Ballistic matching: पहलगाम दहशतवादी हल्ला करणारे तीन दहशतवादी ‘ऑपरेशन महादेव’मध्ये मारले गेल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संसदेत दिली. या तीन दहशतवाद्यांमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मुशा ऊर्फ सुलेमान शहा याचाही समावेश होता. भारतीय सुरक्षा दलांनी सोमवारी एक संयुक्त कारवाई करीत या तीन दहशतवाद्यांना ठार केले. संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत चर्चा करताना गृहमंत्री शहा यांनी सांगितले, “हे निष्कर्ष फॉरेन्सिक आणि बॅलिस्टिक चाचण्यांच्या आधारे निश्चित झाले आहेत.”
अमित शहा काय म्हणाले?
गृहमंत्री अमित शहा यांनी या तीन दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्यात सहभाग असल्याचे कसे निश्चित झाले हे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले, “राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ने यापूर्वी दहशतवाद्यांना आसरा दिलेल्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांचे मृतदेह ज्यावेळी श्रीनगरला आणले तेव्हा त्यांची ओळख पटवली. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा सहभाग सिद्ध कऱण्यासाठी खूप प्रयत्न केले. जे दहशतवादी मारले गेले, तेच पहलगाम हल्ल्यास जबाबदार होते. तिन्ही दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक होते. आमच्याकडे त्यांच्या मतदार ओळखपत्र क्रमांकाचीही नोंद आहे. त्यांच्याकडून सापडलेली चॉकलेट्सही पाकिस्तानात तयार केलेली होती.”
एकंदर हेच ते तीन दहशतवादी कसे काय होते, त्यांना कसं मारलं याबाबतही विरोधकांनी संसदेत प्रश्न विचारले. एका विशिष्ट चाचणीमार्फत हे निश्चित करण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. नेमकी काय आहे ही बॅलिस्टिक चाचणी, ती कशी केली जाते, तिचा उपयोग काय याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
बॅलिस्टिक चाचणी म्हणजे काय?
बॅलिस्टिक्स ही गोळ्या आणि शस्त्रास्त्रांचा अभ्यास करणारी एक पद्धत आहे. या पद्धतीची सुरुवात १६ व्या शतकात झाली. मात्र, २० व्या शतकाच्या सुरूवातीला त्यात अधिक प्रगती झाली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारणा झाल्या.
गुन्हा घडलेल्या घटनास्थळाचा अभ्यास करताना बॅलिस्टिक्स अत्यंत महत्त्वाची ठरते. कारण- याच्या माध्यमातून कोणती बंदूक वापरली गेली हे ओळखता येते. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा होण्यास मदत होते. कारण- हे पुरावे न्यायालयात सादर करता येतात. बॅलिस्टिक मॅचिंगमध्ये एखादी गोळी किंवा काडतुसासाठी विशिष्ट प्रकारची बंदूक वापरली गेली आहे का हे शोधता येते. घटनास्थळावरून मिळालेल्या गोळीचे तुकडे किंवा काडतुसे, तसेच शस्त्रे तपासून हे केले जाते. यावरून घटनास्थळी कोणत्या प्रकारची बंदूक वापरण्यात आली हे तज्ज्ञ निश्चित करतात तसेच बंदूक, काडतुसे व गोळ्यांमध्ये साधर्म्य आहे का हे तपासतात.
ही पद्धत कशी काम करते?
तज्ज्ञ सर्वप्रथम घटनास्थळी सापडलेला पुरावा तपासतात. ते कॅलिपर आणि वजनकाटे वापरून गोळ्यांचे तुकडे आणि काडतुसे मोजतात. तसंच स्टिरिओ मायक्रोस्कोप आणि कम्पॅरिजन मायक्रोस्कोप यांचा वापर करून ते ठरवतात की, कोणत्या गोळ्या कोणत्या बंदुकीतून झाडण्यात आल्या. काही खास उपकरणांच्या साह्याने ते बंदुकीचा ट्रिगर खेचण्याची ताकद आणि नळीच्या आतील रचना तपासतात. त्यामुळे बंदुकीचे कॅलिबर (गोळीचा आकार) निश्चित करता येतो. कारण- बहुतांश आधुनिक बंदुका ठरावीक मापांनुसार तयार केलेल्या असतात. जर तपास करणाऱ्यांकडे बंदूक असेल, तर ते रायफलिंग मार्क्स (बंदुकीच्या नळीतील खाचा) तपासतात, जे गोळीला फिरवत बाहेर सोडतात. ते फायरिंग पिन मार्क्स (गोळी झाडल्यावर काडतुसाच्या मागे उमटलेले चिन्ह) व ब्रीचफेस मार्क्स (बंदुकीच्या मागच्या भागामुळे काडतुसावर उमटलेले ठसे) यांचादेखील अभ्यास करतात. त्याव्यतिरिक्त काडतूस बाहेर टाकताना उमटणारे एक्स्ट्रॅक्टर आणि इजेक्टर मार्क्ससुद्धा पाहिले जातात. हे सर्व पुरावे बॅलिस्टिक तज्ज्ञांकडे पाठवले जातात. हे तज्ज्ञ वर्षानुवर्षे प्रशिक्षण घेऊन ही प्रक्रिया अत्यंत बारकाईने आणि अचूकतेने पार पाडतात.
तज्ज्ञ कधी कधी शस्त्रांचा चाचणी करण्यासाठी वापर करून, गोळ्या आणि काडतुसे गोळा करतात. एका मोठ्या पाण्याच्या टाकीत शस्त्राचा वापर करून हे केले जाते. पाण्याच्या टाकीत गोळ्या पुन्हा मिळवणे शक्य असते. असे असताना काही लोकांनी बॅलिस्टिक ही शास्त्रशुद्ध पद्धत कितपत अचूक आहे याबद्दल संशय व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या फॉरेन्सिक सायन्स सेंटरने केलेल्या एका अभ्यासानुसार, ६६ प्रकरणांमध्ये परीक्षकांनी चुकीचे निष्कर्ष दिले आहेत. चुकीचा निष्कर्ष देण्याचे प्रमाण दर ४६ प्रकरणांमागे एक इतके असू शकते. इतर काही लोकांनीही अशाच प्रकारच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. सायंटिफिक अमेरिकन या प्रसिद्ध विज्ञानविषयक नियतकालिकेत नमूद केल्याप्रमाणे, एम्स लॅबोरेटरीजने केलेल्या एका अभ्यासात, गोळ्या आणि काडतुसे यांची तुलना करताना चुकीच्या निष्कर्षांचा दर ५२ टक्के आढळला. या अभ्यासात जे संशोधक एकाच पुराव्यावर काम करीत होते आणि नंतर तोच पुरावा इतर परीक्षकांकडे पाठवण्यात आला, तेव्हा किमान दोन-तृतीयांश वेळा त्यांनी वेगळे निष्कर्ष काढले. फक्त एक-तृतीयांश वेळा वेगवेगळ्या परीक्षकांचे निष्कर्ष सारखे होते. या निरीक्षणामुळे बॅलिस्टिक शास्त्राच्या कार्यक्षमतेबद्दल केलेल्या दाव्यांवर शंका उपस्थित केली गेली आहे.
बॅलिस्टिक चाचणीचे प्रकार?
- अंतर्गत बॅलिस्टिक्स- गोळीबार झाल्यावर बंदुकीच्या आतील घडामोड
- बाह्य बॅलिस्टिक्स- बंदुकीतून बाहेर पडल्यावर गोळीचा मार्ग
- टर्मिनल बॅलिस्टिक्स- गोळी लक्ष्यावर आदळल्यावर होणारा परिणाम
- फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स- बंदुकीतून गोळी झाडल्यावर मागे राहिलेल्या खुणांचे विश्लेषण
भारताने नेमका हा निष्कर्ष कसा काढला?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घटनास्थळी सापडलेली काडतुसे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली होती. त्यानंतर सोमवारी ‘ऑपरेशन महादेव’नंतर अतिरेक्यांच्या ठिकाणाहून भारताने शस्त्रसाठा जप्त केला. या शस्त्रांमध्ये एम-९ व एके-४७ रायफल्स होत्या. ही शस्त्रे सोमवारी रात्री विशेष विमानाद्वारे चंदिगड येथे केंद्रीय फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आली. या शस्त्रांचा वापर करून गोळीबारात झाडल्या गेलेल्या गोळ्यांची चाचणी करण्यात आली आणि त्या गोळ्यांच्या नळ्यांवरील खुणा गोळा करण्यात आल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वापरली गेलेली काडतुसांचा फॉरेन्सिक अहवाल आधीच तयार होता. त्या अहवालाची आणि नव्याने तपासलेल्या रायफल्सची तुलना करण्यात आली आणि त्याची जुळवाजुळव केल्यानंतर ती रायफल आणि काडतुसे जुळत असल्याचे स्पष्ट झाले.
शहा यांनी असेही सांगितले, “या चाचणीमुळे हे तीन दहशतवादी एप्रिलमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये सामील होते हे निश्चित झाले आहे. सहा बॅलिस्टिक तज्ज्ञांनी या निष्कर्षावर सह्या केल्या आहेत. त्यामध्ये संशयाला कुठेच जागा नाही. माझ्या हातात हा बॅलिस्टिक अहवाल आहे. त्यावर देशातील सहा प्रमुख वैज्ञानिकांच्या सह्या आहेत. सकाळी ४ वाजून ४६ मिनिटांनी मला एक व्हिडीओ कॉल आला आणि त्याद्वारे घटनास्थळी सापडलेल्या गोळ्या आणि ऑपरेशनमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या रायफल्स या दोन्ही गोष्टी परस्परांशी १०० टक्के जुळत असल्याची खात्री पटली.”