British Royal Navy Hindu priest हिमाचल प्रदेशातील एका पंडिताची इतिहासात पहिल्यांदाच रॉयल नेव्हीचे पहिले हिंदू धर्मगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. ३९ वर्षीय भानू अत्री हे हिमाचल प्रदेशातील आहेत. आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते ब्रिटनमधील एसेक्स येथे गले. त्यांनी गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील प्रतिष्ठित ब्रिटानिया रॉयल नेव्हल कॉलेजमधून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांची ही नियुक्ती हिंदू समुदायासाठी विशेष आहे. मुख्य म्हणजे रॉयल नेव्हीच्या इतिहासात पहिल्यांदाच ख्रिश्चन नसलेल्या व्यक्तीची धर्मगुरू (चॅप्लिन) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. नेव्हीतील १४८ नवीन अधिकारी आणि दोन धर्मगुरूंनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यात अत्री यांचादेखील समावेश होता. भानू अत्री कोण आहेत? नौदलात त्यांची भूमिका काय असेल? आणि या महत्त्वाच्या पदासाठी त्यांची निवड का करण्यात आली? त्याविषयी जाणून घेऊयात.

धर्मगुरू (चॅप्लिन) कोण असतात?

  • रॉयल नेव्हीमध्ये चॅप्लिन हे धार्मिक मार्गदर्शन, आध्यात्मिक उपदेश व नैतिक पाठिंबा देण्याचे काम करतात. त्यांच्या नियुक्तीमध्ये व्यक्तीचा धर्म पाहिला जात नाही.
  • ही रॉयल नेव्हीतील कोणतीही व्यक्ती असू शकते. जहाज, पाणबुडी किंवा लष्करी तळावर त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
  • ते गरजूंचे सांत्वन करतात आणि त्यांना योग्य तो सल्ला देतात. अत्री यांना लंडनमधील हिंदू पुजारी म्हणून अनेक वर्षांचा अनुभव आहे.
  • त्यामुळे ते आपल्या कामात स्वतःच्या परंपरांचादेखील समावेश करतील, असे बोलले जात आहे.
  • कर्मचार्‍यांचे मार्गदर्शन करण्याबरोबरच ते त्यांच्या धर्माचे पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हिंदू प्रार्थना विधी पार पाडतील.
  • आज रॉयल नेव्हीमध्ये सुमारे ४० हिंदू अधिकारी पूर्णवेळ सेवा देत आहेत आणि मेरीटाइम रिझर्व्हमध्ये आणखी ३० हिंदू अधिकारी आहेत. संपूर्ण ब्रिटनच्या सैन्यात १,५५० हून अधिक हिंदू अधिकारी पूर्णवेळ सेवा देत आहेत. त्यापैकी बहुतांश जण सैन्यात आहेत.
भानू अत्री यांनी नौदल कॅडेट्सपेक्षा वेगळा अभ्यासक्रम निवडला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भानू अत्री कोण आहेत?

भानू अत्री यांनी नौदल कॅडेट्सपेक्षा वेगळा अभ्यासक्रम निवडला. त्यांनी सहा आठवड्यांचे अधिकारी प्रशिक्षण घेतले. त्यात समुद्रातील बचावाच्या उपाययोजना आणि एचएमएस आयर्न ड्युक (HMS Iron Duke) या युद्धनौकेवर चार आठवड्यांचा अनुभव समाविष्ट होता. त्यानंतर त्यांनी लष्करी चॅप्लिनच्या कर्तव्यांवर केंद्रित असलेले तीन आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले. सर्व कॅडेट्सप्रमाणे अत्री डार्टमाउथ येथील ब्रिटानिया रॉयल नेव्हल कॉलेज (BRNC)मधील २९ आठवड्यांच्या कार्यक्रमात सामील झाले. त्या या कार्यक्रमात नेतृत्व, नौदल इतिहास, नौकानयन, जगण्याचे कौशल्य आणि सांघिक कार्यापर्यंत सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले. वर्ग आणि परेड ग्राऊंड्सव्यतिरिक्त, कॅडेट्सनी डार्टमूरवर काही दिवस सराव केला. तसेच कार्यरत युद्धनौकांवर प्रवास केला आणि डार्ट नदीत ‘वाहना (Vahana)’ बोटींवर प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमाचा समारोप एका औपचारिक पासिंग-आउट परेडने झाला. त्यात त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांनी कॅडेट्सना सन्मानित केले.

आपल्या प्रवासाविषयी बोलताना अत्री म्हणाले, “भारतात वाढलेला एक हिंदू म्हणून इतर विविध धर्मांच्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व करण्याची संधी हिंदू समुदायासाठी महत्त्वपूर्ण आहे. ती नौदलाची विविधता, सर्वसमावेशकता व सर्वांसाठी आध्यात्मिक शिक्षण घेण्याची वचनबद्धता दर्शवते.” ते पुढे, “माझ्या कुटुंबाला खूप अभिमान वाटत आहे. हा अनेक पिढ्यांच्या विश्वास आणि सेवेचा परिणाम आहे,” असेही म्हणाले.

या भूमिकेसाठी अत्री यांची निवड का करण्यात आली?

हिंदू कौन्सिल यूके (HCUK)ने त्यांच्या नियुक्तीबाबत त्यांचे अभिनंदन केले आणि नमूद केले की, कठीण निकषांची पूर्तता केल्यानंतर अत्री यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, धर्म व तत्त्वज्ञानाबद्दल एक तत्त्वनिष्ठ दृष्टिकोन, आध्यात्मिक गुण व हिंदू धर्मग्रंथांच्या पदवीच्या समतुल्य शैक्षणिक पार्श्वभूमी, असे महत्त्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक होते. त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव, आंतरधर्मीय संबंध वाढवण्याची त्यांची क्षमता व इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, या बाबींमुळे ते नौदलाच्या चॅप्लिन पदासाठी एक योग्य उमेदवार ठरले. “या पदाचे प्रशिक्षण खूप कठोर असते. वैद्यकीय तंदुरुस्तीच्या मानकांसह अल्प सूचनेवर २४ तास कर्तव्य बजावण्याची तयारी आवश्यक असते,” असे एचसीयूकेचे संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार अनिल भानोत यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, अत्री यांची नियुक्ती तरुण ब्रिटिश हिंदूंना सैन्यात करिअर शोधण्यासाठी प्रोत्साहित करू शकते. “आपली आध्यात्मिक भूमी भारत असली तरी, आपली कर्मभूमी ब्रिटन आहे,” असे ते म्हणाले. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी अत्री यांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि ही बाब केवळ राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची असल्याचे म्हटले.

एका ‘एक्स’ पोस्टमध्ये सुक्खू म्हणाले, “सोलन जिल्ह्यातील गढखल येथील रहिवासी भानू अत्री यांची ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये हिंदू चॅप्लिन (धर्मगुरू) म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा! ब्रिटिश रॉयल नेव्हीमध्ये ही प्रतिष्ठित जबाबदारी मिळवणारे भानू अत्री हे पहिले भारतीय आहेत. त्यांचे हे यश केवळ हिमाचलसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.”