करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटातही भारताच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास कायम आहे, असा दावा एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केला आहे. त्यांनी लोकप्रिय नेत्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यात पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेसह ब्रिटन आणि इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

द मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था बऱ्याचदा असं सर्वेक्षण करत असते. या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदी यांचं गुणांकन ६६ टक्के आहे, जे इतर कोणत्याही जागतिक नेत्याच्या गुणांकनापेक्षा जास्त आहे.

ऑगस्ट २०१९मध्ये ज्यावेळी सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अशाच एका सर्वेक्षणामधून हे समोर आलं होतं की मोदी यांच्या लोकप्रियतेचं गुणांकन ८२ टक्क्यांवर पोहोचलं आहे. मात्र आता नव्या सर्वेक्षणातून हे लक्षात आलं आहे की मोदी यांचं गुणांकन आता २० टक्क्यांनी घसरलं असलं तरीही ते जगातले सर्वात लोकप्रिय नेते आहेतच.

हेही वाचा- लोकप्रियतेत घट होऊनही नरेंद्र मोदीच सर्वोत्कृष्ट नेते; बायडन यांच्यासह १३ देशांच्या नेत्यांना टाकलं मागे

हे सर्वेक्षण करताना ज्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला, त्यात भारतातल्या २१२६ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६६ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास असल्याचं सांगितलं आहे. तर २८ टक्के लोकांनी त्यांच्याबद्दल निराशा दर्शवली आहे.

द मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने निवडणुकीदरम्यानची सर्व माहिती, रियल टाईम पोलिंग डाटा, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची माहिती आणि निवडणुकांच्या वेळचे चर्चेतले मुद्दे या सर्वांचा अभ्यास केला आहे. दरवेळी हे सर्वेक्षण करताना अशाच पद्धतीने केलं जातं. त्यासोबतच जगभरात ११ हजारहून अधिक मुलाखती घेतल्या जातात.

या सर्व मुलाखती ऑनलाईन घेतल्या जातात. भारतामध्ये या सर्वेक्षणासाठी सुशिक्षित लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या सर्वेक्षणासाठी शिक्षण, वय, लिंग, सामाजिक मुद्दे त्याचसोबत इतरही काही घटकांचा आधार घेतला जातो.