-गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मूळ भारतीय वंशांचे असलेल्या अनेकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यात अगदी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांसारख्या अनेकांचा समावेश आहे. आपल्या कामाने आणि बुद्धिमत्तेच्या बळावर भारतीयांनी आपल्या कामाचा जगभरात प्रभाव पाडला  आहे. यात आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. ते नाव आहे लक्ष्मण नरसिंहन.

कोण आहेत लक्ष्मण नरसिंहन?

लक्ष्मण नरसिंहन हे मूळ भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत. १५ एप्रिल १९६७ मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. कॉलेज ऑफ  इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथून अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली. त्यांनतर पेन्सिलवेनिया विद्यापीठाच्या द लॉडर इन्स्टिट्यूट आणि व्हार्टन स्कूलमधून एमबीए पूर्ण केले. 

स्टारबक्स’च्या मुख्याधिकारी (सीईओ) ते कधी रुजू होतील?

लक्ष्मण नरसिंहन येत्या १ ऑक्टोबरपासून ‘स्टारबक्स’च्या मुख्य अधिकारी पदाचा (सीईओ) कार्यभार स्वीकारणार आहे. हॉवर्ड शूल्झ यांच्याकडून नरसिंहन कार्यभार स्वीकारतील. मात्र शूल्झ हे एप्रिल २०२३ पर्यंत कंपनीचे अंतरिम मुख्याधिकारी म्हणून काम बघणार आहेत. 

स्टारबक्स’ची सुरुवात कशी झाली?

सिअॅटलमधील पाईक प्लेस रस्त्यावर १९७१ मध्ये ‘स्टारबक्स’ची सुरुवात झाली. अमेरिकी नागरिक ‘स्टारबक्स’प्रेमी एकत्र जमून विविध विषयांवर चर्चा करतात. अनेक लाखो-कोटी अब्ज डॉलरचे व्यवहारदेखील अनेक नागरिक ‘स्टारबक्स’मध्ये कॉफीचा आस्वाद घेत पूर्ण करतात. गॉर्डन बोकर, जेरी बाल्डविन, झेव सिगल या सिअॅटलमध्ये राहणाऱ्या तिघा मित्रांनी १९७१ साली ‘स्टारबक्स’ कॉफी, टी आणि स्पाइसेस या कंपनीची स्थापना केली. त्यांनतर हॉवर्ड शूल्झ हे कर्मचारी म्हणून कंपनीत रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी तिघांकडून कंपनी ताब्यात घेतली. भारतात टाटा ग्लोबल बेव्हरेजेससोबर भागीदारीकरून ‘स्टारबक्स’ने पहिले आऊटलेट ऑक्टोबर २०१२मध्ये सुरू केले होते. सध्या जगभरातील पन्नासहून अधिक देशांमध्ये विस्तार झाला आहे. सुमारे १६,००० हून अधिक स्टोअर्स आहेत.

नरसिंहन यांची कारकीर्द कशी आहे?

लक्ष्मण नरसिंहन हे रेकिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. रेकिट ही ड्युरेक्स कंडोम, एन्फामिलबेबी फॉर्म्युला आणि म्युसिनेक्स कोल्ड सिरप देखील बनवते. रेकिटमधून बाहेर पडण्याची घोषणा त्यांनी केल्यानंतर एफटीएसईमध्ये सूचिबद्ध असलेले रेकिटचे समभाग ४ टक्क्यांनी घसरले. नरसिंहन हे सप्टेंबर २०१९मध्ये रेकिटमध्ये रुजू झाले होते आणि रेकिटचे नेतृत्व करणारे ते पहिले भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक होते. यापूर्वी त्यांनी पेप्सिकोमध्येदेखील काम केले होते, जी रेडी-टू-ड्रिंक उत्पादनांसाठी ‘स्टारबक्स’ची भागीदार आहे. पेप्सिकोचे जागतिक मुख्य वाणिज्य अधिकारी म्हणून काम बघितले. कंपनीच्या विक्रीतील घसरणीनंतर कंपनीला पुनरुज्जीवन मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या व्यवस्थापन शैलीसाठी गुंतवणूकदारांनी खील त्यांचे कौतुक केले. 

कोण-कोणत्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तींकडे? 

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय वंशाचे सुंदर पिचाई आहेत. भारतात जन्म झालेल्या सुंदर पिचाई यांनी २००४ मध्ये गुगलमध्ये कामाला सुरुवात केली होती. सत्या नडेला यांनी २०१४ मध्ये अमेरिकी कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. नडेला यांच्याकडे मणिपाल इन्स्‍टीट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजीची पदवी आहे. यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. नडेला १९९२पासून मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहेत. शंतनु नारायण २००७ मध्ये अॅडोबचे सीईओ झाले. पराग अग्रवाल यांच्याकडे ट्विटरची धुरा आहे. याचबरोबर अजयपाल सिंह बंगा हे जगातील प्रमुख क्रेडिट कार्ड कंपनी मास्टरकार्डचे सीईओ होते. सध्या ते जनरल अटलांटिकमध्ये कार्यरत आहेत. याप्रमाणे राजीव सुरी, निकेश अरोरा यांच्यासारखे भारतीय वंशाचे अनेक अधिकारी परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman narasimhan is starbucks ceo who is he and his journey print exp scsg
First published on: 03-09-2022 at 08:21 IST