– हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्ताधारी पक्षाला कोणत्याही निवडणुकीत काही प्रमाणात मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागतो. कारण जनतेच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करणे शक्य नसते. ओडिशात मात्र चित्र उलटे आहे. या राज्यात प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताधारी बिजू जनता दल अधिक मजबूत होत आहे. त्याला कारण आहे मुख्यमंत्री नवीन पटनाईक… ७५ वर्षीय नवीनबाबू सलग पाच वेळा ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदी आहेत. गेली बावीस वर्षे त्यांच्याकडे राज्याची धुरा आहेत. देशात सिक्कीमचे पवन चामलिंग तसेच पश्चिम बंगालचे ज्योती बसू यांच्यानंतर प्रदीर्घ काळ सलग सत्तेत राहिलेले ते तिसरे मुख्यमंत्री आहे. नुकत्याच राज्यात जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. त्यात सर्व ३० जिल्हा परिषदांमध्ये बिजू जनता दलाची सत्ता आली आहे. ८५३ जागांपैकी ७६५ जागा या पक्षाने जिंकल्या आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत ६० टक्के अधिक जागा त्यांनी पटकावल्या. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ४२ तर काँग्रेसला ३८ जागा मिळवता आल्या. भाजपची २९७ जागांवरून घसरण झाली आहे. १० जिल्ह्यांमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही. पश्चिम ओडिशात गेल्या वेळी भाजपची कामगिरी चांगली झाली होती. त्यांची गेल्या वेळी आठ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता होती, तर काँग्रेसची दोन ठिकाणी. मात्र या वेळी मतदारांनी या दोन्ही पक्षांना नाकारले आहे.

बीजेडीच्या यशाचे रहस्य काय?

तळागाळापर्यंत विकास योजना पोहोचविण्यासाठी सरकारचे काम त्यामुळेच जनतेचे सातत्याने बिजू जनता दलाची पाठराखण केली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप असो वा प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचे प्रयत्न करणारे ममता बॅनर्जी असो किंवा चंद्रशेखर राव यांच्यापासून पटनाईक यांनी समान अंतर राखले आहे. अर्थात राज्यसभेत काही वेळा ते भाजपच्या मदतीला आले आहेत, पण तरीही कोणत्याही गटात न जाता शांतपणे आपल्या राज्याच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रीय माध्यमांमध्ये फारशी चर्चा नाही, आरोप-प्रत्यारोपांची राळ नाही असा एकूण नवीनबाबूंचा कारभार, ग्रामीण विकासाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या तसेच धान खरेदीची पारदर्शक प्रक्रिया या बाबी बिजू जनता दलाच्या पथ्यावर पडल्या. त्यातच राज्यातील भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत व्यग्र होते. त्याचाही फटका भाजपला बसला. एकेकाळी मागास राज्य अशी ओळख असलेल्या ओडिशात नवीन पटनाईक यांनी आपल्या कारभाराने मोठ्या प्रमाणात जनतेचे जीवनमान उंचावले आहे.

लोकप्रिय योजना

एक रुपये किलो दराने तांदूळ तसेच दारिद्र्यरेषेखालील तीन कोटी आरोग्य कार्ड लाभधारक त्यात राज्यातील एक कोटी कुटुंबांपैकी ९२ लाख कुटुंबीयांना बिजू स्वस्थ कल्याण योजना कार्ड्स वितरित करण्यात आली आहेत. यातून पुरुषांना पाच लाख तर महिलांना १० लाखांपर्यंत विनामूल्य आरोग्य सेवा दिली जाते.

पुढचे लक्ष्य काय?

ओडिशात २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. सध्या राज्यातील विधानसभेच्या १४७ जागांपैकी ११४ आमदार बिजू जनता दलाचे आहेत, तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे २२ आणि काँग्रेसकडे नऊ जागा आहे. मुळात एकेकाळी ओडिशा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्ट्रीय राजकारणात प्रभाव पाडणारे नंदिनी सत्पथी, जे. बी. पटनाईक असे मुख्यमंत्री काँग्रेसने या राज्यातून दिले आहेत. पुढे त्या पक्षातून बाहेर पडत बिजू पटनाईक यांनी राज्यातील काँग्रेसच्या राजकारणाला धक्का दिला. आता तर त्यांचे पुत्र नवीन पटनाईक यांनी राज्यात विरोधकांना फारशी संधीच दिलेली नाही. पुढील विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकून विक्रम करण्याचा नवीन पटनाईक यांचा मानस आहे. त्यामुळे विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष कोण राहील यासाठीच भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस राहील, असे आजचे तरी चित्र आहे. राज्यातील राजकारणाचे वर्णन सबकुछ नवीन पटनाईक असेच करावे लागेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha panchayat elections bjd sweeps rural polls with 766 seats to form zilla parishad in all 30 districts naveen patnaik thanks people scsg 91 print exp 0322
First published on: 05-03-2022 at 07:50 IST