Kim Jong Un Daughter North Korea : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जगभरात चर्चा होत असते. त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार याबाबत समाजमाध्यमांवर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. किम जोंग उन यांनी आतापर्यंत अनेकांना चकित करणारे निर्णय घेतलेले आहेत. दरम्यान, उत्तर कोरियाचे पुढील नेतृत्व कोणाकडे जाणार याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. हुकूमशाह किम जोंग-उन हे त्यांच्या मुलीकडे देशाची सूत्रे देण्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. कदाचित उत्तर कोरियाची पुढची हुकमूशाह ही किम जोंगची मुलगी असेल, असं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं दिलं आहे. त्यासंदर्भातील घेतलेला हा आढावा…

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग-उन हे त्यांची मुलगी किम जु-ए हिला आपला पुढचा उत्तराधिकारी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे (NIS) नवीन प्रमुख चो ते-योंग यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, असं असलं तरीही त्या संदर्भातील कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. किम जु-ए नेमकी किती वर्षांची आहे, याबाबत कुठलीही माहिती नाही. मात्र, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार ती साधारण १२ वर्षांची आहे.

२०२२ मध्ये किम जु-ए पहिल्यांदाच आली जगासमोर

नोव्हेंबर २०२२ मध्ये किम जोंग-उन यांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलीची सर्वांसमोर ओळख करून दिली होती. त्यानंतर किम जु-ए अनेक माध्यमांवर वारंवार दिसू लागली. देशाच्या लष्करी आणि औपचारिक कार्यक्रमांमध्ये ती नेहमीच आपल्या वडिलांबरोबर सार्वजनिक मंचावर उपस्थित असते. किम जोंग-उन यांनी उत्तर कोरियामधील माध्यमांवर कडक निर्बंध घातलेले आहेत, त्यामुळे प्रसारमाध्यमांनी कधीही किम जु-एचे नाव घेतलेले नाही. ती केवळ नेत्याची सर्वात लाडकी मुलगी किंवा आदरणीय कन्या या नावानेच ओळखली जाते. विशेष बाब म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमात तिचा आवाज कुणीही ऐकलेला नाही.

आणखी वाचा : भारताविरोधात दंड थोपाटणारे ट्रम्प चीनसमोर कसे नरमले? कारण काय?

सार्वजनिक कार्यक्रमात किम जु-एची उपस्थिती

  • सध्या किम जु-ए लहान असल्याने तिच्याकडे कोणताही अधिकृत पदभार नाही.
  • गुप्तचर यंत्रणा आणि प्रादेशिक तज्ज्ञांच्या मते ती किम घराण्याच्या चौथ्या पिढीतील पुढील सर्वोच्च नेतेपदाची प्रमुख दावेदार आहे.
  • उत्तर कोरियातील राजकीय विश्लेषकांच्या मते, मागील काही दिवसांपासून किम जु-एच्या प्रतिमेत लक्षणीय बदल झाला आहे.
  • पूर्वी लाजरी व शांत स्वभावाची असलेली किम आता तिच्या वडिलांबरोबर सार्वजनिक मंचावर दिसून येत आहे.
  • अनेकदा ती लष्करी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच्या उच्चस्तरीय बैठकीतील छायाचित्रांमध्ये दिसलेली आहे.

किम जु-ए उत्तर कोरियाची हुकूमशाह होणार?

२०२३ मध्ये उत्तर कोरियातील एका भव्य लष्करी परेडदरम्यानचा एक प्रसंग विशेष लक्षवेधी ठरला. एका सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याने किम जु-एच्या समोर गुडघे टेकून आदर व्यक्त केला. याआधी हा आदर केवळ किम जोंग-उन यांनाच दिला जात होता. किम जु-एची सार्वजनिक मंचावरील उपस्थिती वाढली असल्याने ती उत्तर कोरियाची पुढील हुकूमशाह होऊ शकते, असा अंदाज तेथील नागरिक व्यक्त करत आहेत. परंपरेने पुरुषप्रधान असलेल्या उत्तर कोरियात किम जु-ए ही पहिली महिला सर्वोच्च नेता होऊ शकते असंही सांगितलं जात आहे. किम घराण्याची देशावरील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

kim jong un daughter and wife
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन आणि त्यांची कन्या किम जु-ए

किम जोंग-उन हुकूमशाह कसे झाले?

डिसेंबर २०११ मध्ये किम जोंग-इल यांच्या निधनानंतर किम जोंग-उन यांनी उत्तर कोरियाची सूत्रे आपल्या हातात घेतली. जानेवारी २०१२ मध्ये ते औपचारिकपणे देशाचे सर्वोच्च सेनापती व त्यानंतर कामगार पक्षाचे सरचिटणीस म्हणून सत्तेवर आले. वडिलांच्या निधनानंतर किम जोंग-उन यांनी देशावरील आपली सत्ता मजबूत करण्याचे प्रयत्न केले. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या मते, किम जोंग-उन यांना तीन अपत्ये आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांनी फक्त किम जु-ए हिचीच सार्वजनिकपणे ओळख करून दिलेली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव किम जोंग-उन हे त्यांच्या मुलीची उत्तराधिकारी म्हणून निवड करू शकतात, असं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : पाकिस्तान-अमेरिकेच्या राजकीय संबंधात गोडवा? असीम मुनीर यांचं महत्व का वाढलंय?

किम जोंग-उन यांना आरोग्याच्या समस्या?

किम जोंग-उन हे ४१ वर्षांचे असून त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची उंची अंदाजे ५ फूट ७ इंच व वजन सुमारे १३० किलो असल्याचा अंदाज आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सतत धूम्रपान, अतिमद्यपान, जास्त खाणे व उशिरापर्यंत शस्त्रास्त्र संशोधनासाठी इंटरनेटवर वेळ घालवणे अशा जीवनशैलीमुळे किम जोंग-उन यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. किम घराण्याचे राज्य किम इल सुंग यांच्यापासून सुरू झाले होते. त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर कोरियाची स्थापना केली होती. त्यांचा मुलगा किम जोंग-इल यांनी २०११ पर्यंत देशावर एकहाती सत्ता गाजवली. त्यांच्या निधनानंतर किम जोंग-उन हे उत्तर कोरियाचे हुकूमशाह झाले आहेत. आता ते किम जु-एला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.