जगभरात चर्चेचा विषय असलेल्या आभासी चलन बिटकॉईनने १.२० लाख डॉलर अर्थात १ कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांकी टप्पा गाठला आहे. भारतात बिटकॉईनला कायदेशीर मान्यता नसताना या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यावर त्यात गुंतवणूक करणे योग्य आहे का?

डोनाल्ड ट्रम्प यांची कृपा?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून आभासी चलनाबाबत सकारात्मक पावले उचलली आहेत. लोकप्रिय कूटचलन ‘बिटकॉईन’ने विक्रमी उसळी घेत पहिल्यांदाच १.२० लाख अमेरिकी डॉलर पातळीपुढे गेले.  ट्रम्प यांनी काही वर्षांपूर्वी बिटकॉईन हा एक गैरव्यवहारासारखा प्रकार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर मतपरिवर्तन होऊन त्यांनी कूटचलनाचे समर्थन सुरू केले. त्यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात त्यांनी नवीन कूटचलनाचे अनावरणही केले. अमेरिकेला जगाची कूटचलन राजधानी बनविण्याची घोषणा त्यांनी केली होती. याचबरोबर कूटचलनाची मोठी राखीव गंगाजळी निर्माण करणे, या उद्योगाला पूरक कायदे बनविणे आणि या उद्योगातील व्यक्तीला प्रशासनात स्थान देणे ही आश्वासने त्यांनी निवडणुकीच्या वेळी दिली होती. यामुळे ट्रम्प यांच्या कार्यकाळात बिटकॉईनचे मूल्य उच्चांकी पातळी गाठत आहे. 

बिटकॉइनचे सध्याचे मूल्य किती? 

‘बिटकॉइन’ने सोमवारच्या सत्रात १.२० लाख डॉलरची सार्वकालिक शिखर पातळी गाठली. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य १,२१,७२७ अमेरिकी डॉलर अर्थात सुमारे १,०४,६४,५९३ रुपये झाले आहे. विशेष म्हणजे, २०१० मध्ये एका बिटकॉइनचे मूल्य भारतीय रुपयात फक्त ८ रुपये (०.०१ अमेरिकी डॉलर) इतके होते. गेल्या काही दिवसांत या आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. मुख्यतः अमेरिकेतील ताज्या घडामोडींमुळे बिटकॉइनला पुन्हा वेगवान तेजीची दौड सुरू केली आहे.

तेजीची कारणे काय?

अमेरिकेत ‘क्रिप्टो वीक’ची सुरुवात होत आहे. या क्रिप्टो वीकदरम्यान, जीनियस अॅक्ट, क्लॅरिटी अॅक्ट आणि अँटी-सीबीडीसी सर्व्हेलन्स स्टेट अॅक्टसह अनेक महत्त्वाच्या क्रिप्टो अर्थात आभासी चलन विधेयकांवर अमेरिकी प्रतिनिधी सभागृहात चर्चा होईल या अपेक्षेने गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना मिळाली आहे. आभासी चलनाशी संबंधित विविध सुधारणांना मंजुरी मिळाल्यास स्टेबलकॉइन्स, क्रिप्टो मालमत्ता ताब्यात ठेवणे आणि व्यापक डिजिटल आर्थिक परिसंस्थेचे नियमन करणे यासाठी व्यापक नियामक आराखडा तयार केला जाईल.

चीनमध्ये निर्बंध शिथिल?

बिटकॉइनच्या वाढीसाठी गेल्या आठवड्यात एका प्रमुख चिनी नियामकाने स्थानिक अधिकाऱ्यांना स्टेबलकॉइन आणि डिजिटल चलन धोरणाबद्दल माहिती देण्यासाठी एक धोरणात्मक सत्र आयोजित केले होते. शांघायच्या राज्य मालमत्ता नियामकाने आयोजित केलेल्या बैठकीत चीनच्या धोरणात संभाव्य बदलाचे संकेत मिळाले, जिथे सध्या क्रिप्टो व्यवहारांवर बंदी आहे. तसे झाल्यास जागतिक पातळीवर आभासी चलनांना मान्यता मिळत असल्याचे द्योतक आहे.

बिटकॉइनमधील तेजी टिकणार?

विद्यमान वर्षात आतापर्यंत बिटकॉइन २९ टक्क्यांनी वधारले आहे. एकूणच सर्व आभासी चलने वधारली आहेत. गेल्या काही आठवड्यात अनेक डिजिटल मालमत्तांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. कॉइनमार्केटकॅपच्या आकडेवारीनुसार, क्रिप्टोकरन्सीचे एकूण बाजार मूल्य आता सुमारे ३.७८ ट्रिलियन डॉलर इतके आहे.

बाययूकॉइनचे मुख्याधिकारी शिवम ठकराल यांनी निदर्शनास आणून दिले की, सध्या बाजारात तेजीचे वातावरण असून, क्रिप्टो भीती आणि लोभ निर्देशांक ७० च्या वर आहे, जे सूचित करते की बाजारात तेजी आणि अस्थिरता आहे. अमेरिकेतील ‘क्रिप्टो वीक’ बद्दलचा उत्साह आणि संस्थात्मक रस हे या तेजीमागील प्रमुख घटक आहेत. ही तेजी काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे. कारण

स्वतःला ‘क्रिप्टो प्रेसिडेंट’ म्हणवणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गुंतवणूकदारांचे मनोबल वाढवले आहे. ट्रम्प यांनी क्रिप्टो उद्योगाला पाठिंबा देण्याबाबत आवाज उठवला आहे आणि धोरणकर्त्यांना त्याच्या वाढीला पाठिंबा देण्यासाठी नियम अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.

आपल्याला बिटकॉइन खरेदी करता येतात का?

जगातील कोणतीही व्यक्तीला बिटकॉइनची खरेदी करता येतात. काही देशांमध्ये बिटकॉइन खरेदी-विक्रीला कायदेशीर मान्यता आहे. शिवाय काही संकेतस्थळांच्या माध्यमातून बिटकॉइनची खरेदी-विक्री करता येते. सध्या जगभरासह भारतात देखील व्हर्च्युअल म्हणजेच बिटकॉइनच्या साह्याने व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे बिटकॉइन हा एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय होऊ शकतो का, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. भारतात मात्र बिटकॉइनला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र जगातील काही देशांमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. विशेषत: जपानने बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर बिटकॉइनच्या मूल्यात मोठी वृद्धी झाली आहे.

बिटकॉइन कसे खरेदी करता येतात?

भारतात कॉइनडीसीएक्ससारख्या एक्सचेंजवर बिटकॉइन खरेदी करता येतात. अमेरिकेत कॉइनबेस किंवा क्रॅकेनवर (Kraken) ही खरेदी करू शकतो. पूर्वी पासवर्ड विसरल्यास बिटकॉइन गमावण्याची शक्यता असते. आता पासवर्ड विसरण्याची भीती वाटत असेल, तर ते स्वतःच्या वॉलेटमध्ये हलवण्याऐवजी तिथेच ठेवू शकता. मात्र कोणी एक्सचेंज हॅक केले तर सर्व बिटकॉइन गमावण्याची भीती आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर बिटकॉईन ईटीएफ म्हणजेच 

आयबीआयटी सारखा ईटीएफ खरेदी करता येतात. ते ब्लॅकरॉककडून विकले जातात. ब्लॅकरॉक ही १० ट्रिलियनची मालमत्ता व्यवस्थापक आहे. 

दोन वर्षांत बिटकॉइनमध्ये किती तेजी?

बिटकॉईनची किंमत तीन वर्षांपूर्वी २० हजार डॉलर होती. आता ती पाच पटीने वाढून १.२० लाख डॉलरपुढे गेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयापासून बिटकॉईनची किंमत सातत्याने वाढत आहे. बिटकॉईनने विद्यमान वर्षात प्रथमच १ लाख डॉलरची पातळी गाठली होती. त्यानंतर तो पुन्हा ९० हजार डॉलरपर्यंत खाली आला होता.

जगात किती बिटकॉइन आहेत?

जगात मर्यादित म्हणजे २.१ कोटी बिटकॉइन उपलब्ध असून सध्या १.६७ कोटी बिटकॉइन प्रणालीमध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रणालीमध्ये दर १० मिनिटाला १२.५ बिटकॉइन येतात. प्रणालीमध्ये बिटकॉइन येण्याच्या पद्धतीला ‘मायनिंग’ म्हटले जाते. 

शेअर बाजारापेक्षा जास्त ‘परतावा’ मिळतो?

बिटकॉइनची मागणी सतत वाढत चालली आहे. त्यामुळे दरातही वाढ होत आहे. शेअर बाजारापेक्षा अधिक चढ-उतार या क्रिप्टोकरन्सीमध्ये असल्याने परतावा चांगला मिळतो. जगातील कोणत्याही देशाच्या शेअर बाजाराने गुंतवणुकीवर जेवढा परतावा दिला नाही; त्यापेक्षा अधिक परतावा बिटकॉइनने दिला आहे. २०१७ वर्षात तर बिटकॉइनमध्ये तब्बल १००० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र शेअर बाजारातील व्यवहारांना कायदेशीर मान्यता आहे. त्याप्रमाणे भारतात सध्यातरी बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. 

बाजारात किती क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत?

सध्या जगभरातील बाजारात अनेक क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. कॉईनमार्केटकॅप या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सध्या जगभरात एक हजारांहून अधिक क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत. मात्र बिटकॉइन सर्वाधिक लोकप्रिय आणि महागडे आहे.

भारताचे आभासी चलनाबाबत धोरण काय?

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने आभासी चलनाच्या वाढत्या वापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण आभासी चलन देशाच्या आर्थिक स्थिरतेला बाधा आणू शकतात, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मत आहे. आभासी चलनाबाबत रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन कायम असून त्याच्या वापरामुळे आर्थिक स्थिरता आणि चलनविषयक धोरणात अडथळा निर्माण होण्याची भीती आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आभासी चलनाचे नियमन करण्याबाबत स्पष्ट धोरण तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बिटकॉइनच्या खरेदी-विक्रीला हवाला व्यवसायासारखेच बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार सध्या आभासी चलनाच्या नियमनाबाबत काम करते आहे. यासाठी रिझर्व्ह बँक, भांडवली बाजार नियामक सेबी आणि अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेला एक आंतर-मंत्रालयीन गट (आयएमजी) जागतिक नियमांचा अभ्यास करत आहे.

केंद्र सरकारने २०२२ मध्ये, आभासी चलनाच्या खरेदी-विक्रीतून होणाऱ्या नफ्यावर थेट ३० टक्के कर आकारणीची घोषणा केली होती. मात्र भारतात आभासी चलनाच्या खरेदी-विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावला जात असला तरी आभासी चलनाला अद्याप कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही.

भारतात आभासी नफ्यावर कर आकारणी कशी?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करताना आभासी चलनांवर कर आकारणीची घोषणा केली होती. व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाद्वारे प्राप्त उत्पन्नावर ३० टक्के दराने कर आकारला जाईल असे अर्थसंकल्पाच्या भाषणात जाहीर केले होते. म्हणजेच एकूणच आभासी चलन आता कराच्या कक्षेत आले असून त्यावर किती कर भरावा लागेल हे स्पष्ट झाल्याचे दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे, प्राप्त उत्पन्नवार ३० टक्के अशी उच्च कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांनी यापासून दोन हात लांब राहावे, असाही इशारा यातून अभिप्रेत होता. आभासी चलनांसंबंधित व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना नफा किंवा तोटा नोंदवणे आवश्यक आहे. शिवाय त्यातून नुकसान झाल्यास त्यातून होणाऱ्या नुकसानीची वजावट कोणत्याही स्रोतातून घेता येणार नाही. म्हणजेच सर्व गुंतवणूकदारांनी त्यांच्या नफ्यातील काही टक्के रक्कम सरकारला कराच्या रूपात द्यावी हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारने निश्चित ३० टक्के उच्चदर निश्चित केला केला आहे.

देशात किती गुंतवणूकदार आहेत?

देशात दोन कोटींहून अधिक आभासी चलन गुंतवणूकदार आहेत. आभासी चलन गुंतवणुकीत ३५ वर्षांखालील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी ७५ टक्के याच वयोगटातील आहेत. याच वेळी ३६ ते ४५ वयोगटातील गुंतवणूकदारांची संख्याही सातत्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांमध्ये महिलांचे प्रमाण तुलनेने कमी असून, एकूण गुंतवणूकदारांपैकी केवळ ११ टक्के महिला असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे अधिकृत डिजिटल चलन कोणते? आभासी चलन ही काळाची गरज असल्यानेच भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वतःचे आभासी चलन ‘ई-रुपया’ डिजिटल स्वरूपात सुरू केले आहे. या चलनाला रिझर्व्ह बँकेचा भक्कम आधार असल्याने यातील व्यवहार सुरक्षित व विश्वासार्ह आहेत.