Japan breaks world internet speed: अशी कल्पना करा की तु्म्हाला नेटफ्लिक्सची पूर्ण लायब्ररी एका सेकंदात डाउनलोड करता आली आहे किंवा बफरिंगशिवाय एकाच वेळी लाखो व्हिडीओ सुरू करू शकलात तर… हे खरं तर फारच काल्पनिक वाटेल, मात्र जपानने जगाला या आगळ्यावेगळ्या शक्यतेची खरी झलक दाखवली आहे.

देशातील संशोधकांनी अलीकडेच आतापर्यंतच्या सर्वात वेगवान इंटरनेट स्पीडचा एक नवीन जागतिक विक्रम रचला आहे. १.०२ पेटाबिट्स प्रति सेकंद, ही स्पीड भारताच्या सरासरी इंटरनेट स्पीड ६३.५५ एमबीपीएसपेक्षा सुमारे १६ दशलक्ष पट वेगवान आणि अमेरिकेपेक्षा ३.५ दशलक्ष पट वेगवान आहेत. मात्र, याचा दैनंदिन वापर करणाऱ्यांसाठी नेमका फायदा काय? आणि जपानने इतका वेग कसा मिळवला, याबाबत जाणून घेऊ…

१.०२ पेटाबिट्स प्रति सेकंद म्हणजे किती वेगवान?

जपानने सांगितल्याप्रमाणे हे किती वेगवान आहे हे समजून घेण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक पेटाबिट म्हणजे दहा लाख गिगाबिट. संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जपानने प्रति सेकंद १.०२ पेटाबिट या अविश्वसनीय वेगाने डेटा ट्रान्सफर करून एक नवीन जागतिक विक्रम रचला आहे. याचाच अर्थ असा आहे की, एका सेकंदात १००,००० हून अधिक एचडी चित्रपट ट्रान्सफर करण्यासाठीचे सक्षम कनेक्शन आहे. संशोधकांच्या सिद्धांतानुसार, या वेगाने संपूर्ण नेटफ्लिक्स कॅटलॉग एका सेकंदात डाउनलोड होऊ शकतो. कॉल ऑफ ड्युटी-वॉरझोन गेमसारख्या १५० जीबी व्हिडीओ गेमच्या मोठ्या फाईल्स क्षणार्धात डाउनलोड केल्या जाऊ शकतात.
हे यश आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी क्रांतिकारी मानले जात आहे.

अनेक संगीत प्लॅटफॉर्मदेखील या प्रमाणात टिकू शकत नाहीत. स्पॉटिफायने म्हटल्याप्रमाणे, एका मिनिटाचा ऑडिओ अंदाजे १ एमबी इंटरनेट घेतो. जपानच्या नवीन गतीनुसार, तुम्ही एका सेकंदात ६ कोटी ७० लाख गाणी डाउनलोड करू शकता. म्हणजेच हे १ लाख २७ हजार वर्षांपेक्षा जास्त काळ सतत संगीत डाउनलोड करण्यासारखे आहे. ही उदाहरणं कल्पना करायला म्हणून मजेदार वाटत असली तरी खरा परिणाम तंत्रज्ञानाच्या भविष्यावर होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

क्लाउड कॉम्प्युटिंगपासून ते जनरेटिव्ह एआय, ऑटोनॉमस व्हेइकल्स आणि रिअल टाइम ट्रान्सलेशनपर्यंत ही सर्व तंत्रज्ञाने जलद आणि अखंडपणे चालणाऱ्या इंटरनेट डेटावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. अशा गतीसह डेटा सेंटर्स एकाच स्थानिक नेटवर्कचा भाग असल्यासारखे कार्य करू शकतात, त्यामुळे जागतिक एआय ऑपरेशन्स अधिक सक्षम होऊ शकतात.

जपानने हे यश कसे साध्य केले?

जपानच्या राष्ट्रीय माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान संस्थेने सुमितोमो इलेक्ट्रिक आणि युरोपियन सहयोगींच्या भागीदारीत हा विक्रमी वेग गाठला आहे. पारंपरिक ऑप्टिकल फायबरमध्ये फक्त एकच कोर असतो, जो डेटा ट्रान्सफर करतो. मात्र, जपानी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नवीन ऑप्टिकल फायबरमध्ये १९ स्वतंत्र कोर आहेत, म्हणजेच डेटासाठी १९ स्वतंत्र मार्ग. यामुळे केबलची जाडी वाढत नाही, मात्र डेटा क्षमता अनेक पटींनी वाढते. ही रचना इतकी कार्यक्षम आहे की सिग्नल लांब अंतरावर तीक्ष्ण आणि स्पष्ट राहू शकतो.
संशोधकांनी त्याचे वर्णन इंटरनेट ट्रॅफिकसाठी ‘१९-लेन सुपरहायवे’ असे केले आहे. म्हणजे जसे तुम्ही एका लेनच्या रस्त्यावरून १९ लेनच्या एक्स्प्रेसवेकडे जाता; एक अशी रचना जी विद्यमान पायाभूत सुविधांसह कार्यक्षमता वाढवते.

महत्त्वाचे मुद्दे :

  • एआयला मोठ्या प्रमाणात डेटा प्रक्रिया करावी लागते, ती जलद आणि अधिक कार्यक्षम होऊ शकते.
  • व्हर्च्युअल रिएलिटीचा अनुभव बफरिंगशिवाय येऊ शकतो, ज्यामुळे गेमिंग आणि मिटिंग्ज अधिक वास्तविक वाटतात.
  • स्मार्ट फ्रिजपासून ते कनेक्टेड कारपर्यंत सर्वांना जलद डेटा ट्रान्सफरची आवश्यकता असते.
  • या विक्रमी तंत्रज्ञानामुळे भविष्यात जलद इंटरनेट शक्य होईल

ऑप्टिकल फायबर केबल सुमितोमो इलेक्ट्रिकने विकसित केली आहे, तर डेटा ट्रान्समिशन सिस्टिम एनआयसीटीने त्यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाच्या सहकार्याने तयार केली आहे. लांब अंतरावर सिग्नल कमकुवत होण्याच्या नेहमीच्या समस्यांवर मात करण्यासाठी संशोधकांनी अत्याधुनिक प्रवर्धन प्रणालींचा वापर केला. या प्रणालींनी प्रगत सिग्नल प्रक्रिया तंत्रांचा वापर करून अनेक लाईट वेव्हलेंग्थमध्ये सिग्नल वाढवले. चाचणीच्या सेटअपमध्ये १९ फायबर लूप होते. प्रत्येक ८६.१ किमी लांबीचे, ज्यातून २१ वेळा सिग्नल पास करण्यात आला. यामुळे एकूण ट्रान्समिशनची लांबी १८०८ किमी झाली. यादरम्यान १८० वैयक्तिक डेटा स्ट्रीम रेकॉर्ड ब्रेकिंग वेगाने आणि स्थिरतेने पाठवण्यात आले.

हे दैनंदिन आयुष्यात कधी वापरता येईल?

दैनंदिन आयुष्यात हे लवकर वापरता येणारे नाही. सध्या ग्राहकांचे इंटरनेट टेराबिट स्पीडच्या जवळपासही पोहोचलेले नाही, त्यामुळे पेटाबिट स्पीड तर लांबच आहे. बहुतेक घरगुती कनेक्शन अजूनही मेगाबिट प्रति सेकंदाच्या श्रेणीत चालतात. असं असलं तरी या प्रगतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जगभरातील दूरसंचार कंपन्या, डेटा सेंटर ऑपरेटर आणि सरकार याकडे बारकाईने लक्ष देत आहेत. जपानने जे साध्य केले आहे ते पुढील पिढीच्या इंटरनेट पायाभूत सुविधांसाठी ब्लूप्रिंट ठरू शकते. त्यामध्ये समुद्राखालील केबल्स, राष्ट्रीय ब्रॉडबँड बॅकबोन आणि भविष्यातील ६जी नेटवर्कदेखील समाविष्ट आहेत. असा वेग दैनंदिन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे लागू शकतात. मात्र, याबाबतची दिशा स्पष्ट आहे. आपण अशा जगाकडे वाटचाल करत आहोत जिथे उच्च क्षमतेचे, विजेच्या वेगाने इंटरनेट वापरणे हे अपवाद नाही तर सामान्य बाब आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.