इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख डेविन बर्निया यांनी मागील आठवड्यात कतारला भेट दिली. गाझामधील शांतता चर्चेला पुन्हा सुरुवात करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गाझामधील युद्ध संपवण्यासाठी झालेल्या चर्चांमध्ये वारंवार अडथळे येत आहेत. या चर्चेत कतार आणि इजिप्त या दोन देशांची मध्यस्थीची भूमिका आहे. इजिप्त हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या शेजारील देश असल्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, कतार या चर्चेत नेमका का सहभागी झाला आहे असा प्रश्न आता पुढे येत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानबरोबरच्या गुप्त बैठकांपासून ते वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील शांतपणे झालेल्या वाटाघाटीमुळे हे लहानसं राष्ट्र आज जगासाठी मध्यस्थीचं आवडतं ठिकाण झालं आहे. भरपूर आर्थिक साधनं आणि तटस्था या जोरावर कतारनं ही भूमिका मिळवली आहे. दरम्यान, कतार हे जागतिक मध्यस्थीचं केंद्र कसं झालं? त्यासंदर्भात घेतलेला हा आढावा…
कतारचा जागतिक राजकारणातील उदय
एकेकाळी ब्रिटीश साम्राज्याच्या नकाशावरील एक लहानसं राष्ट्र असलेल्या कतारने गेल्या काही दशकांत जागतिक राजकारणात आपलं मजबूत स्थान निर्माण केलं. काही वर्षांपूर्वी कतारकडे सौदी अरेबियासारखे धार्मिक महत्त्व किंवा इजिप्तसारखी सांस्कृतिक ताकद नव्हती. १९७१ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक वर्षे कतार एक लहानसं, पारंपरिक आणि आतल्या घडामोडींमध्ये अडकलेलं राष्ट्र म्हणूनच ओळखलं जात होतं. मात्र, १९९० च्या दशकात कतारमध्ये मोठे बदल झाले. या बदलांची पहिली सुरुवात नैसर्गिक वायूच्या साठ्याच्या शोधाने झाली. इराणसोबत असलेला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा कतारला सापडला. यातून कतारला केवळ प्रचंड संपत्तीच मिळाली नाही, तर जागतिक स्तरावरही ताकद मिळाली.
१९९५ मध्ये कतारच्या धोरणांना नवीन दिशा
१९९५ मध्ये झालेल्या एका राजकीय बंडाने कतारच्या धोरणांना नवीन दिशा दिली. सध्याचे अमीर (शासक) शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचे वडील शेख हमाद बिन खलिफा अल थानी यांनी आपल्या वडिलांची जागा घेतली आणि कतारला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचा धाडसी निर्णय घेतला. या धोरणाचा एक भाग म्हणून त्यांनी एका वर्षाच्या आत ‘अल जझीरा’ या वृत्तवाहिनीची स्थापना केली. या वाहिनीने पारंपरिक सरकारी माध्यमांच्या चौकटी मोडून काढल्या. ही वाहिनी स्पष्टवक्तेपणा व संपूर्ण अरब जगताची बाजू घेणारी ठरली, ज्यामुळे अरब जगतातील राजकीय चर्चाच बदलली आणि कतारचं नाव मोरोक्कोपासून मलेशियापर्यंतच्या घराघरात पोहोचलं.
आणखी वाचा : अमेरिकेचा भारताविरोधी डाव, पाकिस्तानशी वाढवली जवळीक; पण शेवट निराशेतच होणार?
याच काळात कतारने आपली परराष्ट्र धोरणे अधिक खुली केली. त्यांनी लंडन येथील प्रसिद्ध ‘हॅरॉड्स’ स्टोअर, पॅरिसचा ‘पॅरिस सेंट-जर्मेन’ फुटबॉल क्लब आणि ‘मिरामॅक्स’ स्टुडिओ विकत घेतले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कतारने २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकाचं (FIFA World Cup) यजमानपद मिळवलं. “कतारच्या नेतृत्वाने राजनैतिक संबंधांना राष्ट्रीय सुरक्षा आणि ओळख निर्माण करण्याचे एक महत्त्वाचं साधन मानलं. त्यांना माहीत होतं की, केवळ लष्करी किंवा आर्थिक ताकदीवर जागतिक प्रभाव पाडता येणार नाही,” असं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. राजर्षी चक्रवर्ती म्हणाले.
कतार कसा झाला जागतिक ‘मध्यस्थ’
कतारनं कोणत्याही एका देशाची बाजू न घेता सगळ्यांशी नातं जपलं. वॉशिंग्टनपासून- हमासपर्यंत आणि तालिबानपासून- इस्रायलपर्यंत सर्वच देशांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत, यामुळे काही लोक कतारला एक व्यवहारिक तटस्थ देश मानतात, तर काहीजण त्यांच्यावर दुहेरी खेळीचा आरोप करतात. आतापर्यंत कतारने मध्यस्थी करून अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडवल्या आहेत. २००८ मध्ये त्यांनी लेबनॉनमधील १८ महिन्यांचं राजकीय संकट संपवण्यास मदत केली. २०१२ मध्ये कतारने सीरियातील निर्वासितांना आश्रय दिला, तर २०२० मध्ये त्यांनी अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करारासाठी मदत केली. केवळ गेल्या एका वर्षातच कतारच्या राजकीय व्यक्तींनी गाझामध्ये युद्धबंदीच्या चर्चा आयोजित केल्या, अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात कैद्यांची अदलाबदल घडवून आणली, रशियाकडून युक्रेनी मुलांची त्यांच्या देशात परत पाठवण्याची व्यवस्था केली आणि वॉशिंग्टनमध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रवांडा या देशांच्या नेत्यांना शांतता करारावर स्वाक्षरी करण्यासाठी एकत्र आणले.
कतारची नेहमीच शांततेची भूमिका
कतारनं इतर गल्फ देशांप्रमाणे लष्करी मोहिमा स्वीकारल्या नाहीत. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील येमेन युद्धात कतार उतरलं नाही, उलट त्यांनी चर्चांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. ही धोरणात्मक दिशा २००३ च्या कतारच्या राज्यघटनेत स्पष्ट झाली, ज्यात परराष्ट्र धोरणाचं मूळ तत्त्व आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता बळकट करणे असं सांगितलं गेलं. भौगोलिक स्थितीनंही कतारला चांगलीच मदत केलेली आहे. सौदी अरेबिया आणि इराणसारख्या प्रादेशिक महासत्तांच्या मधोमध वसलेलं कतार कायम शांततेचं केंद्र झालं आहे. २०१७ मध्ये शेजारील देशांनी कतारवर दहशतवादाला निधी पुरवल्याचा आणि इराणशी जवळीक वाढवल्याचा आरोप करून निर्बंध लादले; पण कतार मागे हटला नाही. उलट त्यानं स्वतंत्र कूटनीती दुप्पट वेगानं राबवली.

कतारला प्रसिद्धी नेमकी कशामुळे मिळाली?
कतारची प्रचंड आर्थिक संपत्तीही त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली. ४५० अब्ज डॉलर्सचा सार्वभौम निधी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे नैसर्गिक वायू साठे असलेल्या कतारनं जगभरातील देशांची विश्वासार्हता मिळवली. त्यांनी जागतिक शिखर परिषदांना प्रायोजकत्व दिलं, पाश्चिमात्य राजधानींमध्ये गुंतवणूक केली, जागतिक दर्जाचं पायाभूत बांधकाम उभारलं. २०२२ चा फुटबॉल विश्वचषक आयोजित करणे हे या प्रक्षेपणाचं सर्वात ठळक उदाहरण ठरलं. कतारचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शांतपणे मध्यस्थी करण्याची पद्धत. कोणताही गाजावाजा न करता मध्यस्थी करण्याची ही पद्धत गोपनीयतेची गरज असलेल्या गटांना आवडली. जुलैपर्यंत कतार एकाच वेळी १० देशांमधील संघर्षांमध्ये मध्यस्थी करत होता. याचे श्रेय कतारचे परराष्ट्रमंत्री व प्रमुख मध्यस्थ डॉ. मोहम्मद बिन अब्दुलाझिझ अल-खुलैफी यांना दिलं जातं. जिथे संघर्ष असेल, तिथे आम्ही असतो, असं त्यांनी द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
कतारसमोरील भविष्यातील आव्हानं कोणती?
आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. राजर्षी चक्रवर्ती यांच्या मते, “अमेरिकेबरोबरची घट्ट मैत्री आणि वादग्रस्त गटांसोबतचे संबंध यामुळे कतारच्या भूमिकेवर भविष्यात टीका होऊ शकते, ज्यामुळे त्याची मध्यस्थी करण्याची क्षमता धोक्यात येऊ शकते.” दरम्यान, अल उदेदसारख्या मोठ्या हवाई तळाला आश्रय दिल्यानं कतारला अमेरिकेचे संरक्षण मिळतं; पण त्याच वेळी अमेरिकेच्या भूमिकेशीही त्यांना जुळवून घ्यावं लागतं. कतारचा अमेरिकेवरील अवलंब, विशेषतः अल उदीद एअर बेसमुळे चर्चेचा विषय ठरतो. अमेरिकेचं संरक्षण कतारसाठी सुरक्षिततेचं कवच आहे, पण त्याच वेळी दोहाचे भाग्य अमेरिकन अजेंड्याशी बांधले जाते. आजचं जग बहुध्रुवीयतेकडे सरकत असताना हे कतारसाठी संकट निर्माण करू शकतं.
हेही वाचा : निवडणूक अधिकाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण असते? निवडणूक आयोगाचे की राज्यांचे?
इराणचा हल्ला आणि कतारची भूमिका
काही महिन्यांपूर्वी अमेरिका व इस्रायलच्या लष्करांनी इराणवर हल्ला केला होता, त्यावेळी या दोन्ही देशांना प्रत्युत्तर देण्याऐवजी इराणने थेट कतारवर क्षेपणास्त्रे डागली. आधुनिक इतिहासात कतारवर झालेला हा पहिला थेट लष्करी हल्ला होता. या हल्ल्यात इराणने डागलेली १४ क्षेपणास्त्रे कतारने रोखली; पण त्यापैकी एक क्षेपणास्त्र जमिनीवर पडलं. सुदैवानं त्यात कोणालाही दुखापत झाली नाही. कतारनं या हल्ल्याचा निषेध केला, मात्र त्यांनी इराणवर पलटवार केला नाही. दरम्यान, या हल्ल्यानंतर कतारनं शांत राहून इराण व इस्रायलमध्ये चर्चेचा मार्ग मोकळा करून दिला. काही तासांतच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहाशी पुन्हा संपर्क साधला आणि इस्रायलनं युद्धविरामाला सहमती दिली.
कतार भविष्यात नवीन मित्र शोधणार?
डॉ. चक्रवर्ती सांगतात, “सध्या अमेरिका पूर्णपणे कतारच्या बाजूनं काम करीत आहे. पण, चीनने जागतिक महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, त्यामुळे अमेरिकेनं भविष्यात कधी कतारचा पाठिंबा काढला, तर त्यांना नवीन मित्र शोधणं शहाणपणाचे ठरेल. कतारची मध्यस्थी करण्याची भूमिका पारंपरिक मित्र राष्ट्रांनाही दुखावू शकते. हमास, तालिबान आणि इतर वादग्रस्त गटांशी संबंध ठेवल्यामुळे इस्रायल, इजिप्त आणि युरोपमधील काही देशांमध्ये त्यांच्याबद्दल संशय निर्माण झाला आहे. वाटाघाटी यशस्वी न झाल्यास कतारच्या विश्वासार्हतेला धक्का बसू शकतो, त्यामुळे लवचिकता न गमावता कतारला आपली भूमिका सातत्यानं बदलत राहणं आवश्यक आहे, जेणेकरून ते अस्थिर वाटणार नाहीत.