– अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने देशांतर्गत विकसित झालेल्या हलक्या वजनाच्या १५ लढाऊ हेलिकॉप्टर (एलसीएच) खरेदीवर नुकतेच शिक्कामोर्तब केले. तब्बल ३८८७ कोटींचा हा करार आहे. या हेलिकॉप्टरच्या मर्यादित उत्पादनासाठी ३७७ कोटींच्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येईल. कुठल्याही हवामानात १५ हजारहून अधिक फूट उंचीवर कार्यरत राहणारे जगातील हे एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर मानले जाते. त्याच्या समावेशाने हवाई दलासह लष्कराचीही (आर्मी एव्हिएशन कोर) प्रहार क्षमता  विस्तारणार आहे.

एलसीएचची वैशिष्ट्ये काय ?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) विकसित केलेले हलक्या वजनाचे देशातील हे पहिलेच प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत त्यामध्ये ४५ टक्के स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हे प्रमाण ५५ टक्क्यांहून अधिकवर नेण्याचा प्रयत्न आहे. भारतीय सैन्य दलाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यात एलसीएच सक्षम मानले जाते. शस्त्रास्त्रे व इंधनाचा भार घेऊन ते तब्बल १६ हजार ४०० फूट उंचीवर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकते. ५.८ टन वजनाच्या हेलिकॉप्टरला दोन इंजिनमुळे अधिक सुरक्षा लाभली. एकदा इंधन भरले की, ते ५८० किलोमीटर मार्गक्रमण करू शकते. ताशी २८७ किलोमीटर त्याचा वेग आहे. बैठक जागेत (कॉकपिट) वैमानिक आणि शस्त्र प्रणाली चालकासाठी संलग्न आसन व्यवस्था आहे. हेलिकॉप्टरच्या तळाकडील भागाची रचना कठीण प्रसंगी उतरवताना आघात सहन करणारी आहे. एलसीएचची ताकद हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र डागण्याच्या प्रणालीत आहे. त्यास छोटेखानी तोफची जोड दिलेली आहे. एकात्मिक गतिमान प्रणाली, टेहळणीसाठी आधुनिक उपकरणे, रडारवर अस्तित्व अधोरेखित होऊ नये म्हणून खास रचना आदींनी एलसीएच सुसज्ज आहे. रात्री हल्ला चढविण्याची त्याची क्षमता आहे.

गरज आणि वापर कसा?

कारगील युद्धात उंच पर्वतीय क्षेत्रात ठाण मांडलेल्या घुसखोरांना लक्ष्य करण्यासाठी लढाऊ हेलिकॉप्टरची निकड समोर आली होती. त्या दृष्टीने काम करीत एचएएलने बहुविध क्षमतेचे एलसीएच विकसित केले. पाकिस्तानपाठोपाठ अलीकडे गंभीर बनलेल्या चीन सीमेवरील आव्हाने लक्षात घेऊन भारतीय सैन्य दलांची लढाऊ क्षमता वृद्धिंगत केली जात आहे. एलसीएच लढाऊ आणि बचाव मोहीम, शत्रूच्या हवाई संरक्षणाचा बिमोड आणि बंडखोर विरोधी कारवाईत महत्त्वाचे ठरणार आहे. कुठल्याही हवामानात ते कार्यरत राहू शकते. उंचावरील खंदकांचा वेध घेणे, जंगल किंवा शहरी भागातील कारवाई, युद्धभूमीवर लष्कराचा मार्ग निर्धोक करण्यासाठी ते तैनात करता येईल. संथपणे चालणारे आणि दूर नियंत्रित प्रणालीवरील विमाने यांच्या विरोधात त्याचा वापर करता येणार आहे.

एचएएलचे उद्दिष्ट काय?

संरक्षण सामग्रीवरील परकीय अवलंबित्व कमी करण्यासाठी ज्या सामग्रीच्या आयातीवर बंदी घातलेली आहे, त्यामध्ये हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचाही अंतर्भाव आहे. एलसीएचने आत्मनिर्भर भारत उपक्रमाला चालना मिळणार आहे. पहिले एलसीएच अलीकडेच झाशी येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील १० हेलिकॉप्टर हवाई दलासाठी तर पाच लष्करासाठी असतील. एचएएलने वार्षिक ३० हेलिकॉप्टर उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारकडून १५० हेलिकॉप्टरची मागणी कधी नोंदवली जाईल, याची त्यांना प्रतीक्षा आहे.

हेलिकॉप्टरची सद्यःस्थिती काय?

भारतीय सैन्यदलांकडे सध्या हलक्या वजनाचे ध्रुव (एएलएच), हल्ला करण्याची क्षमता राखणारे रुद्र, चिता आणि चेतक, चिनूक, एमआय आठ, एमआय-१७, अमेरिकन बनावटीचे अपाची, रशियन बनावटीचे एमआय-२५, एमआय- ३५, कामोव्ह, सी किंग-४२ आदी हेलिकॉप्टरांचा ताफा आहे. यातील चिता आणि चेतक तब्बल पाच दशकांपासून सेवेत आहेत. त्यांचे आयुर्मान कधीच संपुष्टात आले आहे. आधुनिक हेलिकॉप्टर समाविष्ट करीत चिता, चेतकसह एमआय-२५,  एमआय-३५ यांना निरोप दिला जाणार आहे.

नव्या हेलिकॉप्टरची प्रतीक्षा का?

लष्कराचे हवाई उपदल (आर्मी एव्हिएशन कोर) सीमावर्ती भागात दळणवळण, पुरवठा व्यवस्था आणि टेहळणी आदी जबाबदारी सांभाळते. यात मुख्यत्वे चिता आणि चेतक या आयुर्मान संपलेल्या हेलिकॉप्टरचा आजही वापर होत आहे. अधुनमधून ती अपघातग्रस्त होतात. मागील पाच वर्षांत हवाई दल आणि लष्कराच्या १५ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यात सैन्य दलातील ३१ व्यक्तींना प्राण गमवावे लागले. तर २० जण जखमी झाले. काही वर्षांपूर्वी वैमानिकांच्या पत्नींनी लष्करातील जुनाट, कालबाह्य सामग्रीचा वापर थांबविण्यासाठी सरकारला साकडे घातले होते. जुनाट हेलिकॉप्टर तातडीने बदलण्याचा आग्रह धरला होता. जुन्या हेलिकॉप्टरची जागा आधुनिक हेलिकॉप्टरला देण्याचे नियोजन आहे. मात्र, ही प्रक्रिया संथपणे पुढे सरकत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Light combat helicopters lch features of india made light combat helicopters print exp 0322 scsg
First published on: 01-04-2022 at 11:39 IST