– हृषिकेश देशपांडे

तमिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यातील पोचमपल्लीजवळ २८ वर्षीय लष्करी जवान एम. प्रभू यांच्या हत्येनंतर राज्यात भाजप विरुद्ध सत्ताधारी द्रमुक असा संघर्ष सुरू आहे. भाजपने जवानाच्या कुटुंबीयांना मदत तसेच सरकारी नोकरी मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे. यातून द्रमुकची कोंडी झाली आहे.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Raigad Lok Sabha
शिवसेनेपाठोपाठ भाजपची तटकरे विरोधाची तलवार म्यान

नेमकी घटना काय?

हत्या झालेल्या जवानाची पत्नी घराबाहेरील नळावर कपडे धुवत होती. त्या वेळी नागोजनहल्ली शहर पंचायतीमधील द्रमुकचे नगरसेवक आर. चिन्नासामे (वय ५०) याने आक्षेप घेतला. हा नळ पिण्याच्या पाण्याचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावरून नगरसेवक आणि जवानाच्या कुटुंबात वाद झाला. गावकऱ्यांनी त्यात मध्यस्थी केली. पुन्हा काही वेळाने चिन्नासामे याने आपल्या मुलासह इतरांना घेऊन संबंधित जवान व त्याच्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. विशेष म्हणजे त्या जवानाचा भाऊही लष्करात आहे. आठ फेब्रुवारीची ही घटना. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आठवडाभरानंतर प्रभूचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित द्रमुक नगरसेवक, त्याचा पुत्र अशा एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे…

भाजपने या घटनेच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई व इतर प्रमुख नेते यामध्ये सहभागी झाले होते. परवानगीशिवाय मोर्चा काढल्याबद्दल चेन्नई पोलिसांनी साडेतीन हजार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अण्णामलाई यांनी माजी सैनिकांसह राजभवन येथे राज्यपाल आर. ए. रवी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी या प्रकरणी काहीही वक्तव्य केलेले नाही, असा आरोप अण्णामलाई यांनी केला आहे. हा मुद्दा भाजपने तापवला आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक आहे. त्याच्या तोंडावर हा वाद पेटल्याने सत्तारूढ द्रमुकची अडचण झाली आहे. संबंधित जवान सुटीवर असताना हा प्रकार घडला आहे. हा विषय संवेदनशील आहे. राज्यपाल आणि द्रमुक यांच्यात अभिभाषणावरून संघर्ष झाला होता. आताही भाजप प्रदेशाध्यक्षांच्या राजभवनावरील भेटीनंतर द्रमुकच्या मंत्र्यांनी टीका केली आहे.

घटनेला राजकीय पदर

तमिळनाडूत गेली पाच दशके द्रमुकविरोधात अण्णा द्रमुक असा सरळ संघर्ष आहे. मात्र आता करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर जनमानसावर पकड असलेला नेता नाही. त्यातच जयललितांच्या पश्चात अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वावरून पन्नीरसेल्वम व पलानीस्वामी यांच्यात दोन गट पडले आहेत. अशा वेळी पक्षवाढीसाठी संधीची वाट भाजप बघत आहे. गेल्या वर्षीच्या स्थानिक निवडणुकीत भाजपने स्वबळावर चांगली कामगिरी केली होती. प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या आक्रमक धोरणाला पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यातील द्रमुक सरकारविरोधात मुद्दा हाती घेण्यासाठी भाजप प्रयत्नात आहे. अशा वेळी जवानाच्या हत्येत द्रमुकचा नगरसेवक व त्याच्या कुटुंबावर आरोपाने राज्यभर हा मुद्दा भाजपने लावून धरला आहे. अण्णा द्रमुक जरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असला तरी, त्यांचे भाजपशी संबंध तितके सौहार्दाचे नाहीत.

हेही वाचा : डीएमके नगरसेवकाच्या मारहाणीत भारतीय जवानाचा मृत्यू, ६ जणांना अटक, नगरसेवक फरार

लोकसभेचा हिशेब…

दक्षिणेत कर्नाटक आणि आता काही प्रमाणात तेलंगणचा अपवाद वगळता भाजपला विशेष स्थान नाही. लोकसभेला ३९ जागा असलेल्या या राज्यात अण्णा द्रमुकचा एकमेव खासदार आहे, उर्वरित जागा द्रमुक-काँग्रेस तसेच डावे पक्ष यांच्या आघाडीकडे आहेत. त्यामुळेच लोकसभेला भाजपने तमिळनाडूमधून काही जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यात कन्याकुमारी, कोईमतूर, दक्षिण चेन्नई अशा काही मतदारसंघांवर पक्षाचे लक्ष आहे. तमिळनाडूच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांना फारसे स्थान नाही. प्रादेशिक पक्षांच्या मेहेरबानीवरच आघाडी करून त्यांना काही जागा मिळतात हे वास्तव आहे. अशा वेळी मुद्दे हाती घेऊन जनतेत जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. संबंधित जवानाची हत्या झाल्यावर कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाजपने रान पेटवले आहे. मृत्यू झालेली व्यक्ती लष्करातील जवान आहे. राज्यात कोणीही सुरक्षित नाही हे दाखवून देण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. यातून राज्यातील सत्ताधारी बचावात्मक स्थितीत आहेत.