ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच एचआयव्ही संसर्गावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. या संसर्गामुळे व्यक्तीला एड्स होऊन त्याचा मृत्यू होतो. मात्र, एचआयआव्हीच्या संसर्गास प्रतिबंध करणारे औषध उपलब्ध झाले आहे. हे औषध एचआयव्ही संसर्ग रोखण्यास १०० टक्के यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाच्या वापराबाबत नुकत्याच मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर युरोपीय समुदायाने या औषधाच्या वापरास मंजुरी दिली आहे. यामुळे एचआयव्ही प्रतिबंधाच्या दिशेने निर्णायक पाऊल पडल्याचे मानले जात आहे.
एचआयव्हीचा धोका किती?
एचआयव्ही ही प्रमुख जागतिक आरोग्य समस्या आहे. जगभरात २०२४ अखेरीस एचआयव्ही संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्या अंदाजे ४ कोटी ८ लाख आहे. त्यातील तब्बल ६५ टक्के रुग्ण हे आफ्रिकेतील आहेत. जगभरात गेल्या वर्षी एचआयव्ही संसर्गामुळे ६ लाख ३० हजार जणांचा मृत्यू झाला. याच वेळी १३ लाख जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आणि त्यात १ लाख २० हजार लहान मुलांचा समावेश होता. गेल्या वर्षी एचआयव्हीवरील अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) हे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ कोटी १६ लाखांवर पोहोचली. त्याआधीच्या वर्षात (२०२३) ही संख्या ३ कोटी ३ लाख होती.
औषध कोणते?

एचआयव्ही संसर्गावर लेनाकॅपावीर हे औषध प्रभावी ठरले आहे. गेल्या वर्षी एचआयव्ही संसर्ग झालेल्या रुग्णांना हे औषध देण्यात आले. त्यात सुमारे १०० टक्के रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यात हे औषध यशस्वी ठरले. या रुग्णांमध्ये पुरुष आणि महिलांचा समावेश होता. हे औषध वर्षातून दोन वेळा लशीद्वारे घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. एचआयव्ही संसर्ग झालेल्या व्यक्तींना संसर्ग रोखण्यासाठी सध्या गोळ्या आणि इतर प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, आता सहा महिन्यांत एक लस घेऊन संरक्षण मिळेल. एचआयव्ही संसर्गाबद्दल समाजात अनेक गैरसमज असल्याने संसर्ग झालेला व्यक्ती गोळ्या अथवा इतर पर्याय घेण्यासाठी रुग्णालयात जात नाहीत. आता सहा महिन्यांतून एकदाच लस घ्यावी लागणार असल्याने रुग्णांकडून त्यांचा स्वीकार वाढण्याचा शक्यता व्यक्त होत आहे. त्यातून एचआयव्ही संसर्ग प्रतिबंधाचे पाऊल पडणार आहे.

आवश्यकता कोणाला?

एचआयव्ही संसर्ग झालेल्या व्यक्तींना हे औषध घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यातही प्रामुख्याने ज्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे, अशा रुग्णांना प्राधान्य द्यावे. यामध्ये देहविक्रय करणाऱ्या महिला, समलिंगी पुरुष, तृतीयपंथी, अमली पदार्थ शरीरात टोचून घेणाऱ्या व्यक्ती, कारागृहातील कैदी यांचा समावेश आहे. एचआयव्ही संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांसाठी दीर्घकालीन एआरटी उपचार प्रभावी ठरत नाहीत. त्यांच्यासाठीही हे औषध परिणामकारक ठरत आहे. मात्र, सुरक्षित लैंगिक संबंधांची गरजही जागतिक आरोग्य संघटनेने अधोरेखित केली आहे. कंडोमचा वापर करून लैंगिक संबंधातून संक्रमित होणारे रोग टाळावेत, असे संघटनेने नमूद केले आहे.

आव्हाने कोणती?

लेनाकॅपावीर या औषधाला अमेरिकेतील औषध नियामकांनी मंजुरी दिली आहे. त्यानंतर युरोपीय समुदायातही याच्या वापरास मान्यता मिळाली आहे. मात्र, त्याचा व्यापक पातळीवर वापर होण्याचे आव्हान आहे. वैद्यकीय चाचण्यांच्या पलीकडे या औषधाचा वापर सध्या मर्यादित आहे. हे औषध सर्व देशांमध्ये उपलब्ध होणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. या औषधाची निर्मिती करणाऱ्या गिलिएड कंपनीने १२० गरीब देशांत हे औषध स्वस्तात उत्पादित करण्याची परवानगी देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, यातून दक्षिण अमेरिकेतील देशांना वगळण्यात आले आहे. यामुळे जगभरातील सरकारे आणि जागतिक आरोग्य भागीदार संस्था यांनी या औषधाचा वापर व्यापक पातळीवर होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

इतर शिफारशी कोणत्या?

जागतिक आरोग्य संघटनेने एचआयव्ही संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. त्यात एचआयव्ही चाचणीसाठी रॅपिट किट उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची शिफारस आहे. एचआयव्हीची चाचणी सहजपणे आणि जलद उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. सध्या या चाचणीची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि खर्चिक आहे. त्यात सुटसुटीतपणा आणण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे. याचबरोबर सध्याच्या एआरटी उपचारांऐवजी कॅबोटग्रेवीर आणि रिलपायव्हरीन या लशीवाटे घेण्यात येणाऱ्या औषधांचा वापर करण्याची शिफारस संघटनेने केली आहे. ही दोन्ही औषधे महिन्यातून अथवा दोन महिन्यांतून एकदा एकत्रितपणे लशीद्वारे दिली जातात. विशेषत: एआरटी उपचार प्रभावी ठरत नसलेल्या रुग्णांसाठी याचा वापर करावा, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

sanjay.jadhav@expressindia.com