ब्रिटनमधील ॲस्ट्राझेनेका या औषधनिर्माण कंपनीने कोव्हिडवरील लस जगभरातील बाजारपेठांतून मागे घेण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने ब्रिटनमधील न्यायालयात या लशीच्या दुष्परिणामांबाबत कबुली दिल्यानंतर महिनाभरातच हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनीने ५ मे रोजी लस मागे घेण्यासाठी अर्ज केला होता. तो ७ मेपासून अमलात आला आहे. ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लशीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या नावाने केले होते. कोव्हिड संकटाच्या काळात सुरुवातीला हीच लस उपलब्ध होती. त्यामुळे जगभरात बहुसंख्य नागरिकांनी ही लस घेतली आहे. आता ही लस बाजारातून मागे घेण्यात येत असल्याने तिचा वापर बंद होणार आहे. याचबरोबर तिची जागा करोना विषाणूच्या नवीन उपप्रकारांवर परिणामकारक ठरणाऱ्या नवीन लशी घेणार आहेत.

कंपनीचे म्हणणे काय?

बाजारातून लस काढून घेण्यामागे व्यावसायिक कारण असल्याचे ‘ॲस्ट्राझेनेका’ने म्हटले आहे. युरोपीय समुदायातून कंपनीने स्वेच्छेने लशीचे विपणन अधिकार मागे घेतले आहेत. ही लस यापुढे उत्पादित केली जाणार नाही, तसेच तिचा वापर केला जाणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या बाजारात अनेक लशी उपलब्ध असून, त्यांचा मागणीपेक्षा अधिक साठा उपलब्ध असल्याने हे पाऊल उचलल्याचे कारणही कंपनीने दिले आहे. लशीमुळे होण्याची शक्यता असलेल्या ‘टीटीएस’ आजाराच्या दुष्परिणामामुळे ब्रिटनमध्ये ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कंपनीने या मृत्यूंचा कोव्हिशिल्ड लशीशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा >>>१९८० ची लोकसभा निवडणूक: जनता पार्टीचा अस्त, भाजपाचा उदय आणि इंदिरा गांधींचा मृत्यू

न्यायालयात कोणती माहिती?

ब्रिटनमधील न्यायालयात ॲस्ट्राझेनेका कंपनीविरुद्ध १० कोटी पौंडांचा खटला दाखल करण्यात आला आहे. कोव्हिशिल्ड लशीमुळे अनेक जणांचा मृत्यू आणि अनेक जण गंभीररीत्या आजारी पडल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी कंपनीने न्यायालयात अनेक कागदपत्रे सादर केली होती. त्यात लशीमुळे दुर्मीळ दुष्परिणाम होत असल्याचाही उल्लेख होता. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये लशीमुळे थ्रॉम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपिनिया सिंड्रोम (टीटीएस) हे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हटले होते.

टीटीएस म्हणजे काय?

थ्रॉम्बोसिस विथ थ्रोम्बोसायटोपिनिया सिंड्रोम (टीटीएस) हा एक दुर्मीळ विकार असून, त्यात रक्तात गुठळ्या होतात आणि प्लेटलेटचा स्तरही खालावतो. हा विकार प्रामुख्याने कोव्हिड लशीच्या दुष्परिणामांमुळे होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातही निष्क्रिय विषाणूचा वापर करून तयार केलेल्या लशींमुळे हा धोका अधिक निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यात ‘ॲस्ट्राझेनेका’ची कोविड लस आणि जॉन्सन अँड जॉन्सनची जॅनसेन लस यांचा समावेश आहे. ‘टीटीएस’ होण्याचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे समजू शकलेले नाही. शरीरात लशीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीच्या प्रतिसादामुळे हा विकार होत असावा आणि त्यातून रक्ताच्या गुठळ्या आणि प्लेटलेट नष्ट होण्याची क्रिया होत असावी, असा संशोधकांचा दावा आहे. ‘टीटीएस’चे नेमके निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या आवश्यक असतात.

हेही वाचा >>>परदेशातून पैसे पाठवण्यात भारतीय आघाडीवर, ‘इतके’ डॉलर पाठवून रचला नवा विक्रम

लसीकरणापासून किती काळ धोका?

लस घेतल्यानंतर पुढील काही आठवड्यांत ‘टीटीएस’चा धोका संभवतो. त्यात तीव्र डोकेदुखी, पोटदुखी, पायांना सूज, श्वसनास त्रास आणि भ्रमिष्टावस्था अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांवरून शरीराच्या वेगवेगळ्या भागांत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे प्राथमिक निदान करता येते. प्रामुख्याने मेंदू, पोट आणि फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या होतात. रुग्णाला वेळीच रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार केल्यास त्याचा जीव वाचू शकतो. वेळीच होणारे उपचार अंतर्गत अवयवांना इजा आणि पुढील गुंतागुंतीमुळे होणारा रुग्णाचा मृत्यू टाळू शकतात.

तज्ज्ञांचे म्हणणे काय?

या पार्श्वभूमीवर, कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य कोव्हिड कृती दलाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. कुठलीही लस अथवा औषधाचे दुष्परिणाम असतात. कोव्हिशिल्डमुळे १० लाखांपैकी ८ जणांना हे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुष्परिणाम जाणविण्याचा धोका जास्त होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसनंतर तो कमी होत गेला. एवढ्या कालावधीनंतर तर धोका आणखी कमी झाला आहे. एखाद्या व्यक्तीला लशीचे दुष्परिणाम जाणवले म्हणजे त्याचा मृत्यू होत नाही. योग्य उपचारांनंतर तो बरा होऊ शकतो. लशीच्या दुष्परिणामाची चर्चा सुरुवातीलाही होती. परंतु, त्यापासून होणारा फायदा जास्त असून, त्यामुळे वाचलेले जीव महत्त्वाचे आहेत. कोव्हिशिल्डचे दुष्परिणाम जाणविण्याची शक्यता आता अतिशय कमी आहे, असेही डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sanjay.jadhav@expressindia.com