Nepal’s Gen-Z Protests: नेपाळमध्ये झालेल्या Gen-Z च्या आंदोलनानंतर राजकीय संकट उभं राहिलं होतं. ओली सरकार कोसळलं. या पार्श्वभूमीवर राजेशाही परत आणण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली. २००८ साली नेपाळमधील राजेशाही अधिकृतरीत्या खालसा करण्यात आली होती. मात्र, नेपाळमधील राजेशाहीबद्दल चर्चा सुरू झाली की, २००१ मधील त्या रक्तरंजित घटनेच्या आठवणींना उजाळा मिळतो. या राजकीय हत्याकांडाचा एक धागा भारतातील ग्वाल्हेरशी जोडलेला आहे.

लोकप्रिय राजा

२००१ साली बीरेन्द्र बीर बिक्रम शाह देव हे नेपाळचे राजा होते. हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या बीरेन्द्रांनी आपले शालेय शिक्षण पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील शाळेत पूर्ण केले होते. विकास उपक्रम आणि सामाजिक सुधारणांमुळे ते नेपाळी जनतेत विशेष प्रिय झाले होते. राजा बीरेन्द्र यांचा १९७० साली ऐश्वर्या राज्यलक्ष्मी देवी शाह यांच्याशी विवाह झाला होता. या जोडप्याला युवराज दीपेन्द्र, राजकुमारी श्रुती आणि राजकुमार निराजन अशी तीन मुले होती.

राजवाड्यातील हत्याकांड

  • १ जून २००१ रोजी नेपाळचं राजघराणं काठमांडूमधील नारायणहिटी पॅलेस (आता संग्रहालय) येथे एकत्र जमलं होतं. टाइम मासिकातील वृत्तानुसार, त्या संमेलनात उपस्थित असलेल्या राजघराण्यातील सदस्यांनी सांगितलं की, तेव्हा २९ वर्षांचा युवराज दीपेन्द्र कार्यक्रम झाल्यावर काही काळ दिसला. त्यानंतर तो थोड्या वेळासाठी बाहेर गेला, पण परत आला तेव्हा त्याने कमांडो पोशाख घातला होता आणि हातात दोन असॉल्ट रायफल्स होत्या.
  • “दीपेन्द्रने वडिलांकडे पाहिलं, काही बोलला नाही आणि ट्रिगर दाबला,” असं युवराजाचा काका रवी शमशेर राणा यांनी टाइम साप्ताहिकाला सांगितलं. “गोळीबारानंतर राजा काही क्षण उभे राहिले आणि मग हळूहळू जमिनीवर बसले. तेव्हाच राजाने शेवटी काही शब्द उच्चारले ‘काय गरेको?’ (तू हे काय केलंस?).”

कोमात असताना राजा झाला…

यानंतर दीपेन्द्रने आपली आई राणी ऐश्वर्या, भावंडं श्रुती आणि निराजन यांच्यासह इतर पाच नातलगांना ठार मारलं. युवराज दीपेन्द्र डोक्यात गोळी लागलेल्या अवस्थेत आढळला. असे मानले जाते की, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तो कोमात गेला आणि त्याच अवस्थेत त्याला राजा घोषित करण्यात आलं. परंतु ४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. यानंतर दीपेन्द्रचे काका ज्ञानेंद्र सिंह गादीवर बसले आणि २००८ साली राजेशाही संपुष्टात येईपर्यंत ते नेपाळचे शेवटचे राजा राहिले.

ग्वाल्हेरचा धागा

सरकारच्या चौकशीत युवराज दीपेन्द्रला या राजघराण्याच्या हत्याकांडासाठी जबाबदार धरलं गेलं. त्यामागचं कारण म्हणून सर्वाधिक मान्यता मिळालेल्या सिद्धांतानुसार, दीपेन्द्रचं नातं देवयानी राणा हिच्याशी होतं. देवयानी ही नेपाळी राजकारणी पशुपति शमशेर जंग बहादूर राणा आणि उषा राजे सिंधिया यांची कन्या आहे. उषा राजे या ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील दिवंगत माधवराव सिंधिया आणि वसुंधरा राजे सिंधिया यांच्या भगिनी आहेत.

…म्हणून हत्याकांड झाले

  • दीपेन्द्र आणि देवयानी यांची भेट ब्रिटनमध्ये झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. नेपाळच्या राजघराण्याने या नात्याला विरोध केला होता, त्यामुळे दीपेन्द्र प्रचंड अस्वस्थ झाला आणि अखेरीस आपल्या कुटुंबाचा खून केला. असंही सांगितलं जातं की, राणी ऐश्वर्याला दीपेन्द्रने दुसऱ्या राजघराण्यातील मुलीशी विवाह करावा असं वाटत होतं.
  • देवयानीच्या घराण्यालाही या नात्याबद्दल शंका होती. देवयानीच्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा नेपाळी राजघराण्यापेक्षा वरचढ होती. त्यामुळे त्यांनी देवयानीला सांगितलं होतं की, जर तिनं दीपेन्द्रशी लग्न केलं तर तिला तिचं जीवनमान खालावल्यासारखं वाटेल.
  • काही कथनांनुसार, १ जूनच्या पार्टीत दीपेन्द्रचा एका पाहुण्याबरोबर वाद झाला होता. तो नशेत होता आणि त्याच अवस्थेत त्याने कुटुंबावर बंदुकीचं लक्ष्य साधलं.

नेपाळमधील राजेशाही समर्थक आंदोलनं

के. पी. शर्मा ओली यांचं पंतप्रधानपद जाण्याच्या काही महिने आधी त्यांनी माजी राजा ज्ञानेंद्र यांच्यावर राजेशाहीला समर्थन आंदोलनात हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला होता. २८ मार्च रोजी झालेल्या अशा एका आंदोलनादरम्यान झालेल्या आगजनीच्या घटनेवर प्रतिनिधीगृहात बोलताना ओली म्हणाले होते, “माजी राजा शाह यांनाही या हिंसाचारातून सुटता येणार नाही. जो नेता लोकांना मृत्यूसाठी उकसवतो, जो इतिहासाच्या कचाट्यात फेकला गेला आहे, जो एखाद्या मोहिमेचा सूत्रधार आहे, जो पुन्हा सत्तेत येण्याची आणि संपत्ती लुटण्याची इच्छा बाळगतो… असा माणूस शांत कसा राहू शकतो? या सगळ्या घटनांसाठी तोच शेवटी जबाबदार आहे; त्याने जबाबदारी घ्यायलाच हवी.”

एकूणच सध्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधातील Gen Z च्या आंदोलनानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ती, राजघराण्याची, राजघराण्याच्या हत्याकांडाची आणि कथित ग्वाल्हेर कनेक्शनचीही!