भारताने ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची चाचणी नुकतीच घेतली. हे क्षेपणास्त्र आता संरक्षण दलांमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे. भारताचे हे पहिलेच डावपेचात्मक पातळीवर डागण्यात येईल, असे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रांच्या खरेदीला सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या क्षेपणास्त्राचे ‘प्रलय’ हे नाव समर्पक असून, दहशतवाद्यांचा ते कर्दनकाळ ठरेल. सध्याच्या ‘नॉन कॉन्टॅक्ट वारफेअर’मध्ये हे क्षेपणास्त्र प्रभावी भूमिका बजावेल.
क्षेपणास्त्राची चाचणी
भारताने २८ आणि २९ जुलै रोजी ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेतली. ओडिशाच्या किनाऱ्यापासून जवळ असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद बेटांवरून ही घेण्यात आली. ही चाचणी म्हणजे क्षेपणास्त्राच्या मूल्यमापनातील पुढील टप्पा होता. ती यशस्वी पार पडली. क्षेपणास्त्राचा किमान आणि कमाल पल्ला या चाचणीने प्रमाणित करण्यात आला. या चाचणीत निर्धारित लक्ष्याला क्षेपणास्त्राने यशस्वीपणे भेदले. चाचणीदरम्यान सर्व आवश्यक नोंदी करण्यात आल्या. सर्व यंत्रणा आणि उपयंत्रणांनी अपेक्षित काम केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
प्रकल्पाला सुरुवात कधी?
‘प्रलय’ क्षेपणास्त्र हे संरक्षण, संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. या प्रकल्पाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. हैदराबाद येथील संशोधन केंद्र इमरत (आरसीआय), संरक्षण, संशोधन व विकास प्रयोगशाळा (डीआरडीएल), ॲडव्हान्स्ड् सिस्टीम्स लॅबोरेटरी यांच्यासह इतर प्रयोगशाळांनी या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी काम केले आहे. ‘भारत डायनामिक्स लिमिटेड’, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ यांच्यासह विविध ‘एमएसएमई’ कंपन्या या प्रकल्पात सहभागी आहेत. या क्षेपणास्त्राच्या आतापर्यंत चार चाचण्या झाल्या असून, पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे संरक्षण दलामध्ये हे क्षेपणास्त्र दाखल करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.
क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र विविध प्रकारची स्फोटके वाहून नेऊ शकते. तसेच, विविध प्रकारच्या लक्ष्यांना भेदू शकते. ‘प्रलय’ हे ‘क्वासाय बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र आहे. ‘क्वासाय बॅलिस्टिक’ हा क्षेपणास्त्रांचा विशेष प्रकार असून, हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्राप्रमाणे वर्तुळाकार मार्गाने मार्गक्रमण करते. मात्र, मार्गक्रमण करीत असतानाच ते गरजेनुसार दिशा बदलून शत्रूला चकित करू शकते. तसेच, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापेक्षा हे क्षेपणास्त्र कमी उंचीवरून मार्गक्रमण करते. या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमुळे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असूनही ते छोट्या संघर्षांमध्ये डावपेचात्मक पातळीवर कमी अंतरावर मारा करण्यासाठी वापरता येते. ‘प्रलय’ क्षेपणास्त्र पाचशे ते हजार किलो स्फोटके वाहून नेऊ शकते. दीडशे ते पाचशे किलोमीटर अंतरापर्यंत क्षेपणास्त्र मारा करू शकते. पाच टनांचे हे क्षेपणास्त्र असून, १ ते १.६ मॅक वेगाने ते मारा करते.
अचूक हल्ल्यांच्या भेदकतेत वाढ
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे अचूक हल्ला करण्याच्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ‘प्रलय’च्या यशस्वी चाचणीमुळे देशाच्या भात्यात ‘ब्राह्मोस’प्रमाणेच आणखी एक अचूक भेदक क्षेपणास्त्र येण्याच्या मार्गावर आहे. अर्थात ‘ब्राह्मोस’ आणि ‘प्रलय’ या क्षेपणास्त्रांचे प्रकार वेगळे असून, ‘ब्राह्मोस’ हे क्रूज क्षेपणास्त्र आहे, तर ‘प्रलय’ हे ‘क्वासाय बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्र आहे. भारताचे हे पहिलेच टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्रामुळे संरक्षण दलांचे बळ आणखी वाढणार आहे. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे विशेष म्हणजे ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या रडार; तसेच हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देऊ शकतात. या क्षेपणास्त्रांना भेदणे कमालीचे अवघड असते. या क्षेपणास्त्रांचे महत्त्व ओळखून १२० प्रलय क्षेपणास्त्रांच्या खरेदीस सरकारने २०२२ मध्येच मंजुरी दिली आहे.
पाकिस्तान-चीनचे आव्हान पेलणार
प्रलय क्षेपणास्त्र संरक्षण दलात दाखल झाल्यानंतर भारताच्या रॉकेट दलाचा (इंटिग्रेटेड रॉकेट फोर्स, आयआरएफ) भाग होण्याची शक्यता आहे. तिन्ही दलांच्या समन्वयाचा एक भाग म्हणून या दलाकडे पाहिले जाते. असे दल स्थापण्याचे प्रस्तावित आहे. या दलामध्ये निर्भय, पिनाका यंत्रणा, ब्राह्मोस क्षेपणास्त्रे अशा इतर क्षेपणास्त्रांचाही समावेश असेल. पाकिस्तान आणि चीनचे एकत्रित आव्हान आणि सध्याच्या ‘नॉन कॉन्टॅक्ट वॉरफेअर’च्या काळात भविष्यातील युद्धांची मदार या दलावरच प्रामुख्याने असेल. आतापर्यंत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे म्हणजे अण्वस्त्रांचा मारा करण्यासाठीचा उपाय म्हणून पाहिले जायचे. पण, प्रलय क्षेपणास्त्रांमुळे डावपेचात्मक पातळीवरही आता ही क्षेपणास्त्रे वापरता येतील. भारताने आतापर्यंत दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट हवाई हल्ला आणि नुकतेच ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविले. दहशतवाद्यांविरोधातील अशा कारवाईमध्ये ‘प्रलय’ क्षेपणास्त्र महत्त्वाची भूमिका बजावेल. हे क्षेपणास्त्र दहशतवाद्यांचा नक्कीच कर्दनकाळ ठरेल.
prasad.kulkarni@expressindia.com