लोकसत्ता टीम

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान दाखवलेल्या कथित शौर्याबद्दल पाकिस्तान सरकारकडून फील्ड मार्शल हा बहुमान प्राप्त केलेले त्या देशाचे लष्करप्रमुख असिम मुनीर लवकरच पाकिस्तानचे अध्यक्ष बनतील अशी चर्चा तेथे जोरात सुरू आहे. गेल्या महिन्याभरात असिम मुनीर यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांची तीन वेळा भेट घेतली. समाजमाध्यमांवर याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाकिस्तानी राजकारणात गेल्या काही वर्षांत मुनीर यांचा वाढलेला प्रभाव पाहता, ही शक्यता अगदीच नाकारता येण्यासारखी नाही.

अध्यक्ष की लष्करशहा?

आसिफ अली झरदारी यांच्या जागी मुनीर यांची नियुक्ती झाली, तर कोणत्याही लष्करी क्रांतीविना पाकिस्तानच्या अध्यक्षपदावर नियुक्त होणारे ते याह्या खान यांच्यानंतरचे दुसरे लष्करप्रमुख ठरतील. आयुब खान, झिया उल हक, परवेझ मुशर्रफ हेदेखील पाकिस्तानचे सर्वोच्च शासक होण्याआधी लष्करप्रमुख होते. तिघांनीही लष्करी उठाव करून, लोकनियुक्त सरकारला बाजूला सारून सत्ता हस्तगत केली होती. परवेझ मुशर्रफ चीफ एग्झेक्युटिव्ह बनले इतकाच काय तो फरक. या पार्श्वभूमीवर असिम मुनीर लष्करप्रमुखानंतर लष्करशहा बनणार नाहीत. पण राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ते आणखी सक्रिय आणि महत्त्वाकांक्षी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाकिस्तानात अध्यक्षीय लोकशाही?

पाकिस्तानात भारताप्रमाणेच संसदीय लोकशाही आहे. पण बहुतेक वर्षे तेथे लष्कराच्या रूपात समांतर सरकार चालवले जाते. आता असिम मुनीर यांना अधिक अधिकार देण्यासाठी तेथे अध्यक्षीय लोकशाही आणली जाणार, अशीही चर्चा सुरू आहे. पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्ष आणि या पक्षाला बाहेरून पाठिंबा देणारा बिलावल भुत्तो झरदारी आणि आसिफ अली झरदारी यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हा पक्ष सत्तेत टिकून राहण्यासाठी काहीही करू शकतात. यासाठी तडजोडीचा भाग म्हणून अमेरिकी अध्यक्षीय प्रणाली स्वीकारावी, याविषयी त्यांचे मतैक्य झाल्याचे वृत्त आहे. या दोन्ही पक्षांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तानातील सध्याच्या घडीचे सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते इम्रान खान यांचा धसका शरीफ आणि झरदारी कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांच्या तेहरीके इन्साफ पार्टीचे निवडणूक चिन्ह गेल्या वर्षी गोठवले गेेले. पण चिन्हाविना लढूनही गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत नॅशनल असेम्ब्लीवर त्यांचेच सर्वाधिक सदस्य निवडून गेले. इम्रान हे सध्या अटकेत असले, तरी त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. शरीफ-झरदारी यांच्या प्रमाणेच मुनीर यांनीही त्यांचा धसका घेतलेला असू शकतो. आपल्या प्रदीर्घ अटकेबद्दल इम्रान यांनी मुनीर यांनाच जबाबदार धरले आहे. हे सगळे सुरू असताना इम्रान यांची सुटका केली आणि लवकरच पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या, तर पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी या दोन्ही पक्षांसमोर पराभवाची नामुष्की संभवते. इम्रान यांचा काटा काढण्यासाठी त्यामुळे मुनिर यांच्याकडे अधिकाधिक काळ सूत्रे सोपवण्याची तेथील सत्ताधीशांची तयारी आहे. 

जिहादी जनरल

असीम मुनिर यांची ओळख ‘जिहादी जनरल’ अशीही आहे. जनरल झिया उल हक यांच्याप्रमाणे मुनीर यांनीही भारताविरुद्धच्या कारवायांना जिहादचे रूप दिले आहे. मुनीर यांच्यावर धार्मिक शिक्षणाचा पगडा आहे. त्यांना कुराण मुखोद्गत आहे. त्यांच्या भाषणांत अरेबिक आणि फारसी वचनांचा वापर नित्याचा असतो. १९८६मध्ये असिम मुनीर पाकिस्तानी लष्करात दाखल झाले. त्यावेळच्या अनेक अधिकाऱ्यांप्रमाणे मुनीर यांच्यावरही इस्लामी वर्चस्ववादाचा प्रभाव होता. त्यांनी धार्मिक ग्रंथांचे वाचन केले होते. सौदी अरेबियात लष्करी प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मुनीर यांनी संपूर्ण कुराण तोंडपाठ म्हणून दाखवले होते. त्याबद्दल त्यांना हाफीझ-ए-कोरान हा किताबही देण्यात आला. त्यांच्या अनेक भाषणांमध्ये इस्लामचे दाखले, कुराणातील वचने यांचा समावेश असतो. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी निर्णायक ठरलेला धर्माधिष्ठित द्विराष्ट्रवाद या सिद्धान्ताचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मते, इस्लाममध्ये धर्माच्या आधारावर आजवर दोनच राष्ट्रांची निर्मिती झाली. त्यांतील एक म्हणजे रियासत-ए-तैय्यबा किंवा रियासत-ए-मदिना, ज्याची निर्मिती खुद्द प्रेषित मोहम्मद यांनी केली. दुसरे राष्ट्र अल्लाने १३०० वर्षांनंतर निर्माण केले, ते म्हणजेच पाकिस्तान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताची डोकेदुखी वाढणार?

पहलगाम हल्ला मुनीर यांच्याच चिथावणीनंतर घडून आला. भारताला ते हिंदू राष्ट्र समजतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला चौथ्या दिवशी सपशेल नांगी टाकावी लागली, याचे शल्य त्यांच्या मनात आहे. पण याही परिस्थितीत असिम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सहभोजन घेतले, ही बाब भारताच्या दृष्टीने निराशाजनक ठरली. भारतविरोध आणि काश्मीर प्रश्न या दोनच घटकांवर पाकिस्तानात सत्तेत टिकून राहता येते, याची जाण मुनीर यांना आहे. मात्र ते सत्तेस जितके चिकटून राहतील, तितके पाकिस्तानच्या लोकशाहीचे आणि जनतेचे नुकसान होईल. अर्थात ही बाब भारतासाठीही डोकेदुखी ठरेल, कारण मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान यापुढेही भारताच्या कुरापती काढत राहील.