Mystery of Bermuda Triangle solved: बर्म्युडा त्रिकोणाशी संबंधित कटकारस्थानांच्या आणि रहस्यमय कथांच्या चर्चा आजही सुरूच आहेत. गूढ आणि अनाकलनीय गोष्टी नेहमीच लक्ष वेधून घेतात. जहाजं आणि विमानं अचानक गायब होणाऱ्या या कथांनी पिढ्यान्‌पिढ्या लोकांच्या कल्पनाशक्तीला भुरळ घातली आहे. त्यामुळेच या कथा पॉप कल्चरमध्ये अजून अनेक वर्षं जिवंत राहतील. शेवटी, विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि सखोल अभ्यासामुळे या घटनांमागचं वास्तव हळूहळू उलगडेलही. पण तरीही पृथ्वीवरील या गूढ स्थळाभोवतीचं आकर्षण आणि त्यावर आधारित रहस्यमय कल्पना लोकांच्या मनाला भुरळ घालत राहतील, यात शंका नाही. याच गूढ शंकांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ कार्ल क्रुशेलनिकी यांनी बर्म्युडा त्रिकोणात विमानं आणि जहाज नेमकी कशामुळे नाहीशी होतात, या गोष्टीचा पुन्हा एकदा शोध घेण्यास सुरुवात केली.

बर्म्युडा त्रिकोण हा डेव्हिल्स ट्रॅंगल म्हणूनही ओळखला जातो. हा त्रिकोण उत्तर अटलांटिक महासागराच्या पश्चिम भागात आहे. मियामी, बर्म्युडा आणि सॅन हुआन (प्युर्टो रिको) यांच्या मधोमध असलेला हा परिसर जगभरातील लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. कारण इथे गेल्या अनेक दशकांपासून जहाजे आणि विमाने रहस्यमयरीत्या नाहीशी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यासंबंधी असंख्य कटकारस्थानांच्या आणि गूढ कथांच्या चर्चा आजही सुरु आहेत. या ठिकाणी जहाजं बुडून कोणताही मागमूस न लागणे किंवा विमानं उड्डाणादरम्यान अचानक नाहीशी होणे, अशा घटनांमुळे अनेक कथा प्रसृत झाल्या आहेत. काहींनी यात अलौकिक शक्ती, परग्रहवासी किंवा काळाच्या फटींसारख्या कल्पना गुंफल्या. परंतु,ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ कार्ल क्रुशेलनिकी यांनी अमेरिकेच्या NOAA आणि लॉयड्स ऑफ लंडनच्या संशोधनाचा दाखला देऊन हे सिद्ध केलं आहे की, या कथा फक्त मिथकं आहेत.

बर्म्युडा त्रिकोणाचं हे रहस्य खरंच उलगडलं आहे का?

कालांतराने अनेक संशोधक आणि लेखकांनी या रहस्यावर वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आहे. १९७४ साली चार्ल्स बर्लिट्झ यांनी लिहिलेल्या The Bermuda Triangle या पुस्तकात तर त्यांनी या सगळ्या घटनांचा संबंध अटलांटिस आणि परग्रहवासीयांनी केलेल्या अपहरणाशी लावला होता. अशा सनसनाटी गोष्टींनी खरी तथ्यं आणि विज्ञानाचा आवाज मात्र मागे पडला. बर्म्युडा त्रिकोणाबद्दल अनेक गूढ आणि रंगतदार कथा सांगितल्या जातात. परंतु, संशोधकांनी या घटनांमागे शास्त्रीय कारणं शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

संशोधकांनी मांडलेली काही महत्त्वाची तथ्ये

भौगोलिक आणि हवामानातील आव्हानं

बर्म्युडा त्रिकोणाचा भूगोल आणि तिथल्या हवामानाच्या बदलत्या पद्धती, अगदी अनुभवी नेव्हिगेटर्ससमोरही कठीण परिस्थितीत उभी करतात. गल्फ स्ट्रीम नावाची महासागरातील शक्तिशाली लाट फक्त काही मिनिटांत हवामान बदलू शकते, जोरदार वादळं निर्माण करू शकते आणि जहाजांना त्यांच्या मार्गावरून भरकटवू शकते. या भागात उष्णकटिबंधीय वादळं, चक्रीवादळं, वॉटरस्पाऊट्स आणि प्रचंड लाटा (रोग वेव्ह्स) यांचा सतत धोका असतो. अचानक तयार होणारे मायक्रोबर्स्ट्स आणि लहान पण धोकादायक वादळं (squalls) जहाजं आणि विमानांसाठी मोठं संकट ठरू शकतात. इथे अनेक बेटं आणि प्रवाळ खडक असल्यामुळे पाण्यात उथळ मार्ग निर्माण होतात, त्यामुळे जहाजं धडकण्याचा धोका वाढतो. काही ठिकाणी तर चुंबकीय विचलनामुळे कंपास थेट ‘ट्रू नॉर्थ’कडे निर्देश करतो, आणि म्हणूनच नेव्हिगेशनमध्ये गोंधळ होऊ शकतो. अशा सगळ्या परिस्थिती एकत्र आल्या तर अगदी छोटासा हिशोब चुकला तरी मोठा अपघात होऊ शकतो.

Bermuda Triangle

मानवी चूक

शास्त्रज्ञ डॉ. कार्ल क्रुशेलनिकी यांचं मत आहे की, या ठिकाणी जहाज आणि विमानं नाहीशी होण्यामागे काही गूढ शक्ती नसून साध्या मानवी चुका कारणीभूत आहेत. हा भाग जगातील सर्वाधिक वर्दळीचा समुद्री मार्ग असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आपोआपच जास्त असते. जहाज चालवताना किंवा विमानाची झालेली दिशाभूल, नेव्हिगेशनमधील चुका अशा घटना इथे वारंवार घडतात. उदाहरण म्हणून १९४५ साली अमेरिकन नेव्हीच्या पाच टॉर्पेडो बॉम्बफेकी विमानांचं ‘फ्लाइट १९’ हे पथक प्रशिक्षण मोहिमेदरम्यान हरवलं होतं. या पथकाचा प्रमुख असलेला वैमानिक नेव्हिगेशनमध्ये फार कुशल नव्हता, त्यामुळे दिशाभूल होऊन ही दुर्घटना घडली असं मानलं जातं.

रोग वेव्ह्स (प्रचंड लाटा)

काही तज्ज्ञांच्या मते बर्म्युडा त्रिकोणात कधी कधी तब्बल ३० मीटर (सुमारे १०० फूट) उंच लाटा निर्माण होऊ शकतात. अशा लाटा इतक्या प्रचंड असतात की, त्या मोठ्या जहाजांनाही बुडवू शकतात. बीबीसी सायन्स फोकसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, एकाच वेळी दोन-तीन वादळं एकत्र आली तर अशा धोकादायक लाटा तयार होण्याची शक्यता असते. मात्र, या प्रकारच्या लाटा नेमक्या बर्म्युडा त्रिकोणातच होतात, याचा ठोस पुरावा आजवर मिळालेला नाही.

गैरसमज दूर करणारे पुरावे

१९७५ साली लॅरी कुशे यांनी The Bermuda Triangle Mystery: Solved हे पुस्तक काढलं. यात त्यांनी बर्म्युडा त्रिकोणाबद्दल पसरलेल्या अनेक गैरसमजांना खोडून काढलं होतं. त्यांच्या संशोधनातून समोर आलं की, अनेक अहवालांमध्ये चुका होत्या, तर काही ठिकाणी गोष्टींना मुद्दाम अतिशयोक्त स्वरूप दिलं गेलं होतं. खरं पाहता या भागात जहाजं किंवा विमानं हरवण्याच्या घटना जगातील इतर समुद्री भागांपेक्षा वेगळ्या किंवा जास्त नव्हत्या. पण सुरुवातीला ज्या बातम्या समोर आल्या, त्यांनी लोकांचं लक्ष वेधलं आणि नंतर या गोष्टींना सनसनाटी रंग चढला.

बर्म्युडा त्रिकोण इतर समुद्रांपेक्षा धोकादायक नाही

क्रुशेलनिकी, NOAA आणि लॉयड्स ऑफ लंडन यांचे म्हणणे आहे की, बर्म्युडा त्रिकोण हा जगातील इतर समुद्रांइतकाच धोकादायक आहे, त्यापेक्षा जास्त नाही. अपघातांचे प्रमाणही इथे विशेष वेगळे नाही. खरं तर हा भाग जगातील सर्वाधिक गजबजलेल्या समुद्री आणि हवाई मार्गांपैकी एक असल्यामुळे इथे जहाजं आणि विमानांची वर्दळ प्रचंड आहे. त्यामुळे अपघातांची नोंद जास्त दिसते. आकडेवारीतही दिसतं की, जहाजं आणि विमानांच्या संख्येच्या तुलनेत इथले अपघात तुलनेने कमी आहेत. त्यामुळे बर्म्युडा त्रिकोणाभोवती तयार झालेलं गूढ प्रतिमांचं जाळ खोटं ठरतं.

बर्म्युडा त्रिकोणाची कथा कशी सुरू झाली

बर्म्युडा त्रिकोण हा शब्द पहिल्यांदा १९६३ साली लेखक व्हिन्सेंट गॅडिस यांनी वापरला. त्यांनी या भागातील काही नाहीशा होण्याच्या घटनांना जोडून गूढाची छटा दिली. परंतु, १९७४ साली चार्ल्स बर्लिट्झ यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्यात अटलांटिस, परग्रहवासी अपहरण आणि इतर सनसनाटी गोष्टी मिसळल्या. यामुळे या कथांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. क्रुशेलनिकी मात्र अशा कथांवर टीका करतात कारण त्यामागे कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि फक्त लोकांच्या कुतूहलावर आधारलेलं वर्णन आहे.

एक प्रसिद्ध किस्सा-ब्रूस गेरननची कहाणी

१९७० साली वैमानिक ब्रूस गेरनन यांनी एक अनुभव सांगितला. ते बर्म्युडा त्रिकोणातून विमानाने जात असताना त्यांना बोगद्याप्रमाणे दिसणाऱ्या ढगांमध्ये प्रवेश करावा लागला. त्यावेळी त्यांच्या विमानाची उपकरणं नीट चालेनाशी झाली. ढगातून बाहेर पडल्यावर त्यांना वेळेत जवळपास ३० मिनिटांचं अंतर दिसलं. ही गोष्ट नंतर अनेक पुस्तकं, माहितीपट आणि गूढ चर्चांमध्ये प्रसिद्ध झाली. काहींनी याला काळाच्या फटीचा (time warp) पुरावा मानलं. पण क्रुशेलनिकी आणि इतर तज्ज्ञांच्या मते, ही केवळ वैयक्तिक कहाणी आहे, ज्याला ठोस पुरावे नाहीत. हवामानातील विचित्र ढग, दृष्टीभ्रम किंवा प्रकाशातील बदल यामुळेही असा अनुभव आलेला असू शकतो.

वैज्ञानिक निष्कर्ष

NOAA, अमेरिकन नेव्ही आणि लॉयड्स ऑफ लंडन या संस्थांसह क्रुशेलनिकी यांचा निष्कर्ष एकच आहे. बर्म्युडा त्रिकोण इतर कोणत्याही गजबजलेल्या समुद्री मार्गाइतकाच धोकादायक आहे, त्यापेक्षा वेगळा नाही. इथले अपघात नैसर्गिक संकटं, हवामानातील बदल, मानवी चुका आणि वर्षानुवर्षं चालत आलेल्या अतिशयोक्त कथांमुळे मोठे वाटतात. पण आकडेवारीनुसार अपघाताचं प्रमाण जगातील इतर वर्दळीच्या समुद्री भागांइतकंच आहे.

बर्म्युडा त्रिकोणाचं खरं सामर्थ्य जहाजं बुडवण्यात नाही, तर लोकांच्या कल्पनाशक्तीला भुरळ घालण्यात आहे. विज्ञान जसजसं पुढे जात आहे, तसतसं या घटनांमागचं खरं कारण समजतंय. पण तरीही या गूढ स्थळाभोवतीचं आकर्षण आणि त्यावर आधारित रहस्यमय कल्पना लोकांच्या मनाला नेहमीच खिळवून ठेवतील, यात काहीच शंका नाही.