How TRF terrorists used Chinese tech to contact Pakistan handlers: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक गंभीर पैलू आता समोर येत आहेत. या हल्ल्यामागे असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांशी संपर्क साधण्यासाठी चिनी अ‍ॅप्स आणि उपकरणांचा वापर केल्याचा दावा न्यूज18 ने गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. विशेष म्हणजे, या अ‍ॅप्स आणि उपकरणांवर २०२० साली गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारतात बंदी घालण्यात आली आहे. या गुप्तचर अहवालात पुढे असंही म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या परिसरात एक चिनी सॅटेलाइट फोन आढळला. या हल्ल्याचा तपास करणारी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) या शक्यतेचाही तपास करत आहे.

दहशतवाद्यांनी वापरलेला सॅटेलाइट फोन Huawei कंपनीचा असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे. भारतात या प्रकारच्या फोनवर बंदी असल्याने, हे फोन पाकिस्तान किंवा इतर कोणत्यातरी इतर देशातून भारतात तस्करी करून आणले जातात. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असंही नमूद करण्यात आलं आहे की, या सॅटेलाइट फोनचा माग काढण्यासाठी पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांकडून तांत्रिक माहिती आणि मदत घेतली जात आहे.

ही उपकरणं कसं काम करतात?

बिझनेस टुडेने या संदर्भात म्हटले आहे की, Huawei कंपनीची काही स्मार्टफोन मॉडेल्स उपग्रह संप्रेषण (Satellite Communication) सुविधा देतात. Mate 60 Pro, P60 सिरीज आणि Nova 11 Ultra ही मॉडेल्स विशेषतः चीनच्या Tiantong-1 उपग्रह नेटवर्कशी जोडणीसाठी तयार करण्यात आली आहेत. हे फोन चायना टेलिकॉमच्या सिम कार्ड्स आणि सदस्यत्वावर चालतात. यामध्ये उपग्रह अँटेना आणि विशेष चिप्स बसवलेल्या असतात, त्यामुळे कोणतेही बाह्य उपकरण न वापरता हे फोन थेट सॅटेलाइट नेटवर्कशी जोडले जाऊ शकतात. या फोनमध्ये कमी बँडविड्थवर चालणाऱ्या कॉल आणि मेसेज सेवा असतात आणि त्या अशा ठिकाणीही काम करतात जिथे मोबाईल नेटवर्क मिळत नाही. हे सॅटेलाइट फोन Iridium सारख्या non-terrestrial networks चा वापर करून स्थानिक दूरसंचार यंत्रणेला बगल देतात.

मिलीसेकंदांत डेटा ट्रान्स्फर

CNBC ने वृत्तांकनात म्हटले आहे की, काही चिनी अ‍ॅप्स आणि फोनमध्ये end-to-end encryption वापरले जाते. यात प्रगत एन्क्रिप्शन तंत्रज्ञान असते. जे क्वांटम संगणकाद्वारेही हॅक करता येत नाही, असा दावा केला जातो. याशिवाय, steganography चा (प्रतिमा किंवा व्हिडिओसारख्या फाइल्समध्ये संदेश लपवणे) वापर देखील केला जातो. हे फोन burst transmitters वापरतात. जे काही मिलीसेकंदांत डेटा पाठवतात आणि frequency hopping म्हणजे वारंवार रेडिओ फ्रिक्वेन्सी बदलण्याची प्रणाली वापरतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना त्यांचा मागोवा घेता येत नाही किंवा त्यांचा सिग्नल जॅम करता येत नाही.

चिनी अ‍ॅप्स आणि उपकरणांचाच वापर का केला जातो?

दहशतवाद्यांकडून चिनी तंत्रज्ञानाचा वापर ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या काही वर्षांपासून अनेक वेळा असे उघड झाले आहे की, दहशतवादी चिनी बनावटीची मोबाइल उपकरणं, अ‍ॅप्स आणि अ‍ॅक्सेसरीज वापरून त्यांच्या सूत्रधारांशी संपर्क साधतात आणि हल्ल्यांची आखणी करतात. यामुळे, चिनी कंपन्या जाणूनबुजून दहशतवादाला हातभार लावत आहेत का, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः चिनी अ‍ॅप्समध्ये एन्क्रिप्टेड मेसेजिंग सुविधा असते, या पारंपरिक गुप्तचर यंत्रणांच्या देखरेखीतून बचाव करून संवाद साधण्यासाठी दहशतवाद्यांमध्ये ती यंत्रणा अधिक लोकप्रिय ठरली आहे. असे मानले जाते की, Huawei कंपनीचे उपग्रह-सक्षम फोन भारतीय सेल्युलर आणि सॅटेलाइट पाळत यंत्रणांपासून बचाव करू शकतात. चिनी स्मार्टफोन आणि उपकरणं बाजारात सहज उपलब्ध असतात आणि अनेकदा आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या तुलनेत स्वस्तही असतात.

चीन सरकार किंवा कंपन्या वापरकर्त्याचा डेटा पाहू शकतात

काही चिनी स्मार्टफोन उत्पादक त्यांच्या उपकरणांमध्ये प्रगत सुरक्षा प्रणाली देतात. ज्यात अत्यंत शक्तिशाली एन्क्रिप्शनची क्षमता असते. जरी ही वैशिष्ट्ये वापरकर्त्याच्या गोपनीयतेसाठी असली, तरी ती गुन्हेगार किंवा दहशतवाद्यांकडून त्यांचे संवाद/मेसेजेस लपवण्यासाठी वापरली जाऊ शकतात. चिनी बनावटीच्या तंत्रज्ञानामध्ये बॅकडोअर एन्ट्रीच्या शक्यतेवर दीर्घकाळापासून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चीन सरकार किंवा उत्पादक कंपन्या वापरकर्त्याचा डेटा पाहू शकतात. जरी या प्रकरणात त्या बॅकडोअरचा वापर झाल्याचे ठोस पुरावे सध्या उपलब्ध नसले, तरी या शक्यतेला पूर्णपणे नाकारता येत नाही.

चीनचा पाकिस्तानला पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, चीनने पाकिस्तानला ठाम पाठिंबा दिला आहे. चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत या हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीला पाठिंबा दर्शवला आहे. शिन्हुआ या चिनी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, वांग यी म्हणाले, “चीनला पाकिस्तानच्या न्याय्य सुरक्षाविषयक चिंता समजतात तसेच पाकिस्तानच्या सार्वभौमत्व व सुरक्षेच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही पाठिंबा देतो.” ते पुढे म्हणाले, “चीन न्याय्य चौकशीच्या बाजूने आहे आणि असे मानतो की, हा संघर्ष भारत आणि पाकिस्तान यांपैकी कोणाच्याच मूलभूत हितासाठी उपयुक्त नाही. तसेच यामुळे प्रादेशिक शांतता व स्थिरतेलाही बाधा निर्माण होते.” पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वरील निवेदनात या संभाषणावर शिक्कामोर्तब केले असून, डार यांनी वांग यांना क्षेत्रीय परिस्थितीची माहिती दिल्याचे नमूद केले. डार यांनी असेही म्हटले की, “भारताचे एकतर्फी आणि बेकायदेशीर निर्णय तसेच पाकिस्तानविरोधातील निराधार प्रचार चीनने स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.”

२३ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मुख्यत्वे पर्यटकांसह २६ जण ठार झाले. या गोष्टीचा चीनने तीव्र निषेध केला होता. “आम्ही या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा ठाम विरोध करतो,” असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.