Kailash Mansarovar Yatra Resumes in 2025: कोविड-१९ महासाथीमुळे आणि त्यानंतर भारत-चीन तणावामुळे पाच वर्षे बंद राहिलेली कैलास-मानसरोवर यात्रा अखेर २०२५ मध्ये पुन्हा सुरू झाली आहे.
यंदा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एकूण ७५० यात्रेकरूंची निवड कैलास- मानसरोवर यात्रेसाठी केली आहे. त्यापैकी ५०-५० यात्रेकरूंचे ५ गट उत्तराखंडमधील लिपुलेख येथून तिबेटमध्ये प्रवेश करतील, तर ५०-५० यात्रेकरूंचे १० गट सिक्कीममधील नथूला पासमधून तुलनेने लांब पण थोडा सोपा मार्ग निवडतील. दोन्ही मार्गांवरील पहिल्या गटांचे यात्रेकरू सध्या प्रवास करत आहेत.
पर्वत आणि तलाव
पर्वत आणि तलाव
६,६३८ मीटर उंच असलेला कैलास पर्वत (तिबेटी भाषेत गंग रिनपोछे) तिबेटच्या न्गारी प्रिफेक्चरमध्ये आहे. हा भाग भारत, तिबेट आणि नेपाळच्या त्रिसीमेच्या जवळ आहे. कैलास पर्वताच्या दक्षिणेला तिबेटी पठारावर गोड्या पाण्याचे मानसरोवर (तिबेटी भाषेमध्ये मापाम युमत्सो) आणि खारट पाण्याचा राक्षसताल (तिबेटी भाषेमध्ये ल्हानाग त्सो) असे दोन तलाव आहेत. हे दोन्ही तलाव आणि त्यांच्या मागे असणारा उंच कैलास पर्वत हिंदू, बौद्ध, जैन आणि तिबेटी बोन धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
लेखिका एलिस अल्बिनिया यांनी त्यांच्या Empires of the Indus: The Story of a River (२००८) या पुरस्कारप्राप्त पुस्तकात लिहिले आहे की, “हिंदूंसाठी कैलास हे भगवान शंकराचे निवासस्थान आहे… जैनांसाठी हा त्यांच्या पहिल्या तीर्थंकरांचे कैवल्यप्राप्तीचे स्थान आहे; बौद्धांसाठी तो जगाचा केंद्रबिंदू आहे; तर तिबेटी बोन परंपरेनुसार तो आकाशदेवी सिपायमेनचे निवासस्थान आहे.”
महत्त्वाच्या नद्यांचा उगम
या पर्वताच्या परिसरातून यारलुंग त्सांगपो (जी पुढे ब्रह्मपुत्रा होते), सिंधू नदी, सतलज नदी आणि कर्णाली (जी पुढे घाघरा म्हणून ओळखली जाते, गंगेची एक महत्त्वाची उपनदी) या चार मोठ्या नद्या उगम पावतात.
तीर्थयात्रेचं मुख्य प्रवाहात येणं
कैलास-मानसरोवर हे ठिकाण कितीही प्राचीन व पवित्र असलं, तरी सुरुवातीच्या काळात ते सर्वसामान्यांसाठी लोकप्रिय तीर्थक्षेत्र नव्हतं, असं अभ्यासक अॅलेक्स मॅके यांनी त्यांच्या Kailas Histories: Renunciate Traditions and the Construction of Himalayan Sacred Geography (२०१५) या पुस्तकात म्हटलं आहे.
“खरं तर, पूर्वी कैलास पर्वत केवळ काही विरक्त साधूंनीच पाहिला होता. सर्वसामान्य भारतीय यात्रेकरू तिथे जात नव्हते. हिंदू आणि बौद्ध धर्मग्रंथांमध्ये देखील स्पष्टपणे नमूद केलं आहे की, कैलास हे स्वर्गातील स्थान आहे आणि तिथे केवळ उन्नत साधकच जाऊ शकतात,” असं मॅके यांनी म्हटलं आहे.
१९०४… चित्र बदललं
पण, हे चित्र १९०४ नंतर बदललं. त्या वर्षी तिबेटने अधिकृतपणे ब्रिटिश नागरिकांसाठी (त्यात भारतीयांचाही समावेश होता) आपलं दार उघडलं. यामध्ये अल्मोड्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी चार्ल्स शेरिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. शेरिंग यांनी १९०५ साली कैलास-मानसरोवर भागाची पाहणी केली आणि आपल्या अहवालात यात्रा मार्ग सुधारण्याची शिफारस केली.
कैलासासाठीचा सोपा मार्ग
१९०६ साली चार्ल्स शेरिंग यांनी Western Tibet and the British Borderlands हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कैलास पर्वताचा सुंदर फोटो होता. अॅलेक्स मॅके यांच्या मते, शेरिंग यांनी या पुस्तकाद्वारे शैव संप्रदायातील एका छोट्या विरक्त गटाच्या श्रद्धेला मुख्य प्रवाहातील हिंदू समाजात स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे अल्मोडा जिल्ह्यात यात्रेकरू वाढतील आणि महसूल व रोजगाराच्या संधी तयार होतील, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळेच शेरिंग यांनी कैलाससाठी लिपुलेख मार्ग सुचवला. हा मार्ग अल्मोड्यातून जातो आणि मैदानी भागातून कैलासला जाण्यासाठीचा तो सर्वात सोपा मार्ग मानला जातो.
१९८१ साली पुन्हा सुरुवात
कालांतराने कैलास-मानसरोवर यात्रेला लोकप्रियता मिळत गेली. १९३० साली सुमारे ७३० भारतीय यात्रेकरूंनी कैलास यात्रा केली होती. १९५० मध्ये चीनने तिबेट ताब्यात घेतल्यानंतर ही संख्या कमी झाली. १९५१ मध्ये कैलास हे युरोपियन लोकांसाठी बंद करण्यात आलं आणि १९५९ मध्ये भारतीयांसाठीही बंद करण्यात आलं. ही यात्रा पुन्हा १९८१ साली सुरू झाली. त्यासाठी जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे प्रयत्न महत्त्वाचे होते. अॅलेक्स मॅके लिहितात,
“एप्रिल १९८१ मध्ये स्वामी यांनी चीनचे देंग झिओपिंग यांच्याशी यावर चर्चा केली. त्यानंतर जुलै महिन्यात चीनचे परराष्ट्र मंत्री भारतात आले, तेव्हा अंतिम निर्णय झाला. दोन महिन्यांनी, म्हणजे सप्टेंबरमध्ये, ६० भारतीय यात्रेकरूंचा पहिला ताफा अल्मोडा आणि लिपुलेख मार्गाने कैलासला गेला. या पहिल्या गटात सुब्रमण्यम स्वामी स्वतः होते.”
कैलास परिक्रमा पूर्वी आणि आज
कैलास-मानसरोवर यात्रेचा मुख्य भाग म्हणजे मानसरोवर आणि कैलास पर्वताची परिक्रमा करणे. यात्रेकरू सर्वप्रथम मानसरोवर तलावाची परिक्रमा करतात. ही सुमारे ९० किमीची पायपीट असते आणि तिला ३ ते ५ दिवस लागतात. त्यानंतर काहीजण कैलास पर्वताची परिक्रमा करतात, जी अधिक कठीण असते. कैलास परिक्रमा सुमारे ५२ किमीची असून, तिला साधारणतः ३ दिवस लागतात.
त्सेटी कॅम्पपासून सुरुवात
सी. एम. भंडारी यांनी A Journey to Heaven, Kailas-Mansarovar (१९९८) या पुस्तकात १९९७ मधील आपल्या यात्रेचा अनुभव लिहिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसरोवर तलावाच्या पश्चिम किनाऱ्यावरील त्सेटी कॅम्प हे तलाव परिक्रमेचं सुरुवातीचं स्थान होतं. तिथून यात्रेकरू उत्तर दिशेला सुमारे ३० किमीवर असलेल्या हुआरे या ठिकाणी जात होते. त्यानंतर हुआरेच्या दक्षिणेला असलेल्या सेरालुंग मठात जात होते, मग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरील त्रुगो गोम्पा या बौद्ध मठात आणि शेवटी पुन्हा त्सेटी कॅम्पवर परत येत होते.
कैलास परिक्रमा
कैलास परिक्रमा पर्वताच्या दक्षिण टोकापासून, तर्चेन या ठिकाणाहून सुरू होते. यात्रेकरू कैलास पर्वताला उजव्या बाजूने ठेवून नेहमी दक्षिणोत्तर दिशेने परिक्रमा करतात. हा प्रवास दिरापुक, डोल्मा ला (उंच दर्रा), झुतुल पुक आणि पुन्हा तर्चेन येथे परत आल्यावर पूर्ण होत होता.
आधुनिक यात्रा
भंडारी यांच्या मते, तिबेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी यात्रेकरूंना उंच डोंगरांमध्ये श्वासोच्छ्वासाची सवय (acclimatization) करून घ्यावी लागते. त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की, “भारतीय मार्गाने केल्या जाणाऱ्या प्रवासात सुमारे १० दिवसांची चढण आहे. धारचुलामधील ३,००० फूट उंचीवरून नविधांगपर्यंत १४,००० फूट उंची गाठताना शरीराला डोंगराळ भागात चालण्याची सवय होते.” यावर्षीच्या यात्रेत यात्रेकरू प्रथम धारचुलामध्ये एक दिवस थांबतील, नंतर गुंजी गावात दोन दिवस acclimatization करतील, त्यानंतर नविधांग येथे आणखी दोन दिवस राहतील आणि मग लिपुलेख दर्र्यातून तिबेटकडे प्रवास करतील. तिबेटमध्ये सुमारे एक आठवडा राहिल्यानंतर ते परत लिपुलेख मार्गे भारतात येतील.
उत्तराखंड पर्यटन विभागाच्या अतिरिक्त सचिव पूजा गर्ब्याल यांनी The Indian Express ला सांगितलं की, लिपुलेख मार्गावर रस्त्यांचं डांबरीकरण झाल्यामुळे चालण्याचा प्रवास मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. २०१९ मध्ये भारतीय बाजूने २७ किलोमीटर चालावं लागायचं, तर यावर्षी फक्त १ किलोमीटर चालावं लागणार आहे.
२०१५ मध्ये सुरू झालेल्या नथू ला पास मार्गावर ही यात्रा आणखीच सोपी आहे. यात १,५०० किलोमीटरचा संपूर्ण प्रवास नथू ला पासपासून मानसरोवरपर्यंत गाडीतून किंवा बसने केला जातो. एकूणात पूर्वी अगदीच कष्टमय राहिलेला कैलास- मानसरोवर यात्रेचा मार्ग आता तुलनेने कमी कष्टाचा ठरतो आहे.