Loudspeakers on Korean border दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियात दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. परंतु, आता हा संघर्ष शमत असल्याचे चित्र आहे. दक्षिण कोरियाच्या सरकारने सोमवार (४ ऑगस्ट)पासून उत्तर कोरियाबरोबरच्या सीमेवर लावलेले लाऊडस्पीकर्स काढायला सुरुवात केली आहे. या लाऊडस्पीकर्सचा वापर देशाबद्दल माहिती देण्यासाठी केला जात होता. १९६० च्या दशकापासून या स्पीकर्सवर मायकेल जॅक्सनची गाणी, के-पॉप गाणी (कोरियन पॉप संगीत) आणि हवामानाचीही माहिती दिली जात होती. हे पाऊल दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यास मदत करणारी एक व्यावहारिक उपाययोजना म्हणून उचलण्यात आले असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सांगणे आहे.
कोरियन योनहाप वृत्तसंस्थेनुसार, दोन महिन्यांपूर्वी नवीन अध्यक्ष ली जे म्युंग यांनी हे लाऊडस्पीकर प्रसारण निलंबित करण्याचा आदेश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष ली यांच्या निर्णयाला नवीन प्रशासनाच्या सौम्य दृष्टिकोनाचा भाग म्हणून पाहिले जात आहे. या दोन्ही देशांतील वाद अनेक दशकांपासून सुरू आहे. यादरम्यान त्यांनी विविध विचित्र स्वरूपाच्या युक्त्यांचा वापर केला. त्यात विष्ठेने भरलेले फुगे पाठवणे, सीमेवर मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवणे, प्रचार पत्रके पाठविणे आदी गोष्टींचा समावेश आहे. परंतु, त्यामागील कारण काय? त्यांच्यातील संघर्षाचे कारण काय? संघर्षात लाऊडस्पीकरचा वापर का आणि कसा करण्यात आला? जाणून घेऊयात.

दोन देशांतील संघर्षाचा इतिहास
- कोरियन द्वीपकल्प १९१० पासून जपानच्या ताब्यात होता. १९४५ मध्ये जपानच्या शरणागतीनंतर कोरियन द्वीपकल्प दोन भागांत विभागला गेला.
- सोविएत आणि चिनी कम्युनिस्टांनी उत्तरेकडे डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाचे समर्थन केले; तर अमेरिकन लोकांनी दक्षिणेत कोरिया प्रजासत्ताकच्या निर्मितीला पाठिंबा दिला.
- १९५० मध्ये संस्थापक किल इल सुंग यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाच्या सैन्याने दक्षिणेवर आक्रमण केले. हे युद्ध तीन वर्षे चालले.
- अमेरिकी सैन्याने दक्षिणेला लढण्यास मदत केली. अखेरीस कोणत्याही बाजूने निर्णायक विजय मिळू शकला नाही आणि १९५३ मध्ये युद्धविरामावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
त्यानंतरच कोरियन डिमिलिटराइज्ड झोन (डीएमझेड)ची निर्मिती झाली; ज्याने द्वीपकल्प अर्ध्या भागात विभागला गेला. परंतु, कायमस्वरूपी शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत. तेव्हापासून दोन्ही कोरियन राष्ट्रांमध्ये सतत वाद सुरू असल्याचे चित्र आहे. १९७० पासून दोन्ही बाजूंनी शांततापूर्ण करार करण्यासाठी वाटाघाटी करण्यात आल्या. २०००, २००७ व २०१८ मध्ये या संदर्भात महत्त्वपूर्ण करार झाले; परंतु याचा फारसा परिणाम झाला नाही. दरम्यान, उत्तर कोरियानेही अण्वस्त्रांच्या विकासाचा पाठपुरावा केला असून, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांकडून याचा विरोध झाला आहे.
२०१९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची व्हिएतनाममधील हनोई येथे भेट झाली होती. २०१८ मध्येही ट्रम्प यांनी किम जोंग उन यांची भेट घेतली होती. उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची भेट घेणारे ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. अनेकांना अशी आशा होती की, या शिखर परिषदेत अमेरिका आणि उत्तर कोरिया अण्वस्त्र निःशस्त्रीकरण आणि परिणामी निर्बंध सुलभ करण्याच्या बाबतीत काही निर्णय घेतील. परंतु, संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या न करताच शिखर परिषद अचानक संपली. रॉबर्ट कार्लिन आणि सिगफ्रीड हेकर यांनी उत्तर कोरियाच्या धोरण व तांत्रिक विश्लेषणामध्ये तज्ज्ञ असलेल्या यूएस-आधारित प्रकाशन ‘३८ नॉर्थ’मधील एका लेखात लिहिले आहे, हे किमसाठी मोठे नुकसान आहे. तेव्हापासून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणाव वाढत चालला आहे.
संघर्षात संगीताचा वापर
‘म्युझिक अँड कॉन्फ्लिक्ट’ (Music and Conflict) या पुस्तकात संगीत शास्त्रज्ञ कीथ हॉवर्ड यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या आवाजांबद्दल लिहिले आहे. त्यांनी म्हटले, “उत्तरेकडून शिवीगाळ, क्रांतिकारी गाणी आणि त्यांच्या देशाविषयीची माहिती सांगणारी गाणी प्रसारित केली जात होती. दक्षिणेकडून मायकेल जॅक्सनच्या अमेरिकन पॉप संगीताचे प्रसारण केले जात होते, ज्यावरून अमेरिकन सैन्य दक्षिण कोरियन सैन्याला मदत करीत असल्याचे दिसून येते.” परंतु, यामागे नेमकी कल्पना काय होती? याविषयी सोलच्या योनसेई विद्यापीठातील दक्षिण कोरियन संशोधक येचान मून यांनी एका निबंधात लिहिले आहे. ‘साउंड अँड अॅक्सेस टू इन्फॉर्मेशन : द पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स ऑफ द लाऊडस्पीकर ब्रॉडकास्ट्स टू नॉर्थ कोरिया’, असे त्याचे नाव आहे. मून यांनी लिहिले, “लाऊडस्पीकर्सच्या बाबतीत आवाजाची संवेदनात्मक आणि सर्वव्यापकता महत्त्वाची भूमिका बजावते. हे प्रिंट किंवा डिजिटल माध्यमांसारखे नाही. कारण- जेव्हा आवाज आपल्या कानावर पडतो, तेव्हा त्यातून सहजासहजी सुटका मिळवणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य होत नाही.”
उत्तर कोरियामध्ये माहितीबाबत कठोर नियम आहेत. त्यामुळे या देशाला ‘हर्मिट किंग्डम’, असे म्हटले जाते. मून यांनी लिहिले, “ध्वनी हे माध्यम स्वतःच भावनिक आणि शारीरिक प्रतिसाद निर्माण करण्यास सक्षम आहे. मुख्य म्हणजे उत्तर कोरियाचे सरकार देशांतर्गत स्वतःच सर्वत्र लाऊडस्पीकर प्रणाली वापरते. प्रत्येक उत्तर कोरियन शहरात सार्वजनिक लाऊडस्पीकर आहेत, जे दररोज सकाळी बातम्या प्रसारित करतात.”
संघर्षात वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर
गेल्या वर्षी उत्तर कोरियाने सीमेपलीकडे हजारो कचरा वाहून नेणारे फुगे सोडल्यानंतर दक्षिण कोरियाने सहा वर्षांत पहिल्यांदा लाऊडस्पीकर्स चालू केले. योनहाप वृत्तसंस्थेने सांगितले की, यापूर्वी उत्तर कोरियाच्या २०१६ मधील चौथ्या अणुचाचणीनंतर दक्षिण कोरियाने हे अभियान राबवले होते. त्यावेळी लाऊडस्पीकर्सवर के-पॉप ग्रुप बीटीएसचे (BTS) इंग्लिश भाषेतील गाणे, हवामानाचा अंदाज, बातम्या आणि उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर, तसेच त्यांच्या दडपशाहीवर टीका करण्यात आल्या होत्या.
त्याच्या प्रत्युत्तरात उत्तर कोरियानेही स्वतःचा प्रचार सुरू केला. उत्तर कोरियापासून फक्त १.६ किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या डांगसान येथील ग्रामस्थांनी याला ‘नॉईज बॉम्बिंग’ला असे नाव दिले होते. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, उत्तर कोरिया मुद्दाम ध्वनिवर्धकावर मोठा आणि कर्कश आवाज गावकऱ्यांना ऐकवत होते. काही गावकऱ्यांनी या आवाजाचे वर्णन लांडग्यांचे रडणे, धातू एकमेकांना घासणे किंवा भुतांचे ओरडणे म्हणून केला. काही रहिवाशांनी तोफखान्याचा आवाज म्हणूनही या आवाजाचे वर्णन केले होते.