हृषिकेश देशपांडे
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले. पूर्व विदर्भातील हे मतदारसंघात आहेत. तरीही अजून महायुती किंवा महाविकास आघाडीचे अधिकृत जागावाटप जाहीर झाले नाहीत. अनेक पक्ष त्यासाठी दावेदार अधिक असे चित्र आहे. माघार घेण्यास कुणी तयार नाही. कारण आता माघार घ्यावी तर, ही जागा मित्र पक्षाला जाईल, विधानसभेला त्याचे परिणाम होतील ही साऱ्यांना चिंता.
महायुतीत पेच सुटेना
भाजप-शिवसेना शिंदे तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला जागावाटप जाहीर करताना नाकी नऊ आले. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवाऱ्या झाल्या. ऐंशी टक्के पेच सुटला आहे, जागावाटप दोन दिवसांत जाहीर होईल अशा तारखा देऊन दहा दिवस उलटून गेले. काही उमेदवार जाहीर झाले पण अनेक जागांचा तिढा तसाच राहिला. कारण एकतर एका लोकसभा मतदारसंघात राज्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. साहजिकच इच्छुकांची रांग असते. यातून नेते मंडळींना कार्यकर्त्यांना दुखावणे कठीण जाते.
हेही वाचा >>> अरविंद केजरीवाल यांना १४ दिवस तुरुंगात राहावे लागणार; तिहारमध्ये काय मिळणार? कोणाला भेटण्याची परवानगी?
ठाण्यात मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
आता महायुतीचे उदाहरण घेतल्यास ठाणे, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच पालघर या जागांवर अजूनही तिढा असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी संबंधित पक्षाचा विद्यमान खासदार आहे म्हणून त्यांना जागा सोडायची हे गणित आहे. मात्र दुसरीकडे बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार नाही असे कारण देत मित्रपक्ष आक्षेप घेतो. मग यातून जागावाटपासाठी चर्चेचा काथ्याकूट सुरूच राहतो. आताही महायुतीतील तिन्ही पक्षांनी फारसा वाद नसलेल्या ठिकाणी उमेदवार जाहीर केले. अद्यापही राज्यात महायुतीमधील वीस उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला पंधरा दिवस उरले असतानाही जागावाटप होत नाही. भाजपलाही जर मित्र पक्षांना कमी जागा दिल्या तर त्यांची नाराजी वाढण्याची धास्ती वाटते. ठाणे व नाशिक या दोन्ही मतदारसंघांत तिढा आहे. ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र. या मतदारसंघात येणाऱ्या विधासभा क्षेत्रात चार ठिकाणी आमदार असल्याने भाजपने येथे दावा सांगितला आहे. मात्र ही जागा सोडल्यास राज्यभर चुकीचा संदेश जाईल अशी धास्ती शिंदे गटात आहे. ठाणे पट्ट्यात विधानसभेच्या २० ते २५ जागा आहेत. विधानसभेला जागावाटपात मग पडती बाजू घ्यावी लागण्याची शक्यता त्यांना सतावते.
नाशिक, साताऱ्यातही तिढा
उत्तर महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. नाशिक शहरातील तीन आमदार, नाशिक महापालिकेतील साठवर नगरसेवक अशी ताकद दाखवून भाजप ही जागा मागत आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार तेथे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेही हे कार्यक्षेत्र. इतर मागासवर्गीयांचे देशपातळीवर नेते म्हणून ही जागा घेण्यासाठी भुजबळ यांचा पक्ष आग्रही आहे. अशात विद्यमान खासदारांनी प्रचारही सुरू केला, पण जागावाटपाचा पत्ता नाही. सातारा हा पूर्वीपासून काँग्रेस पुढे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र गेल्या दहा वर्षांत भाजपने अनेक नेत्यांना पक्षात घेऊन तेथे प्रभाव निर्माण केला. आता येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचा या जागेवर दावा आहे. भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी येथून प्रचारही सुरू केला. येथेही निर्णय होत नाही. थोड्याफार फरकाने अन्य पाच ते सहा जागांवर हेच चित्र आहे. एका जागेवर तिढा निर्माण झाला की आसपासच्या तीन ते चार जागांवर वाद सुरू राहतो. प्रत्येक पक्षाला विभागात एखादी जागा तरी लढवायला मिळावी असे वाटते. राज्यात मुंबई-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भ असे विभाग पडतात. तिढा सोडवताना मनभेद होणार नाहीत याची काळजी महायुतीचे नेते घेत आहेत. हा जागांचा तिढा सुटल्याखेरीज भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत प्रवेश देण्याबाबत निर्णय घेता येत नाही.
हेही वाचा >>> विश्लेषण : पोर्तुगीज आणि ब्रिटिश… भारत आणि श्रीलंका… भाजप नि काँग्रेस… ऐतिहासिक कचाथीवू बेट बनले राजकीय वादभूमी…
महाविकास आघाडीतही तेच
महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत जागांचा पेच कमी आहे. तरीही पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात दिल्लीपर्यंत वाद गेला. ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्यावर काँग्रेसही मैत्रीपूर्ण लढतीवर ठाम आहे. मात्र मैत्रीपूर्ण लढत झाल्यास प्रचारात कटुता येणार, मग त्याचे परिणाम शेजारी कोल्हापूरच्या जागेवर होईल, अशी भीती नेत्यांना वाटते. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, ठाकरे गटाने सांगलीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. सांगलीप्रमाणे दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवार निश्चित केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. मुंबई शहर व उपनगरांत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. मुंबईतील सहापैकी एखादीच जागा लढवण्यास मिळाली तर साहजिक विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीच्या वेळी जागावाटपाच्या चर्चेत त्याचे परिणाम होण्याची काँग्रेसला चिंता आहे. यामुळेच शहरातील लोकसभेच्या तीन जागांसाठी ते आग्रही आहेत.
मतांची बेरीज महत्त्वाची
राज्यातील दोन आघाड्यांमध्ये चुरस आहे. मित्रपक्षाला नाराज केल्यास मते घटतील. छोटे पक्ष, संघटना यांच्या मतपेढीला या दुरंगी लढतींमध्ये महत्त्व आले. त्यामुळे तडकाफडकी कोणी निर्णय घेत नाही. जागावाटप ही नेतेमंडळींसाठी डोकेदुखी ठरतेय. कार्यकर्ते नेत्यांवर जागा मिळण्यासाठी दबाव आणत आहेत. अंतर्गत सर्वेक्षणाचे दाखले दिले जात आहेत. मात्र दावेदारांची संख्या अधिक त्यात चार ते पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची समीकरणे दडलेली असल्याने हे त्रांगडे अधिकच वाढले आहे.
hrishikesh.deshpande@expressindia.com