्या निधनानंतर त्यांचा पुतण्या आणि दत्तक पुत्र फतेह चंद याने कौटुंबिक व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. त्याच्या चतुरस्त्र मार्गदर्शनाखाली जगतसेठ कुटुंबाने खूप प्रसिद्धी मिळवली. त्यांचा प्रभाव ईस्ट इंडिया कंपनीसोबतच्या व्यवहारापर्यंत विस्तारला, त्यात कर्जे आणि मौल्यवान धातूंच्या व्यापाराचा समावेश होता. त्यांचे कर्तृत्त्व इतके मोठे होते की, १७२३ मध्ये सम्राट महमूद शाहने त्यांना ‘जगतसेठ’ ही पदवी बहाल केली. आणि त्यानंतर हे संपूर्ण घराणे त्याच पदवीने ओळखले जावू लागले. प्रख्यात ब्रिटिश इतिहासकार रॉबर्ट ऑर्मे यांनी हिंदू व्यापारी कुटुंबाला मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत आणि मुस्लिम मुर्शिदाबाद सरकारवर बऱ्यापैकी प्रभाव पाडणारे म्हणून चित्रित केले आहे. रॉबर्ट ऑर्मे हे भारतातील ब्रिटिश इतिहासकार होते. मूलतः ते ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या डॉक्टर आणि सर्जनचे सुपुत्र होते. ते १७४३ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत बंगाल येथे ते रुजू झाले. १७६० मध्ये ते इंग्लंडला परतले आणि १७६९ मध्ये त्यांची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये इतिहासकार म्हणून नियुक्ती झाली होती. ऑर्मे यांनी अ हिस्ट्री ऑफ द मिलिटरी ट्रान्सॅक्शन्स ऑप द ब्रिटिश नेशन इन इन्दोस्तान फ्रॉम १७४५ (१७६३-७८), हिस्टॉरिकल फ्रॅगमेंटस् ऑफ द मुघल एम्पायर, द मराठाज अॅण्ड इंग्लिश कन्सर्न्स इन इन्दोस्तान फ्रॉम द इअर १६५९ (१७८२) ही पुस्तके लिहिली यातूनच जगत सेठ आणि तत्कालीन बंगाल सरकार आणि इंग्रज यांच्यातील संबंधांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

जगतसेठ फतेह चंद यांचा आर्थिक पराक्रम

महत्त्वाचे म्हणजे फतेह चंद यांच्या काळात जगत सेठ कुटुंबाचे व्यावसायिक कामकाज ‘बँक ऑफ इंग्लंड’ला टक्कर देत होते. त्यांनी बंगाल सरकारसाठी महसूल संकलन आणि सार्वजनिक निधीचे व्यवस्थापन यासह बहुआयामी भूमिका पार पाडल्या. शिवाय, त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी नाणी पाडली, शिवाय यात परकीय चलन हाताळणे समाविष्ट होते, ज्यामुळे त्यांची संपत्ती आणखी वाढली. १७२० च्या दशकात जगतसेठ कुटुंबाच्या संपत्तीने ब्रिटीश अर्थव्यवस्थेलाही ग्रहण लावले होते असे दिसून येते. त्यांची होल्डिंग्स आजच्या चलनात तब्बल $१ ट्रिलियन (अंदाजे रु. ८,३१,२४,१५,००,००,०००) असण्याचा अंदाज आहे. ब्रिटीश इतिहासकारांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांची आर्थिक संसाधने इंग्लंडमधील सर्व बँकांच्या एकत्रित तिजोरीपेक्षा जास्त होती.

नाणी पाडली, टांकसाळी घेतल्या

फतेह चंद यांच्या काळात या घराण्याने मुर्शिदाबादचे नवाब आणि दिल्लीचे मुघल सम्राट या दोघांच्याही जवळीकीचा आनंद लुटला. या काळात बंगाल व्यापारात अग्रेसर होते, त्यामुळे येथील व्यापारावर अधिपत्य गाजविण्याची चढाओढ डच, फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात सुरु होती. त्याच कालखंडात मुर्शिद कुली खानच्या मृत्यूनंतर, मुर्शिदाबाद आणि ढाका येथील टांकसाळी हळूहळू फतेहचंद यांच्या ताब्यात आल्या, त्यामुळे फतेहचंद जगतसेठचे घर नवाबाचा खजिना म्हणून काम करत होते आणि मुर्शिदाबादच्या नवाबाच्या प्रभावाखालील भौगोलिक क्षेत्रात फतेहचंद जगतसेठचे घर मध्यवर्ती बँकेप्रमाणेच कार्यरत होते. या मध्यवर्ती बँकेने जमीनदारांना कर्ज दिले, व्याज गोळा केले, सराफा व्यवहार केला, राज्य तसेच परकीय व्यापार्‍यांसाठी नाणी पाडली, व्यापारासाठी वित्तपुरवठा केला, पैशांची देवाणघेवाण केली, विनिमय दर नियंत्रित केले, विस्तृत हुंडी चालविली, नवाबाच्या वतीने बंगाल-बिहार-ओडिशा प्रांतातील दोन तृतीयांश महसूल संकलित केला, बादशहाला पैसे पाठवले.

इंग्रज, डच आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपन्यांसह त्या काळातील सर्वात मोठ्या व्यापारी घराण्यांनी फतेहचंद यांच्यासह चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपभोगलेल्या मक्तेदारीमुळे आणि त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, फतेहचंद हे जगतसेठांपैकी सर्वात प्रतिष्ठित, शक्तिशाली आणि प्रभावशाली होते. १७४४ मध्ये फतेहचंद यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा नातू माधब राय याने पुढचा जगतसेठ म्हणून पदभार स्वीकारला, तर त्याचा चुलत भाऊ स्वरूप चंद यांना ‘महाराजा’ ही पदवी बहाल करण्यात आली होती.

अधिक वाचा : विश्लेषण: प्राणी का ठरतात मानवी वासनेचे बळी? काय आहे झूफिलिया आणि बेस्टीयालीटी?

फतेहचंद यांच्यानंतर …

१७४४ साली तत्कालीन नवाब अलीवर्दी खानच्या कारकिर्दीत, महताब चंद आणि त्याचा चुलत भाऊ महाराज स्वरूप चंद या दोघांचाही बंगालच्या आर्थिक व्यवस्थेवर लक्षणीय प्रभाव होता. ईस्ट इंडिया कंपनीचे इतिहासकार रॉबर्ट ओर्मे यांच्या मते, माधब राय जगतसेठ हे ज्ञात जगातील त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. १७५६ मध्ये अलीवर्दी खानची कारकीर्द त्याच्या मृत्यूने संपुष्टात आली. त्याला कोणताही पुरुष वारस नसल्यामुळे त्याचा नातू सिराज-उद-दौला हा वयाच्या २३ व्या वर्षी बंगालचा नवाब झाला. सिराज-उद-दौला आणि जगत सेठ घराणे यांच्यात आधीच्या नवाबांप्रमाणे सख्य होवू शकले नाही. त्यामुळे सिराज-उद-दौलाला पदच्युत करण्यासाठी जगत सेठ घराण्याने त्याचा लष्कर प्रमुख मीर जाफर याच्याशी हात मिळवणी केली. मीर जाफर, जगतसेठ आणि इतर व्यापारी यांनी इंग्रजांसोबत संगतमत करून सिराज-उद-दौला याचा पाडाव केला. मीर जाफर नंतर मीर कासीम हा सत्तेत आला. त्याने बंगालची बिघडलेली स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पराभवानंतर, प्लासीच्या लढाईत जगतसेठांनी घेतलेल्या विश्वासघातकी भूमिकेमुळे संतप्त होऊन, त्याने माधब राय आणि स्वरूप चंद या दोघांचीही हत्या केली आणि त्यांचे मृतदेह (बिहारमधील) मोंघायर किल्ल्याच्या तटबंदीवरून फेकून दिले. पुढे इंग्रजांचे राज्य आल्यानंतर या घराण्याचे प्रस्थ कमी झाले आणि यथावकाश इतिहासातील त्यांचे अस्तित्त्व नाहीसे झाले.

एकूणच राजकीय आणि आर्थिक इच्छाशक्ती एकमेकांसाठी पूरक असतात, यातील एक तरी गोष्ट पदभ्रष्ट झाली तरी त्या प्रांताची घडी बिघडते, हेच जगत सेठ घराणे आणि बंगालचा नवाब यांच्यातील द्वंद्व सांगते, याच द्वंद्वामुळे इंग्रजांसारख्या धूर्त शक्तीला बंगालमध्ये पर्यायाने भारतात आपली मुहूर्तमेढ अधिक घट्ट करणे शक्य झाले, हे कटू सत्य आहे.