राखी चव्हाण

जैवविविधता संवर्धनात अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा गिधाड पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने गिधाडाच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्रांसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. गिधाड संवर्धन २०२०-२०२५ करिता कृती आराखड्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने या आराखड्याला मान्यता दिली आहे.

Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Tandlyachya pithache sandge recipe
झटपट दुप्पट फुलणारे तांदळाचे सांडगे; ‘या’ पद्धतीन बनवा कुरकुरीत सांडगे

गिधाडे निसर्गमुक्त कशी केली जातात?

गिधाडांना संवर्धन केंद्रात दिलेले खाद्य खाण्याची सवय लागली असते. त्यामुळे सुरुवातीला पक्षी उडून जात नाही. अशा वेळी त्यांच्या संवर्धन कार्यात असणारे शास्त्रज्ञ जंगली गिधाडांना खाद्य टाकून बोलावतात. ती आली की संवर्धन प्रकल्पाअंतर्गत कृत्रिम प्रजनन केंद्रातील गिधाडांना बाहेर काढले जाते. जंगली गिधाडांसोबत ते एकत्र येऊन खाद्य खातात. बरेचदा झाडांवर बसलेल्या जंगली गिधाडांना बघून खुल्या पिंजऱ्यातील गिधाडे केंद्रात परत येतात. त्यांना पुन्हा बाहेर सोडले जाते. तब्बल महिनाभर ही प्रक्रिया चालते. त्यानंतर जंगली गिधाडांसोबत ते त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत जातात. सुरुवातीच्या काळात ते जवळपासच्या झाडांवरच राहतात. त्यानंतर हळूहळू दूर अंतरावर जातात, परदेशात देखील पोहोचतात. त्यामुळेच या गिधाडांना चिप लावून सोडले जाते.

हेही वाचा >>>भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात नेताजींच्या आझाद हिंद फौजचे होते महत्त्वपूर्ण योगदान, वाचा सविस्तर..

कृत्रिम प्रजनन केंद्र कुठे?

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाम या चार राज्यांत प्रजनन केंद्रे आहेत. या चार प्रजनन केंद्रांमध्ये ७५० गिधाडे निसर्गमुक्त होण्यासाठी तयार आहेत. ही गिधाडे सोडावीत की सोडू नये याबाबत संभ्रम आहे. मात्र, संवर्धनातील निसर्गमुक्त होण्यासाठी तयार असणाऱ्या पक्ष्यांना सोडण्यात यावे अशीच भूमिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची आहे. २००४ पासून सोसायटीने गिधाडांच्या कृत्रिम प्रजननाचे काम सुरू केले. या केंद्रात ८० टक्के मोठी गिधाडे तर २० टक्के पिल्ले आहेत. हा प्रकल्प सुरू झाला त्याचवेळी या गिधाडांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे हा उद्देश होता.

महाराष्ट्रात या केंद्राला कुठे मान्यता?

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने देशातील गिधाडांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत देशाच्या वेगवेगळ्या भागांत गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रे उभारण्यात येत आहेत. निसर्गातील स्वच्छतादूत म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजननासाठी महाराष्ट्रातील पहिला संवर्धन प्रकल्प पुणे जिल्ह्यात सुरू होत आहे. वन विभाग आणि इला फाउंडेशन यांच्यामध्ये या प्रकल्पासाठी नुकताच दहा वर्षांचा करार झाला आहे. पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर जेजुरीजवळ पिंगोरी गावामध्ये केंद्र उभारणी सुरू झाली आहे. वर्षभरात केंद्र कार्यान्वित होणार असून, तिथे महाराष्ट्रातील ‘गिप्स बेंगालेन्सिस’ आणि ‘गिप्स इंडिकस’ या दोन प्रजातींचे संवर्धन करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : कॅनडाकडून दोन वर्षांसाठी विद्यार्थी व्हिसात कपात करण्याचा निर्णय; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार?

गिधाडांच्या संवर्धनाची गरज का?

गिधाडे निसर्गातील मृतदेह आणि इतर सेंद्रिय कचरा साफ करून परिसंस्था स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. गिधाडे नसलेल्या भागात जनावरांचे मृतदेह नैसर्गिकरित्या कुजण्यास तीन ते चार पट जास्त वेळ लागतो. गिधाडे मृतदेह खात असल्याने तो कचरा साचून राहात नाही. म्हणूनच गिधाडांना निसर्गाचे सफाई कामगार असेही म्हणतात. गेल्या दोन दशकात वेगवेगळ्या कारणांमुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. संरक्षित जागेत नैसर्गिक अधिवासासारखी स्थिती निर्माण करून त्यांची संख्या वाढविण्यावर यापुढे भर द्यावा लागणार आहे.

जगभरात गिधाडांच्या किती प्रजाती?

जगभरात गिधाडांच्या तब्बल २३ प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. यांपैकी मुख्यतः भारतात ७ प्रजातींची गिधाडे आढळून येतात. यामध्ये पांढऱ्या पाठीचे गिधाड, राज गिधाड (लाल डोक्याचे गिधाड), युरेशियन ग्रिफॉन (करडे गिधाड), हिमालयीन ग्रिफॉन (करडे गिधाड), पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड), काळे गिधाड (सिनेरियस गिधाड) आणि लांब चोचीचे गिधाड समाविष्ट आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अनुसूची एकमध्ये गिधाडांचा समावेश करण्यात आला आहे. तर निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘आययूसीएन’ने (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) गिधाडे नष्टप्राय होत असल्याचे घोषित केले आहे.

गिधाडांच्या मृत्यूचे मुख्य कारण काय?

गिधाडांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणारे एक औषध म्हणजे ‘डायक्लोफिनॅक’. हे औषध वेदनाशामक म्हणून उपयोगी ठरते. प्राण्यांनादेखील वेदनाशामक म्हणून हेच औषध दिले जाते. जनावरे मेल्यानंतर ती फेकून दिली जातात आणि मेलेल्या जनावरांचे मांस हेच गिधाडांचे प्रमुख अन्न आहे. अशा वेळी या मृत जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडे मृत्युमुखी पडतात. डायक्लोफिनॅक औषध इतर जनावरांसाठी जरी वरदान ठरत असले आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी होत असल्या तरी गिधाडांना मात्र याची किंमत चुकवावी लागते. या औषधावर बंदी असली तरीही ती जनावरांवरील उपचारासाठी वापरली जातात.

rakhi.chavhan@expressindia.com