North Korea Military Base US Security Risks : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेन यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न करीत असताना दुसरीकडे अमेरिकेच्या सुरक्षेलाच मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हुकूमशहा किम जोंग-उन यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाने चीनच्या सीमेपासून अगदी जवळच एक गुप्त लष्करी तळ उभारल्याचं एका नवीन अहवालातून समोर आलं आहे. या तळामुळे अमेरिकेवर थेट आण्विक हल्ल्याचा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती तेथील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वॉशिंग्टनमधील ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’ या संस्थेने उत्तर कोरियाच्या गुप्त तळाची माहिती दिली आहे. हा तळ अमेरिका-चीनच्या सीमेपासून २७ किलोमीटर अंतरावर आहे. या तळावर आठ ते नऊ अत्याधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि हजारो सैनिकही तैनात असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, उत्तर कोरियानं गुप्त लष्करी तळ का उभारला? त्यापासून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका कसा निर्माण होऊ शकतो? त्यासंदर्भात घेतलेला हा आढावा…
उत्तर कोरियानं उभारलेला लष्करी तळ कसा आहे?
उत्तर कोरियाने गुप्तपणे उभारलेला लष्करी तळ चीनच्या सीमेजवळील ‘सिन्पुंग-डोंग’ या ठिकाणी आहे. सुमारे २२ किलोमीटरपर्यंतच्या परिसरात असलेला हा तळ न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा मोठा आहे. ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’च्या अहवालानुसार- उत्तर कोरियानं २००४ मध्ये या तळाच्या उभारणीची सुरुवात केली आणि २०१४ पर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण केले. हा तळ कोरियन पीपल्स आर्मीच्या विशेष अभियंता पथकानं उभारल्याचं सांगितलं जातं. याच पथकानं उत्तर कोरियातील जवळपास १५-२० गुप्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ, त्यांचे देखभाल व साठवण केंद्रही उभारली आहेत. ‘सिन्पुंग-डोंग’ तळावर भूमिगत आश्रयस्थाने, सपोर्ट स्ट्रक्चर्स आणि मोबाईल क्षेपणास्त्र प्रक्षेपक (लॉन्चर) ठेवण्यासाठी खास जागा आहेत.
उत्तर कोरियाच्या लष्करी तळावर कोणकोणती क्षेपणास्त्रे?
- पारंपरिक क्षेपणास्त्र तळांप्रमाणे या लष्करी तळावर कायमस्वरूपीचे लाँच पॅड्स नाहीत.
- यामागे क्षेपणास्त्रांची गतिमानता आणि गुप्तता राखण्याचा उद्देश आहे.
- तळाचे प्रवेशद्वार झाडी आणि जंगलांनी वेढलेले असल्यामुळे त्याला शोधणं अत्यंत कठीण आहे.
- “या तळाचा शोध घेणं आमच्यासाठी आव्हानात्मक ठरलं आहे, कारण उत्तर कोरियानं तो गुप्त ठेवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत”, असं अहवालाच्या सह-लेखिका जेनिफर जुन यांनी सांगितलं.
- उपग्रहानं घेतलेल्या छायाचित्रांनुसार- या लष्करी तळावर आठ ते नऊ आण्विक क्षमतेची आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि त्यांचे प्रक्षेपक आहेत.
- सीएसआयएसच्या अहवालानुसार- ही क्षेपणास्त्रे पूर्व आशिया आणि अमेरिकेच्या मुख्य भूमीसाठी संभाव्य आण्विक धोका ठरू शकतात.
- या तळाचे बांधकाम अद्यापही सुरूच असून त्याची क्षमता वाढवण्याचे उत्तर कोरियाचे प्रयत्न असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
आणखी वाचा : अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला धक्का बसणार? चीनचं स्टेबलकॉइन्स आहे तरी काय?
उत्तर कोरियाने कसा वाढवला शस्त्रांचा साठा?
उत्तर कोरियाने त्यांच्या आण्विक शस्त्रास्त्रांचा साठा मोठ्या प्रमाणात वाढवला असून, ही बाब अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायासाठी मोठी चिंता निर्माण करणारी आहे. २०१९ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांच्यात अण्वस्त्र निर्मूलनाची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा अपयशी ठरल्यानंतर उत्तर कोरियाने आंतरराष्ट्रीय निर्बंधांकडे दुर्लक्ष करून आपला शस्त्रसाठा अधिक वेगानं वाढवला आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये किम जोंग-उन यांनी घोषणा केली होती की, देशाचा आण्विक साठा प्रचंड प्रमाणात वाढवला जाईल, जेणेकरून शत्रूराष्ट्रांपासून उत्तर कोरियाचे रक्षण करता येईल. आपल्या सरकारच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त केलेल्या भाषणात किम जोंग-उन म्हणाले होते की, आण्विक शक्तीसह सर्व सशस्त्र दलांना युद्धासाठी पूर्णपणे तयार ठेवण्यासाठी देश दुप्पट प्रयत्न करेल.

उत्तर कोरियाने तयार केले ५० अणुबॉम्ब?
एका आकडेवारीनुसार- जानेवारी २०२४ पर्यंत उत्तर कोरियाने ५० अणुबॉम्ब तयार केले आहेत. तसेच अणुबॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे विखंडनशील पदार्थदेखील त्यांच्याकडे आहेत. उत्तर कोरियाकडे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे असून ती आवाजाच्या वेगाच्या कित्येक पटींनी वेगाने उड्डाण करू शकतात. विशेष बाब म्हणजे- शत्रूदेशाच्या रडारला चकवा देण्यासाठी ही क्षेपणास्त्रे कमी उंचीवर उडतात. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि घन इंधनावर आधारित कमी पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. घन इंधनामुळे क्षेपणास्त्रे सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतात आणि कमी वेळेत प्रक्षेपित करता येतात. उत्तर कोरियाकडे प्रगत रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्र कार्यक्रमही आहेत. अलीकडच्या काळात उत्तर कोरियाने रशियाबरोरचे आपले लष्करी संबंध अधिक मजबूत केले आहेत. रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मदत करण्यासाठी त्यांनी शस्त्रे आणि सैनिक पाठवले आहेत. या बदल्यात रशियाकडून त्यांना शस्त्रास्त्र कार्यक्रमांसाठी तांत्रिक मदत मिळत आहे. या वाढत्या सहकार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे.
हेही वाचा : शेख हसीना यांच्या पक्षाचे भारतात कार्यालय? बांगलादेश सरकारने काय आरोप केला?
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता
उत्तर कोरियाकडे असलेली क्षेपणास्त्रे केवळ आपल्या शेजारील देशांसाठीच नाही, तर अमेरिकेसाठीही मोठा धोका निर्माण करीत आहेत. त्यांच्याकडील ह्वासोंग-१५ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे १३,००० किलोमीटर आहे. यामुळे अमेरिकेची संपूर्ण मुख्य भूमी त्याच्या टप्प्यात येऊ शकते. तर ‘ईआर स्कड’ या क्षेपणास्त्राचा पल्ला १,००० किलोमीटरपर्यंत आहे, त्यामुळे दक्षिण कोरिया आणि जपानमधील ओसाकासारखी मोठी शहरे त्याच्या टप्प्यात येतात. उत्तर कोरियाच्या मध्यम-श्रेणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची कमाल मारक क्षमता ४,५०० किलोमीटर आहे, यामुळे गुआम बेटावरील अमेरिकेचे लष्करी तळ आणि आग्नेय आशियातील बराचसा भाग त्यांच्या टप्प्यात येतो. उत्तर कोरियाने आपल्या क्षेपणास्त्रांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता निर्माण झाली आहे.