सिद्धार्थ खांडेकर siddharth.khandekar@expressindia.com

युक्रेनवर विविध कारणांसाठी रशियाने २६ फेब्रुवारी रोजी आक्रमण केल्याच्या घटनेला नुकतेच ५० दिवस पूर्ण केले. दुसऱ्या महायुद्धानंतरच प्रथमच युरोपातील एखाद्या देशाने शेजारी देशावर आक्रमण केल्यामुळे जागतिक राजकारणाला नवी कलाटणी मिळालेली दिसून येते. अविरत मनुष्यहानी आणि वित्तहानी होऊनही युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली तो देश चिवट प्रतिकार करत आहे. सैन्यबळ आणि युद्धसामग्रीत संख्येने अधिक बलशाली असूनही रशियाला आतापर्यंत एकही निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. युद्ध सुरूच आहे. शस्त्रसंधीची पुसटशी चाहूलही दिसत नाही. युक्रेनच्या आग्नेयेकडील मारियुपोल हे मोक्याचे बंदर जिंकण्यासाठी रशियन फौजांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. परंतु त्यांना तोकडय़ा मनुष्यबळ व सामग्रीनिशी प्रतिकार करून युक्रेनियन सैन्याच्या दोन तुकडय़ांनी रशियन फौजांना रोखून धरले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाची सद्य:स्थिती काय?

रशियाचे आक्रमण युक्रेनच्या उत्तर, ईशान्य आणि आग्नेयेकडून सुरू झाले होते. सुरुवातीचा तुरळक अपवाद वगळल्यास त्यांना आजतागायत एकही निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. आता चेर्नोबिल, चेर्नीव्ह, बुचा, सुमी आणि राजधानी कीव्ह येथे युक्रेनियन प्रतिकारापुढे रशियाला फार मजल मारता आली नाही. परंतु पूर्व आणि आग्नेयेकडील खार्कीव्ह, इझ्युम, मेलिटोपोल, खेरसन, मारियुपोल या शहरांमध्ये काही प्रमाणात रशियाचे वर्चस्व दिसून येत आहे. यांतील बहुतेक शहरे डोन्बास टापूत म्हणजे डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या रशियनबहुल प्रांतांमध्ये येतात. क्रिमियापाठोपाठ युक्रेनचे हे दोन प्रांतही रशियाला जोडण्याचा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा मनसुबा आहे.

युक्रेनचा प्रतिकार कशा प्रकारे दिसून येतो?

काळय़ा समुद्रातील रशियन आरमाराचा मेरुमणी म्हणवली जाणारी मोस्कावा ही युद्धनौका युक्रेनच्या दोन नेपच्युन क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त केली.

तिचे नुकसान आग लागल्यामुळे झाले, अशी सारवासारव रशियाने केली. परंतु युक्रेनही प्रतिहल्ला करू शकतो, असा संदेश या घटनेतून प्रसृत झाला. कीव्ह, युक्रेनच्या पश्चिमेकडील ल्विव्ह, खारकीव्ह या शहरांवर रशियाकडून झालेले क्षेपणास्त्र हल्ले भीषण होते. परंतु एकही शहर रशियाला आतापर्यंत निर्णायक जिंकता आलेले नाही. युक्रेनचा प्रतिकार कोसळावा यासाठी रुग्णालये, रेल्वेस्थानके, निर्वासीतांची आश्रयस्थाने, निर्वासीतांच्या मार्गिका यांनाही रशियाने लक्ष्य केले. त्यातून मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. त्यामुळेच त्यांनी आग्नेयेकडील महत्त्वाचे बंदर असलेल्या मारियुपोलकडे मोर्चा वळवला आहे.

मारियुपोल बंदर किती दिवस टिकाव धरेल?

अझॉव्ह समुद्रावरील हे बंदर ताब्यात घेतल्याचा दावा रशियाकडून आजवर अनेकदा झाला, पण अजूनही हे शहर लढतच आहे आणि ते जिंकण्यासाठी रशियाचे हल्ले सुरूच आहेत. रशियन आक्रमण सुरू झाले, जवळपास तेव्हापासूनच मारियुपोल लक्ष्य ठरले होते. या शहरातील वीजपुरवठा यंत्रणा, बॉम्बरोधक आश्रयस्थाने, रुग्णालये यांच्यावर सातत्याने मारा होतो आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी युद्धगुन्हे ठरतील असे अत्याचार केले. त्यांची तीव्रता मारियुपोलमध्ये सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. या शहरात आणि परिसरात युक्रेनियन सैन्याच्या दोन तुकडय़ा अजूनही टिकाव धरून आहेत. या भागातील अझॉव्ह बटालियन ही २०१४ मध्ये रशियन बंडखोरांकडून मारियुपोलचा ताबा परत मिळवण्यासाठी उभारली गेली. या बटालियनमध्ये कडव्या उजव्या विचारसरणीचे, नाझीवादी असल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. ‘पुतिन यांनी युक्रेनवरील आक्रमणाला निर्नाझीकरणाची जोड दिली’, त्या दाव्याच्या मुळाशी प्रामुख्याने अझॉव्ह राष्ट्रवादी होते. अझॉव्ह बटालियन आणि मरीन ब्रिगेड या दोन तुकडय़ांनी मारियुपोलचे पूर्ण पतन होऊ दिलेले नाही. मात्र त्यांची रसद संपुष्टात येत असून, अधिकाधिक नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात असल्यामुळे आणखी किती काळ प्रतिकार करत राहायचा, याविषयी निर्णय युक्रेनच्या सरकारला व लष्कराला घ्यावा लागेल.

सध्या पुतिन यांचे नेमके उद्दिष्ट काय दिसते

पुतिन यांनी हल्ल्याचा रोख प्राधान्याने युक्रेनच्या पूर्वेकडे वळवला आहे हे उघड आहे. मारियुपोलची लढाई त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरली आहे. वास्तविक एखादा निर्णायक विजय मिळवण्यासाठी त्यांना आताच इतकी घाई का झाली, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर बहुधा ९ मे या तारखेमध्ये मिळू शकते. दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियाने जर्मनीच्या पूर्वभागावर निर्णायक विजय याच दिवशी मिळवला. हा दिवस रशियात विजय दिन म्हणून जंगी संचलने वगैरे भरवून साजरा केला जातो. त्या दिवसापर्यंत एखादा तरी महत्त्वाचा विजय पदरात पाडून घेण्याची पुतिन यांची इच्छा असावी. या मोहिमेसाठी त्यांनी अनेक्झांडर द्वोर्निकॉव्ह या मुरब्बी जनरलची नियुक्ती केलेली आहे. मात्र पुन्हा एकदा रशियन रणनीतीच्या मर्यादा या निमित्ताने उघडय़ा पडल्या. पाश्चिमात्य देशांकडून सातत्याने मिळत असलेली आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत आणि मारियुपोलच्या पतनास होत असलेल्या विलंबामुळे इतरत्र मोर्चेबांधणी मजबूत करण्याची उसंत आणि संधी युक्रेनियन फौजांना मिळालेली दिसते.