अनिश पाटील

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा भरदिवसा गोळ्या झाडून खून, त्यानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार आणि गुरुवारी रात्री बोरिवलीतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा खून अशा लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यात जशी राजकीय मुद्द्यांची चर्चा रंगते आहे, तितकीच सहजपणे अग्निशस्त्रे म्हणजेच पिस्तुल वा बंदुक उपलब्ध कशी होतात असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. या प्रकरणांपैकी गायकवाड यांच्याकडे परवानाधारक अग्निशस्त्र होते. याचा परवाना मिळवण्यासाठी कोणत्या प्रक्रियेला समोरे जावे लागते याचा आढावा.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर
cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन

शस्त्र परवाना कुणाला मिळू शकतो?

अधिकृतरीत्या अग्निशस्त्र बाळगण्याची मुभा असली, तरी सरसकट कुणालाही त्याची परवानगी मिळत नाही. अग्निशस्त्र परवाना मिळवण्याच्या नियमावलीमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीस स्वतःच्या जीविताला धोका आहे असे वाटत असल्यास अशी व्यक्ती अग्निशस्त्र परवान्यासाठी अर्ज करू शकते. अशा व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना मिळू शकतो. याशिवाय, सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना नियमावलीची पूर्तता केल्यानंतर दिला जातो.

हेही वाचा >>>पाकिस्तानातलं घराणेशाहीचं राजकारण

परवान्यासाठी कोठे अर्ज करावा लागतो?

महानगरांमध्ये शस्त्र परवाना हवा असल्यास पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय विभागात अर्ज करावा लागतो. एका ठराविक नमुन्याप्रमाणे हा अर्ज करावा लागतो. जेथे पोलीस आयुक्तालय नसेल, तेथे अधीक्षक कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. बहुतेक अर्ज स्वसंरक्षणाच्या कारणासाठी केले जातात. याशिवाय मालमत्ता संरक्षण, पीक रक्षणासाठीही अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना घेता येऊ शकतो.

प्रक्रिया काय?

आधारकार्ड, रहिवासी दाखला, पारपत्र असल्यास त्याची प्रत द्यावी लागते. छायाचित्र, मागील तीन वर्षांचा मिळकतीचा पुरावा, कोणती बंदुक किंवा पिस्तुल घेणार त्याचे विवरण द्यावे लागते. तसेच चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, कोणत्या कारणासाठी अग्निशस्त्र परवाना हवा आहे त्याची माहिती द्यावी लागते. हे सर्व मुख्यालयात अर्जासह द्यावे लागते. विविध कागदपत्रांसह परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर स्थानिक पोलीस व पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडे असे अर्ज पडताळणीसाठी पाठवले जातात. त्यात शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी नोंद आहे का, ते तपासले जाते. पत्त्याची पडताळणी केली जाते आणि त्या व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाते. त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्राचीही पडताळणी केली जाते. अर्जदाराला मुलाखतीसाठी बोलवण्यात येते. मुलाखतीनंतर अर्जदाराचा अहवाल गुन्हे शाखा आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडे (एनसीआरबी) पाठवण्यात येतो. तिथून कोणातही आक्षेप घेण्यात आला नाही आणि पोलिसांनीही अर्जाबाबत आक्षेप घेतला नाही, तरच संबंधित व्यक्तीला अग्निशस्त्र परवाना मिळतो.

हेही वाचा >>>विश्लेषण : मोदी सरकारने लोकसभेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत नेमकं काय आहे? वाचा सविस्तर…

कोणत्या अग्निशस्त्रासाठी परवाना मिळतो?

लष्कराकडून वापरण्यात येणारी आधुनिक शस्त्रे वापरण्याची परवानगी सर्वसामान्य नागरिकांना नसते. त्यामुळे अशा अद्ययावत शस्त्रांसाठी कोणतेही परवाने दिले जात नाहीत. सामान्य नागरिकांना मोजकीच अग्निशस्त्रे बाळगण्याची परवानगी मिळू शकते. त्यात पिस्तुल, शॉटगन, हँडगन आणि स्पोर्टगन या तीन प्रकारच्या बंदुकांसाठी परवाना मिळतो. स्पर्धांसाठी व सुरक्षेसाठी रायफलचाही परवाना दिला जातो.

परवानाधारक अग्निशस्त्राबाबत कोणती काळजी घ्यावी लागते?

परवाना मिळाल्यानंतर अग्निशस्त्र बाळगण्याबाबत काही नियम व अटी असतात. त्याच पालन केले नाही, तर परवाना रद्द केला जाऊ शकतो. बेकायदा कृत्यात वापर झाल्यास स्थानिक पोलीस परवाना रद्द करण्याची शिफारसी करतात. तसेच शस्त्राचा वापर इतर व्यक्तीने केल्यासही परवाना रद्द केला जाऊ शकतो. निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांकडून परवानाधारक अग्निशस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले जातात. याशिवाय वैद्यकीय कारणावरूनही परवाना रद्द केला जाऊ शकतो.