जगबुडीच्या वावड्या दरवर्षी उठतात आणि नष्टही होतात. अतिरंजित आणि काल्पनिक असलेल्या या अफवांना कोणताही वैज्ञानिक आधार नसतो… मात्र सारी जीवनसृष्टी कवेत घेणारी ही वसुंधरा चिरकाल टिकणारी नाही. सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे ऑक्सिजनची कमतरता भासून पृथ्वीवरील जीवन एक अब्ज वर्षांनंतर संपणार आहे, असा अंदाज जपानच्या तोहो विद्यापीठाच्या संशोधकांनी नासाच्या सुपरकॉम्प्युटर सिम्युलेशनच्या आधारे वर्तवला आहे. जग नष्ट होण्याची कारणे आणि नेमके संशोधन काय, याविषयी

पृथ्वीच्या कालमर्यादेबाबत काय संशोधन?

नासाच्या ग्रहीय मॉडेलिंगचा वापर करून जपानच्या तोहो विद्यापीठाने केलेल्या अलीकडील अभ्यासात असे भाकीत केले आहे की सूर्याच्या वाढत्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवन अंदाजे एक अब्ज वर्षांत संपेल. सुपरकॉम्प्युटर सिम्युलेशनचा आधार घेऊन हे भाकीत करण्यात आले आहे. सूर्य जसाजसा अधिक उष्ण व प्रकाशमान होईल, तसेतसे पृथ्वीचा पृष्ठभाग गरम होईल. पृथ्वीवरील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होईल आणि कार्बनचक्र थांबेल. त्यामुळे पृथ्वीवर ऑक्सिजनची कमतरता भासेल. प्राणवायूअभावी वनस्पती व जीवसृष्टी नष्ट होईल, असा अंदाज हे संशोधन व्यक्त करते. या अभ्यासात पृथ्वीच्या वातावरणाच्या संभाव्य उत्क्रांतीचा शोध घेण्यात आला, ज्यामध्ये ४,००,००० सिम्युलेशन करण्यात आले. ऑक्सिजन नष्ट झाल्यानंतर वातावरण पुन्हा उच्च मिथेनच्या स्थितीत परत येईल. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात ही स्थिती होती. हे संशोधन ‘नेचर जिओसायन्स’मध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले.

पृथ्वीच्या भविष्याबाबत सूर्याची भूमिका…

वृद्ध होत जाणारा सूर्य हा पृथ्वीच्या अखेरच्या विनाशाचे मुख्य कारण असेल. सूर्याचा प्रखर तेजस्वीपणा आणि वाढती उष्णता पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरेल. सूर्याची वाढती उष्णता आणि जागतिक कार्बोनेट-सिलिकेट भू-रासायनिक चक्राबद्दलच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या आधारे पृथ्वीच्या बायोस्फीअरच्या आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा झाली आहे. पृथ्वीच्या नाशाला सूर्यच कारणीभूत ठरणार आहे, असे तोहो विद्यापीठातील सहायक प्राध्यापक काझुमी ओझाकी यांनी सांगितले. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण हळूहळू कमी होणे आणि भूगर्भीय वेळेनुसार तापमानवाढ प्रक्रिया यांवर त्यांनी भर दिला. तापमानवाढीमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होईल आणि कार्बनचक्रात व्यत्यय येईल आणि अखेर प्राणवायूचे उत्पादन थांबेल, असे ओझाकी यांनी सांगितले.

दोन अब्ज नव्हे, एक अब्ज वर्षे…

नवीन संशोधनाने पृथ्वीचे जैवमंडळ दोन अब्ज वर्षांत संपुष्टात येईल, असे सुचवणाऱ्या मागील अंदाजांना सुधारित केले आहे. प्रकाश संश्लेषणासाठी अतिउष्णता आणि कार्बन डायऑक्साइडच्या कमतरतेमुळे पृथ्वीचे जैवमंडळ दोन अब्ज वर्षांत संपृष्टात येईल, असे संशोधन यापूर्वी झाले होते. मात्र नव्या संशोधनाने ही कालमर्यादा १०० कोटी वर्षांनी कमी केली आहे. सिम्युलेशननुसार, केवळ एक अब्ज वर्षांत ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होण्यास सुरुवात होईल. परिणामी जीवसृष्टी हळूहळू संपुष्टात येईल.

जीवसृष्टी वाचवण्यासाठी काय करणे आवश्यक?

पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याची विनाशकारी घटना घडून येण्यास बराच काळ बाकी असला तरी काही शास्त्रज्ञ पृथ्वीवरील जीवसृष्टी जपण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन करत आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही घटकांमुळे वाढणारे जागतिक तापमान सिम्युलेशनद्वारे भाकीत केलेल्या बदलांना आधीच गती देत आहे. हा अभ्यास केवळ दूरच्या भविष्यासाठीच नाही तर वर्तमानासाठीही एक इशारा म्हणून काम करतो, या बदलांची कालमर्यादा वाढवण्यासाठी किंवा बदलांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्वरित हवामान कृतीची आवश्यकता अधोरेखित करतो. पृथ्वीवरील जीवनाच्या अंताची तारीख जरी खूप दूर वाटत असली तरी, हे निष्कर्ष अजूनही ग्रहाच्या असुरक्षिततेची स्पष्ट आठवण करून देतात. सौर किरणोत्सर्ग आणि हवामान बदलामुळे वातावरणात आधीच बदलाची चिन्हे दिसत असल्याने, हे स्पष्ट आहे की मानवतेने अनिश्चित भविष्यासाठी तयारी सुरू केली पाहिजे. पृथ्वीच्या ऑक्सिजन-समृद्ध वातावरणाचा अंत अपरिहार्य वाटतो. तथापि, या प्रक्रियांमागील यंत्रणा समजून घेऊन, शास्त्रज्ञ पृथ्वीची राहण्यायोग्यता वाढवण्यासाठी धोरणे आखण्याची आशा करतात, ज्यामुळे मानवजातीला सतत बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
sandeep.nalawade@expressindia.com