पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांमुळे राजकारणातील घडामोडींना वेग आलाय. सत्ताधारी काँग्रेसमध्ये तर मुख्यमंत्रीपदासाठी मोठी रेस सुरू होती. काँग्रेसचा आक्रमक चेहरा असलेले प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी सुरुवातीपासून स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणलं. दुसरीकडे काँग्रेसने ऐन निवडणुकीच्या आधी अमरिंदर सिंग यांच्याकडील मुख्यमंत्रीपद चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे देत मोठा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये दोन स्पष्ट गट पडलेले दिसत आहेत. अमरिंदर सिंग यांचा एक गट तर काँग्रेसपासून वेगळा होऊन भाजपासोबत गेलाय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चरणजीत सिंग चन्नी यांना आपला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित केलं. यानंतर अनेकांना आश्चर्य वाटलं. असा निर्णय घेण्यामागील नेमकं कारण काय असाही प्रश्न विचारला जात आहेत. याचाच हा खास आढावा.

पंजाबमधील दलित मतदारांभोवतीचं राजकारण

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीत चन्नी सर्वात पुढे जाण्याचं कारण पंजाबमधील दलित राजकारण असल्याचं जाणकार सांगत आहेत. २०११ च्या जनगणननेनुसार पंजाबची एकूण लोकसंख्या २ कोटी ७७ लाख इतकी आहे. यात दलित लोकसंख्येचा वाटा ३१.९ टक्के इतका आहे. असं असलं तरी यात दलित हिंदू नागरिकांची संख्याही मोठी आहे. पंजाबमध्ये एकूण ५३ लाख १९ हजार दलित शीख आहेत आणि ३४ लाख ४२ हजार दलित हिंदू आहेत. दलित शीख आणि दलित हिंदू समुदाय देखील वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागलेला आहे.

दलित शिखांची संख्या आणि वेगवेगळ्या पंथातील विभागणी

दलित शीख समुदायात प्रमुख ४ पंथ आहेत. धार्मिक, वाल्मिकी, रामदासी आणि अदधर्मी असे हे ४ पंथ आहेत. पंजाबमध्ये जवळपास २५ लाख ६२ हजार धार्मिक दलित शीख आहेत. यानंतर क्रमांक येतो रामदासी दलित शिखांचा, त्यांची लोकसंख्या १४ लाख ४३ हजार इतकी आहे. याशिवाय २ लाख ७ हजार वाल्मिकी दलित शीख आणि ८६ हजार अदधर्मी दलित शीख आहेत. याशिवाय पंजाबमध्ये २७ हजार ३९० दलित बौद्ध देखील आहेत.

पंजाबमधील दलित समुदायातील कोणत्या पंथाचा राजकीय कल कुठे?

परंपरेने चामड्याच्या व्यवसायात असलेला रामदासी आणि अदधर्मी दलित शिखांचा कल चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे असल्याचं स्पष्ट दिसतं. सर्वात जास्त संख्येने असलेल्या मजहबी शिखांचा कल काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल अशा दोन्हींकडे दिसतो. याशिवाय शहरांमध्ये राहणाऱ्या वाल्मिकी दलित शिखांचा कल सामान्यपणे काँग्रेसकडे दिसला आहे.

हेही वाचा : सिद्धू की चन्नी? पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंपत्रीपदाचा उमेदवार कोण? राहुल गांधींकडून ‘या’ नावाची घोषणा

मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेससह पंजाबमध्ये काय वातावरण?

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार लुधियानातील रॅलीत उपस्थित काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकर्ते यांनी सिद्धू यांच्या नावाची घोषणा काँग्रेससाठी राजकीय आत्महत्या ठरली असती इथपर्यंत मत व्यक्त केलंय. कारण सिद्धू यांनी स्वकेंद्री वक्तव्यांमधून काँग्रेस पक्षांतर्गत आपल्या विरोधकांचीच संख्या अधिक वाढवली आहे. अगदी सिद्धू यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी देखील पंजाबमधील गावागावात मुख्यमंत्रीपदासाठी चन्नी यांच्या नावालाच पसंती असल्याचं म्हटलंय.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on panjab assembly election congress cm candidate and dalit politics pbs
First published on: 07-02-2022 at 14:06 IST