-अन्वय सावंत

कतार येथे सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल नोंदवले गेले आहेत. यापैकी दोन निकाल हे आशियाई संघ जपानने नोंदवले. जपानने साखळी फेरीत जर्मनी आणि स्पेन या माजी विश्वविजेत्या संघांवर मात केली होती. त्यांच्या या कामगिरीची संपूर्ण जगभर दखल घेतली गेली. तसेच या दोन विजयांच्या बळावर जपानला चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठणे शक्य झाले. मात्र, उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यात त्यांना पुन्हा अपयश आले. नियमित वेळ आणि अतिरिक्त वेळेनंतरच्या १-१ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जपानचा ३-१ असा पराभव केला. त्यामुळे जपानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. मात्र, जपानने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्यांच्या या यशामागे काय कारण होते आणि भविष्यात या संघाची वाटचाल कशी असू शकेल याचा आढावा.

जपानला अपेक्षित यश मिळाले का?

विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणे हे आमचे लक्ष्य असल्याचे जपानचे प्रशिक्षक हाजिमे मोरियासू या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी म्हणाले होते. त्यांना हे लक्ष्य गाठता आले नाही. मात्र, जपानच्या संघाची एकंदर कामगिरी आणि या संघाने केलेल्या प्रगतीने मोरियासू नक्कीच समाधानी असतील. विश्वचषकासाठी जपानचा स्पेन, जर्मनी आणि कोस्टा रिकासह ई-गटात समावेश होता. संभाव्य विजेत्यांच्या यादीत स्पेन आणि जर्मनीचे नाव असल्याने जपानचा संघ या गटातून बाद फेरी गाठेल अशी फार कोणाला अपेक्षा नव्हती. मात्र, जपानने पहिल्याच सामन्यात जर्मनीचा २-१ असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना कोस्टा रिकाने ०-१ असे नमवले. परंतु तिसऱ्या सामन्यात जपानने पुन्हा खेळ उंचावत स्पेनला २-१ असा धक्का देत गटात अग्रस्थान पटकावले.

जपानच्या कामगिरीचे वैशिष्ट्य काय?

जपानने यंदाच्या विश्वचषकात हार न मानण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवले. जर्मनी आणि स्पेनविरुद्धच्या साखळी सामन्यांत जपानचा संघ मध्यंतराला पिछाडीवर होता. मात्र, उत्तरार्धात त्यांनी दमदार पुनरागमन करताना दोन्ही सामने जिंकले. जर्मनीने गोल करण्याच्या बऱ्याच संधी निर्माण केल्या. परंतु जपानचा गोलरक्षक शुइची गोंडाने अप्रतिम कामगिरी करताना जर्मनीला एकपेक्षा अधिक गोलची आघाडी मिळणार नाही, हे सुनिश्चित केले. मग बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेल्या रित्सु डोआन आणि टाकुमा असानो यांनी गोल करत जपानला अनपेक्षित विजय मिळवून दिला. स्पेनवरील विजयातही डोआनचा गोल आणि गोंडाचे गोलरक्षण निर्णायक ठरले. जपानने भक्कम बचावही केला. तसेच कतारमधील उष्ण वातावरणात जपानच्या मध्यरक्षकांची उर्जाही वाखाणण्याजोगी होती. प्रशिक्षक मोरियासू यांनी केलेली संघाची रचना आणि अचूक योजना हेसुद्धा जपानच्या यशामागील एक कारण होते.

नक्की वाचा >> विश्लेषण: FIFA वर्ल्ड कपवर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय?

स्थानिक लीगचे यश जपानसाठी किती महत्त्वपूर्ण?

जपानच्या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. जपानचा संघ १९९८मध्ये पहिल्यांदा विश्वचषकात खेळला. त्यानंतर सात पैकी चार पर्वांमध्ये (२००२, २०१०, २०१८, २०२२) जपानला उपउपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. जपानच्या या सातत्यपूर्ण यशात जे-लीग या देशांतर्गत फुटबॉल स्पर्धेचे योगदान महत्त्वाचे आहे. ३० वर्षांपूर्वी या लीगला सुरुवात झाली, त्यावेळी यात केवळ १० संघांचा सहभाग होता. त्यानंतर जपानच्या फुटबॉल संघटनेने प्रचंड मेहनत आणि उत्तम योजनेच्या जोरावर संघांची संख्या १० वरून ६० वर नेली. या संघांना तीन विभागांमध्ये (डिव्हिजन : जे१, जे२, जे३ लीग) विभागण्यात आले. जे-लीगमध्ये झिको, डुंगा, रामोन डियाझ, गॅरी लिनेकर, फर्नांडो टोरेस, डेव्हिड व्हिया यांसारखे नामांकित खेळाडू खेळले. तसेच २०१०च्या विश्वविजेत्या स्पेनच्या संघातील मध्यरक्षक आंद्रेस इनिएस्टा सध्या जे१ लीगमधील व्हिसेल कोबे संघाकडून खेळत आहे. या जागतिक दर्जाच्या खेळाडूंसह खेळण्याचा अनुभवी जपानच्या युवा व स्थानिक खेळाडूंसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. तसेच बरेच जपानी खेळाडू जर्मनी, इंग्लंड, स्पेनमधील लीगमध्येही खेळत आहेत.

नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जपानची भविष्यातील वाटचाल कशी असेल?

जपानचे विश्वचषकातील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. मात्र, त्यांनी उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण केली आहे. जपानचा संघ आशियाई चषकासाठी पात्र ठरला असून त्यांनी यापूर्वी चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत कतार येथे होणार आहे. तसेच आशियात वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना युरोप आणि दक्षिण अमेरिकन देशांविरुद्ध सातत्याने सामने खेळण्याचा व विजय मिळवण्याचा जपानचा प्रयत्न असेल. रित्सु डोआन, काओरू मिटोमा आणि टाकेफुसा कुबो हे युवा खेळाडू आपल्या खेळात सामन्यागणिक सुधारणा करत राहतील अशी जपानला आशा असेल. या तिघांनीही विश्वचषकात प्रभावित केले. क्लब फुटबॉलमध्ये डोआन जर्मन संघ एससी फ्रायबर्ग, मिटोमा इंग्लिश संघ ब्रायटन, तर कुबो स्पॅनिश संघ रेयाल सोसियोदादचे प्रतिनिधित्व करतो. २०२६च्या पुढील विश्वचषकापूर्वी आणखी प्रतिभावान खेळाडूंना परदेशातील लीगमध्ये खेळण्याचा अनुभव मिळेल अशीही जपानला आशा असेल.