NASA Psyche mission नासाच्या शास्त्रज्ञांनी एक असा अशनी (लघुग्रह) शोधून काढला आहे, जो सोन्यासारख्या मौल्यवान धातूंनी समृद्ध आहे. नासाने या अशनीला 16 Psyche असे नाव दिले आहे. शास्त्रज्ञ या अशनीचा तपास करत आहे, त्यामुळे शास्त्रज्ञांना विश्वाच्या उत्पत्तीविषयी अधिक माहिती मिळवता येणार आहे, त्याबरोबरच शेकडो क्विन्टिलियन्स डॉलर्सच्या खजिन्याची किल्लीही मिळण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, या अशनीवर इतके सोने आहे की जगातील प्रत्येक व्यक्ती त्यामुळे अब्जाधीश होऊ शकेल. काय आहे नासाचे मिशन ’16 Psyche’? हा शोध किती महत्त्वपूर्ण आहे? हे सोने पृथ्वीवर आणणे शक्य आहे का? त्याविषयी समजून घेऊयात…

काय आहे 16 Psyche?

16 Psyche या अशनीने त्याच्या विलक्षण रचनेमुळे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मुख्यतः लोह आणि निकेल या धातूंनी तयार झालेल्या या अंतराळ खडकावर ७०० क्विन्टिलियन्स डॉलर्स किमतीचे धातू आहेत. हे धातू संपूर्ण पृथ्वीवरील एकूण संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. नासाच्या विश्लेषणानुसार, जर या अशनीवरील सोने आणि इतर मौल्यवान धातू यशस्वीरित्या काढले गेले तर त्याची किंमत क्वॉड्रिलियन्स डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास केवळ ट्रिलियन्स डॉलर्स किमतीचे धातू पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला अब्जाधीश करण्याची क्षमता ठेवतात.

परंतु, तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे की अंतराळातील वस्तूंचे उत्खनन केल्याने थेट संपत्ती उपलब्ध होईलच असे नाही. खरं तर, जर मौल्यवान धातूंनी पृथ्वीची बाजारपेठ व्यापली, तर धातूंच्या किमती जगभरात मोठ्या प्रमाणात कमी होऊन आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. यावरून अंतराळातल्या अशनीच्या उत्खननाचे जटिल आर्थिक परिणाम दिसून येतात. हा खजिना प्रचंड असला तरी तो काढणे आणि बाजारपेठेत समाविष्ट करण्याचे व्यावहारिक आणि आर्थिक आव्हान तितकेच मोठे आहे.

नासाची मोहीम काय आहे?

ऑक्टोबर २०२३ मध्ये नासाचे Psyche अंतराळयान या अशनीच्या दिशेने मार्गस्थ झाले आणि ते २०२९ मध्ये तिथे पोहोचण्याची अपेक्षा शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट या अशनीचे उत्खनन करणे नसून या अशनीचा पृष्ठभाग, चुंबकीय क्षेत्र आणि त्याची एकूण रचना तपासणे आहे, त्यामुळे त्याच्या उत्पत्तीबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. हा अशनी म्हणजे सौरमालेच्या सुरुवातीच्या काळात तयार झालेल्या प्रोटोप्लानेटमधून बाहेर पडलेला धातूचा गाभा (metallic core) असावा, असे वैज्ञानिकांना वाटते. प्रोटोप्लानेट म्हणजे ग्रहांच्या परस्पर गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेली खगोलीय वस्तू.

16 Psyche चा अभ्यास केल्यास अब्जावधी वर्षांपूर्वी घडलेल्या ग्रहांच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती मिळण्यास शास्त्रज्ञांना मदत होईल. हा अभ्यास भूगर्भशास्त्रज्ञ आणि अंतराळ वैज्ञानिकांसाठी अमूल्य आहे, ज्यामुळे पृथ्वीसह इतर ग्रहांचे अंतर्गत गाभे कसे तयार झाले, याचे एक स्पष्ट चित्र समोर येईल. प्लॅनेटरी भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. लिसा न्गुएन यांनी २०२४ च्या एका अभ्यासात स्पष्ट केले आहे की, “16 Psyche चा तपास ग्रहांचे वैविध्य आणि गाभा निर्मितीबद्दलचे आपले सिद्धांत बदलू शकतो.” या मोहिमेचे यश भविष्यातील अंतराळ उत्पादन आणि इंधनासाठी अशनींच्या भौतिक संपत्तीचा वापर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असेही शास्त्रज्ञांचे सांगणे आहे.

अशनीवरील संपत्ती मानवाच्या उपयुक्त आहे का?

केवळ 16 Psyche वर या स्वरूपाची संपत्ती नाही, तर असे इतरही अशनी आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीजवळच्या एकट्या 2011 UW158 अशनीमध्ये अंदाजे ५.४ ट्रिलियन डॉलर्सचे प्लॅटिनम आहे. अशा वस्तूंतून धातू काढल्यास उद्योगांमध्ये क्रांती होऊ शकते, पृथ्वीवरील उत्खनन कमी होऊ शकते आणि प्रगत तंत्रज्ञानासाठी आवश्यक संसाधने मिळू शकतात. परंतु, हे इतके सोपे नाही. तज्ज्ञ इशारा देतात की, जागतिक अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात धातू आणल्यास किमती कोसळू शकतात.

याशिवाय, खडबडीत आणि वजनविरहित वातावरणात उत्खनन करण्यातही अनेक तांत्रिक अडथळे आहेत. त्यात रॉकेट प्रक्षेपण, रोबोटिक ऑपरेशन्स आणि रिफायनिंग प्रक्रियेचा प्रचंड खर्च समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, अंतराळ संसाधनांच्या मालकीबद्दलचे कायदेशीर नियम नाहीत, ज्यामुळे मालकी कोणाची याबाबत मोठे प्रश्न उभे राहतात. याचे खाजगीकरण झाले पाहिजे की आंतरराष्ट्रीय करारांनी (या संसाधनांवर नियंत्रण ठेवावे? हा जगासमोरील मोठा प्रश्न आहे.

या अशनीचा शोध आणि अभ्यास किती महत्त्वाचा?

16 Psyche सारखे अशनी सौरमालेच्या रचनेविषयी अधिक माहिती देऊ शकतात. जर अशनी पृथ्वीच्या दिशेने आले तर ते अस्तित्वाचे धोकेदेखील निर्माण करू शकतात. नासाच्या डार्ट (DART) मिशनने २०२२ मध्ये एका अशनीची दिशा बदलण्याची क्षमता दाखवून दिली, ज्यामुळे संभाव्य धोक्यांपासून ग्रहाचे संरक्षण करण्याची एक रणनीती प्रदर्शित झाली. Psyche सारखी मोहीम महत्त्वपूर्ण डेटा प्रदान करतात, ज्यामुळे मानवतेला भविष्यात अंतराळ धोक्यांचा अंदाज लावणे आणि त्यांना प्रतिबंधित करणे शक्य होऊ शकते. नासाच्या उपप्रशासक पाम मेलरॉय यांनी म्हटले की, “Psyche सारखे संशोधन अशा भविष्यासाठी आवश्यक पाऊल आहेत, जिथे मनुष्य पृथ्वीपासून दूर राहू शकेल आणि कार्य करू शकेल.”