रेश्मा राईकवार
९४वा ऑस्कर पुरस्कार समारंभ दरवर्षीप्रमाणे दिमाखात पार पडला. चर्चेतल्या आणि सर्वाधिक नामांकने मिळवणाऱ्या चित्रपटांना फटकारत ‘कोडा’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मिळालेला पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या विल स्मिथचे सूत्रसंचालक ख्रिस रॉकला कानशिलात लगावणे ते रशिया-युक्रेन युद्धातील बळींना श्रद्धांजली देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा गाजावाजा झाला. आपल्याकडच्या माध्यमांनीही या लोकप्रिय गोष्टींना उचलून धरले; या सगळ्या भाऊगर्दीत भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेल्या एका पुरस्काराचे कौतुक मात्र म्हणावे तितके झाले नाही. यंदा तांत्रिक विभागात सर्वाधिक नामांकने मिळवणाऱ्या ‘ड्यून’ चित्रपटाच्या व्हीएफएक्ससाठी ‘डीएनईजी’ या व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन कंपनीला सातव्यांदा ऑस्कर सन्मान मिळाला.
‘डीएनईजी’चे ऑस्कर यश आणि नमित मल्होत्रा…
व्हीएफएक्ससाठी सातव्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या ‘डीएनईजी’ या व्हीएफएक्स कंपनीचे अध्यक्ष आहेत, नमित मल्होत्रा. देशात अॅनिमेशन – व्हीएफएक्स या संकल्पनेला मिसरुडही फुटले नव्हते तेव्हा १९९७ मध्ये नमित मल्होत्रा यांनी वडिलांच्या गॅरेजमध्ये प्राईम फोकस ही चित्रपटांच्या सीजीआयचे (कॉम्प्युटर ग्राफिक्स) काम सांभाळणारी कंपनी सुरू केली होती. हिंदी चित्रपट हे व्हीएफएक्स – अॅनिमेशनच्या वापरापासून फार दूर होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात हॉलिवूडपट, अॅनिमेशनपट आणि मालिका यांचे काम मोठ्या प्रमाणावर केले जायचे. हळूहळू व्हीएफएक्स-अॅनिमेशन क्षेत्रात नावारूपाला आलेल्या या कंपनीला थेट हॉलिवूडमध्ये नेण्यासाठी नमित यांनी कंबर कसली. त्यांनी लंडनमधील ‘डबल निगेटिव्ह’ (डीएनईजी) हा स्टुडिओ ताब्यात घेतला.
नमित यांनी या स्टुडिओची सूत्रे हातात घेण्याआधी हॉलिवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलानच्या ‘इन्सेप्शन’ या चित्रपटासाठी स्टुडिओला पहिला ऑस्कर मिळाला होता. नमित यांच्या नेतृत्वाखाली ‘डीएनईजी’ने आत्तापर्यंत सहा ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत, तेही नामांकित स्टुडिओची निर्मिती असलेल्या चित्रपटांसाठी… नमित यांच्या स्डुडिओचे ९५ टक्क्यांहून अधिक उत्पन्न हे आजही हॉलिवूडपटांकडूनच येते. मात्र त्यांच्या मते उत्पन्नाची ही तुलना करणे योग्य ठरणार नाही. हा कामाचे प्रमाण आणि त्याबदल्यात मिळणारा आर्थिक मोबदला याचा प्रश्न आहे. हॉलिवूडच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये व्हीएफएक्सचे आर्थिक मूल्य कमी आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीत फरक दिसून येतो, मात्र हे चित्र लवकरच बदलणार आहे. भारतातही ‘बाहूबली’नंतर ‘आरआरआर’, ‘ब्रम्हास्त्र’सारख्या पूर्णपणे व्हीएफएक्सवर आधारित चित्रपट निर्मितीची संख्या वाढत चालली आहे, असे त्यांनी सांगितले.
व्हीएफएक्स – अॅनिमेशन उद्योगाचा भारतात वेगाने विस्तार
भारतातील मनोरंजन उद्योगाचा विचार करता सर्वाधिक उत्पन्न देणारे क्षेत्र म्हणून व्हीएफएक्स – अॅनिमेशन उद्योगाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. ‘फिक्की’च्या यंदाच्या आर्थिक अहवालानुसार गेल्या वर्षी एकट्या व्हीएफएक्स उद्योगाची उलाढाल ३८.२ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली होती. यात १०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्राची उलाढालही ४९ टक्क्यांनी वाढली असून १४.४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली आहे. देशभरात सध्या ९५४ स्टुडिओ कार्यरत असून १३९ प्रशिक्षण केंद्रे आहेत. हा आकडा पुढच्या दोन वर्षांत आणखी वेगाने वाढण्यामागे आयटी क्षेत्रातील भारतीयांची प्रगती आणि डिजिटल आशयनिर्मितीची वाढती मागणी हे दोन महत्त्वाचे घटक ठरले आहेत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही वैशिष्ट्ये…
१. पूर्वीसारखी भारतातील व्हीएफएक्स कंपन्या केवळ हॉलिवूडपटांच्या व्हीएफएक्स कामांसाठीचे बॅक ऑफिस म्हणून गणले जात होते. आता मुळात भारतातच ओटीटी आणि चित्रपटांची निर्मिती झपाट्याने वाढलेली असल्याने व्हीएफएक्सची मागणीही वाढती राहिली आहे. भारतात नेटफ्लिक्स, अॅमेझॉनसह वेगवेगळ्या माध्यम व्यासपीठांवरून अॅनिमेटेड आशयाची प्रेक्षकसंख्या ६०० ते ९०० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत व्हीएफएक्स, अॅनिमेशन कामाचा व्याप वाढत चालला आहे.
२. चित्रपट निर्मितीचे बजेट ठरवत असताना व्हीएफएक्स कामांसाठी एकूण बजेटपैकी केवळ ५ ते ८ टक्क्यांची तरतूद केली जायची. आता चित्रपट असो, वेबमालिका असो वा मालिका… व्हीएफएक्सचे बजेट कमीत कमी १५ ते २० टक्के असते.
३. चित्रपटाचे पटकथा लेखन झाल्यानंतर कथा पुढे कशी जाणार, हे आधी व्हिज्युअल इफेक्ट टीमबरोबर बसून ठरवले जाते. त्यानुसार पुढे कलाकारांची निवड, चित्रीकरण स्थळ वगैरे बाबींचा विचार केला जातो. एकेकाळी पोस्ट प्रॉडक्शनसाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रातील तज्ज्ञांचे काम प्री प्रॉडक्शन स्टेजमध्येच सुरू केले जाते.
४. करोना काळातील निर्बंध या क्षेत्राच्या पथ्यावर पडले आहेत. निर्बंधांमुळे चित्रिकरणावर आलेली मर्यादा आणि प्रत्यक्ष सेट उभारून चित्रीकरण करायचे म्हटल्यावर वाढणारा आर्थिक बोजा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन व्हीएफएक्स वापरावर जास्त भर दिला जातो आहे. सेट न उभारताही मोठमोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण सोपे होऊ लागले आहे.
५. ‘वर्क फ्रॉम होम’मुळेही या क्षेत्राला फायदा झाला आहे. याआधी कधीही व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन आर्टिस्ट्सना घरून काम करण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र करोना काळात तंत्रज्ञानामुळे अनेक सॉफ्टवेअर विकसित झाली. घरच्या घरी सेटअप करून काम करणे आर्टिस्टना शक्य होऊ लागले आहे. शिवाय, कोणत्याही देशात बसून कुठल्याही भाषेतील, प्रांतातील व्हीएफएक्स करणे सोपे झाले असल्याने त्याचाही या क्षेत्राच्या विस्तारासाठी फायदा होतो आहे.
हेही वाचा : विश्लेषण : विल स्मिथच्या पत्नीला असलेला Alopecia Areata आजार म्हणजे काय? जाणून घ्या याची लक्षणे
भविष्याची नांदी
बीसीजी आणि सीआयआयच्या अहवालानुसार ‘अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स’ (एव्हीजीसी) क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा वाटा १० टक्के एवढा आहे. पुढच्या काही वर्षांत जगभरातील एव्हीजीसी उद्योगात भारताचे योगदान दुपटीने म्हणजे २० ते २५ टक्के एवढे वाढेल, असे फिक्कीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एव्हीजीसी हे कल्पकता आणि तंत्रज्ञान याचा मेळ घालत पुढे जाणाऱ्या तंत्रज्ञ-कलाकारांचे क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात अग्रणी राहण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचे सूतोवाच नुकतेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी केले आहे. देशाच्या आर्थिक वाढीसाठी या क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेत लवकरच एव्हीजीसी उद्योगाच्या दृष्टीने काही योजना-धोरणे राबवण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत तरुणांना या क्षेत्रातील कौशल्य- प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.