भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतरच्या तीन महिन्यांत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या नुकसानीबाबत अनेकदा उल्लेख केला होता. मात्र, त्याबाबतची ठोस माहिती आता भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी दिली आहे. मे महिन्यात भारताने पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबाबतची आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे. बंगळुरू इथल्या एचएएल मॅनेजमेंट अकादमीतील एका व्याख्यानादरम्यान बोलताना निर्णायक राजकीय पाठिंबा आणि सशस्त्र दलांना दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सिंग यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सिंग यांनी अशी माहिती दिली की, “७ मे रोजी उद्ध्वस्त केलेल्या लक्ष्यांपैकी हा हल्लादेखील पाकिस्तानच्या हवाईतळांवर केलेल्या हल्ल्यापैकी एक होता. इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स तसंच एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल असलेले विमान साधारण ३०० किमी अंतरावरून पाडण्यात आले. ही आतापर्यंतची नोंदवलेली सर्वात मोठी जमिनीवरून हवेत मारा केलेल्या कारवायांपैकी एक होती. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानची एकूण पाच लढाऊ विमानं आणि एक लष्करी विमान पाडलं होतं. या संदर्भात हवाई दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “३०० किमी ही जमिनीवरून हवेत मारा करणारी सर्वात लांब अंतरावरची कारवाई होती. हे विधान असे अधोरेखित करते की, अशा कारवायांची खात्री पटवणे क्वचितच शक्य असते. लांब पल्ल्याचे हल्ले क्वचितच नोंदवले जातात किंवा जाहीर केले जातात, कारण लष्कराकडे याबाबतीत स्वतंत्र पडताळणीची सोय नसते किंवा वापरलेल्या क्षमतांची माहिती गुप्त ठेवली जाते.”
या प्रकरणात वायुदल प्रमुखांच्या या विधानामागे इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंगद्वारे करण्यात आलेली खात्री हेही कारण असू शकते. “आमच्याकडे हल्ल्याची तीव्रता तपासण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनं आहेत. रडारवर एक ब्लिप दिसते आणि ती गायब होते आणि याचाच अर्थ रडार डेटाद्वारे या कारवाईची खात्री झाली असा होतो”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अशा कारवाया का महत्त्वाच्या आहेत?
अशाप्रकारचे लाँग रेंज किलिंग अतिशय दुर्मीळ असतात. ३०० किमी दूरचे लक्ष्य भेदण्यासाठी दीर्घ पल्ल्याचे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आवश्यक असते. भारतीय हवाई दलाने ही क्षमता नुकतीच मिळवली आहे, कारण भारताच्या ताफ्यात रशियाकडून घेतलेल्या एस-४०० ट्रायम्फ प्रणालीचा समावेश झाला आहे. “ऑपरेशनमध्ये एस-४०० प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यात आला असेही या अधिकाऱ्यानी सांगितले. या संदर्भात वायुदल प्रमुख म्हणाले की, “एस-४०० ची ४०० किमी मारक क्षमता पाकिस्तानी लढाऊ विमानांना ग्लाइड बॉम्ब टाकण्यासाठी आवश्यक अंतरात येण्यापासून रोखत होती. पाकिस्तानी विमानांना ही शस्त्रे योग्यरित्या वापरता आली नाहीत असे दिसले, कारण ते एस-४०० प्रणालीचा सामना करू शकले नाही.”
३०० किमी अंतरावरून हल्ला किती दुर्मीळ?
अलीकडच्या संघर्षांवरून असे लक्षात येते की, सार्वजनिकरित्या आतापर्यंत झालेला जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कारवाया यापेक्षा कमी अंतरावर करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये बीबीसीच्या अहवालानुसार युक्रेनने दावा केला की, त्यांनी २०० किमीपेक्षा जास्त अंतरावरून रशियन A-50 गुप्तचर विमान पाडले. हा त्यांचा महिनाभरातला दुसरा दावा होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनियन एसयू-२७ हे रशियन एस-४०० ने सुमारे १५० किमी अंतरावर पाडले असे एका अहवालात सांगितले होते. युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी सांगितले की, हे विमान रोस्तोव्ह-ऑन-डॉन आणि क्रास्त्रोदर या रशियन शहरांदरम्यान आघाडीच्या रेषेपासून २०० किमी दूर पाडले गेले.
महत्त्वाचे मुद्दे:
- भारताने पाकिस्तानची एकूण पाच लढाऊ विमानं आणि एक लष्करी विमान पाडलं होतं
- ३०० किमी अंतरावरून सर्वात मोठी जमिनीवरून हवेत लक्ष्यभेदी कारवाई
- ३०० किमी दूरचे लक्ष्य भेदण्यासाठी दीर्घ पल्ल्याचे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आवश्यक
- भारताच्या ताफ्यात रशियाकडून घेतलेल्या एस-४०० ट्रायम्फ प्रणालीचा समावेश
- ऑपरेशनमध्ये एस-४०० प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर
- भारताने रशियाकडून घेतले एस-४००
या हल्ल्यामागची प्रणाली काय?
भारताला रशियाकडून करारातील पाच एस-४०० युनिट्सपैकी तीन मिळाले आहेत. ते पाकिस्तान आणि चीनच्या सीमेजवळ तैनात केलेले आहेत. उर्वरित दोन युनिट्स २०२५-२०२६ पर्यंत मिळणार आहेत. वरिष्ठ अधिकारी याची तुलना एका बॅटरीशी करतात; म्हणजेच एक अशी बॅटरी जी सीमेच्या पलीकडे कित्येक किलोमीटर दूरवर पाहण्याची क्षमता राखते. अमेरिकेने काउंटरिंग अमेरिकाज अॅडर्व्हसरीज थ्रू सँक्शन्स अॅक्ट (CAATSA) कायदा मंजूर केल्यानंतरच्या पुढच्याच वर्षी भारताने एस-४०० खरेदीचा करार रशियाशी केला होता. अमेरिकेच्या या कायद्यामार्फत वॉशिंग्टन रशिया, इराण किंवा उत्तर कोरिया यांच्याकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध घालू शकतो.