सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे मानवाच्या राहणीमानात अनेक बदल झाले आहेत. झोपण्याची, उठण्याची, काम करण्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. मोबाईल, कॉम्प्युटरसारख्या यंत्रांच्या अतिवापरामुळेही मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. असे असतानाच आता मोबाईलच्या अतिवापरामुळे पुरुषांतील शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या अभ्यासातून नेमके काय समोर आले? अभ्यासातील निष्कर्षांवर या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत काय? हे जाणून घेऊ…

स्वित्झर्लंडमध्ये २,८०० पुरुषांवर अभ्यास

अनेक दशकांपासून पुरुषांतील शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचे समोर आले आहे. शुक्राणू कमी होण्याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. शुक्राणूंची संख्या नेमकी का कमी होते? याचे नेमके असे कारण नाही. स्वित्झर्लंडने मोबाईलच्या अतिवापरामुळे शुक्रणूंच्या संख्येवर परिणाम होतो का? हे तपासण्यासाठी नुकताच एक अभ्यास केला आहे. एकूण २,८०० लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. मोबाईल फोन वापरण्याची वारंवारता आणि शुक्राणूंची संख्या यांत संबंध असल्याचे या अभ्यासकांना आढळले. ‘फर्टिलिटी अॅण्ड स्टेरिलिटी जर्नल’मध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. हा अभ्यास करताना मोबाईलच्या वापरामुळे शुक्राणूंची मोटिलिटी (एका जागेहून दुसऱ्या जागेवर जाण्याची क्षमता) व मॉर्फोलॉजी (आकार) यांच्यात काहीही फरक न पडल्याचेही या अभ्यासातून समोर आले. पॅन्टच्या खिशात मोबाईल ठेवण्याचा शुक्राणूंची संख्येवर काहीही परिणाम होत नसल्याचेही त्यांना या अभ्यासात आढळले. तसा परिणाम होत असल्याचा कोणताही पुरावा त्यांना सापडलेला नाही. २००५ ते २०१८ या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला.

प्रजनन क्षमतेवर परिणाम करणारे घटक

पुरुषांची प्रजनन क्षमता, शुक्राणूंची संख्या यांच्यवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. या अभ्यासाच्या माध्यमातून मोबाईल फोनच्या अतिवापरामुळेही शुक्राणूच्या संख्येवर परिणाम होतो, असा दावा करण्यात आला आहे. धूम्रपान, लठ्ठपणा, मद्यपान, मानसिक तणाव, कीटकनाशके व भाजीपाला ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची आवरणे यात आढळणारी रसायने अशा अनेक घटकांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, असे सांगितले जाते. अनेक दशकांपासून मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओफ्रिक्वेंसी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (RF-EMFs) यामुळेही प्रजनन आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो, असे सांगितले जाते. सध्या प्रकाशित झालेल्या या अभ्यासाच्या माध्यमातून या दाव्याला पूरक पुरावे मिळाले आहेत. मोबाईल फोनमुळे प्रजनन क्षमतेवर होणाऱ्या परिणामांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत उंदीर आणि इन व्हिट्रो शुक्राणूंवर (मानवी शरीराच्या बाहेर) अभ्यास करण्यात आलेला आहे.

“हा अभ्यास परिपूर्ण नाही”

मात्र, या अभ्यासाविषयी अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक अॅलन पॅसी यांनी या अभ्यासावर प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या करण्यात आलेला हा अभ्यास परिपूर्ण नाही. हा अभ्यास प्रसिद्ध करणारे लेखकही ते कबूल करीत आहेत. मात्र, हाअभ्यास माझ्या मते चांगला आहे,” असे अॅलन पॅसी म्हणाले. या अभ्यासात अॅलन पॅसी यांचा सहभाग नव्हता.

“अन्य गोष्टीदेखील कारणीभूत असू शकतात”

केअर फर्टिलिटी सेंटरच्या पदाधिकारी अॅलिसन कॅम्पबेल यांनीदेखील या अभ्यासावर प्रतिक्रिया दिली. या अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष हे आकर्षक आणि एखाद्या कादंबरीतील कथेप्रमाणे वाटतात. शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे सतत फोन वापरण्यासह अन्य गोष्टीदेखील कारणीभूत असू शकतात, असे त्या म्हणाल्या. अॅलन पॅसी यांनीदेखील अॅलिसन यांच्याप्रमाणेच मत नोंदवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरुष काय करू शकतात?

स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासामुळे फोन सतत वापरावा की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अनेकांना या अभ्यासातील निष्कर्षामुळे चिंता वाटत असेल. मात्र, घाबरून जाण्याचे कारण नाही, असे हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनीच सांगितले आहे. “काही पुरुषांना खरंच चिंता वाटत असेल, तर त्यांनी फोन आपल्या बॅगमध्ये ठेवायला हवा. तसेच फोनचा वापर मर्यादित स्वरूपात करावा,” असे अॅलन पॅसी म्हणाल्या.