विधानसभा निवडणुकीत महायुतीने नेत्रदीपक असे यश मिळवले. या निवडणुकीत उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांची धुळधाण उडाली. राज्यभर ५८ जागांवर विजय मिळवल्यामुळे खरी शिवसेना कुणाची या प्रश्नाचा कौल निवडणुकीच्या रणधुमाळी पुरता का होईना, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला. भाजपला राज्यभर मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागले. त्यानंतरही राज्यभरातून वेगवेगळ्या पक्षांचे नेते, पदाधिकारी त्यांच्या पक्षात येतच राहिले. ठाकरे सेनेला तर खिंडार पाडण्याचा विडाच शिंदेनी उचलला. मुंबई महापालिकेतील ५०हून अधिक माजी नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवताना आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनेही शिंदे जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे पाहायला मिळत होते. एकीकडे हे सगळे सुरू असताना मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे चित्र दिसू लागल्याने सध्या भाजपपेक्षा शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता दिसू लागली आहे.
मुंबई आणि ठाणे-कल्याण
मुंबईत छाप सोडायची असेल तर या महानगरातील मराठीबहुल वस्त्यांमधील ठाकरे नावाचे गारूड उतरवावे लागेल याची पुरेपूर कल्पना शिंदे यांना आहे. असे असताना ठाकरे बंधूंच्या जवळिकीमुळे या वस्त्यांवर वर्चस्व मिळवताना शिंदे यांना घाम फुटण्याची शक्यता आहे. ठाणे, डोंबिवली यासारख्या बालेकिल्ल्यातही रसातळाला निघालेल्या ठाकरे यांच्या पक्षांमध्ये या नव्या समीकरणामुळे धुगधुगी निर्माण होऊ लागली आहे.
मुंबई शिंदेंसाठी महत्त्वाची का?
राज आणि उद्धव सोबत आल्यास मुंबईत नेमके काय चित्र दिसू शकेल याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यभर १० टक्क्यांहून कमी मते मिळाली आणि त्यांना केवळ २० जागा जिंकल्या आल्या. मुंबईत मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १० जागांवर विजय मिळवता आला आणि या पक्षाला २३ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली. या निवडणुकीत मुंबईत भाजपला २९ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली तर शिंदे यांच्या शिवसेनेला १८ टक्के इतकी मते मिळाली. याचा अर्थ शिंदे यांच्या पक्षाला मुंबईत ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा कमी मिळाली आहेत. राज्यभर उद्धव यांच्या पक्षापेक्षा शिंदेसेनेने चांगली कामगिरी केली असली तरी मुंबईतही आपलाच पक्ष पुढे आहे हे दाखविण्याची मोठी संधी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने शिंदे यांना मिळेल. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली यांसारखी शहरे शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात. विधानसभा निवडणुकीत या भागातील मतदारसंघात शिंदेसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. मुंबईत मात्र शिंदे यांच्यापुढे आजही ठाकरे सेनेचे आव्हान कायम आहे. मुंबई महापालिकेतील ठाकरे यांच्या निकटवर्तीय नगरसेवकांना आपल्या पक्षात आणण्यासाठी शिंदे यांच्याकडून वेगवेगळे हातखंडे वापरले जात आहेत. स्थानिक पातळीवर ठाकरे यांची संघटना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. इतके सगळे करूनही मुंबईत ठाकरेंचा दबदबा राहिला तर शिंदेंसाठी तो मोठा धक्का ठरेल.
मराठी पट्टा नेमका कुणाचा
मुंबईत मागाठणे, भांडूप, अंधेरी (पूर्व), चांदिवली, चेंबुर, कुर्ला या सहा मतदारसंघांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलिना, वांद्रे पूर्व, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा या दहा मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत. यापैकी बहुसंख्य मतदारसंघ हे मुंबईतील मराठीबहुल मानले जातात. मुंबई-ठाण्याच्या वेशीवर असलेल्या भांडूप, विक्रोळी यासारख्या पट्ट्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे. असे असताना भांडूपसारखा हक्काचा मतदारसंघ शिंदेंनी ठाकरे यांच्याकडून खेचून आणला. जोगेश्वरी, दिंडोशी, माहिम, वरळी, शिवडीतही ठाकरे यांच्या शिवसेनेला विजयासाठी झुंजावे लागले. आदित्य ठाकरे यांना वरळीतील विजयदेखील सोपा नव्हता. गिरगावात ठाकरे यांच्या शिवसेनेची पूर्वीइतकी पकड राहिलेली नाही. तर मराठीबहुल विलेपार्ले भाजपला बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे मुंबईतील मराठी पट्ट्यावर वर्चस्व मिळविण्यासाठी ठाकरे आणि शिंदेसेनेत संघर्ष आहे. मागाठणे, अंधेरी पूर्व, चांदिवली, चेंबूर, कुर्ला हे यापूर्वी ठाकरे यांच्याकडे असलेले मतदारसंघ शिवसेनेतील फुटीनंतर शिंदेसेनेने आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे. या सर्व मतदारसंघात ठाकरे आणि शिंदेसेनेत संघर्ष तीव्र होत असताना राज ठाकरे यांच्या पक्षाला मानणारा मतदार निर्णायक ठरेल अशी शक्यता आहे.
कोणाकडे किती टक्का?
राज्यभरात जेमतेम दोन टक्क्यांच्या आसपास मते घेणाऱ्या मनसेला मुंबईत सात टक्के इतक मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकाचे गणित लक्षात घेता दोन्ही ठाकरे बंधूंची मते ३० टक्क्यांच्या आसपास भरतात. भाजपला मुंबईत २९ टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत. ही आकडेवारी पाहता दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास सर्वात मोठे आव्हान शिंदे यांच्यापुढे आणि तेही मराठी बहुल पट्ट्यात उभे राहील असे जाणकारांचे मत आहे.
मुंबई महानगरांमध्येही धुगधुगी?
शिवसेनेतील दुभंगानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सर्वात मोठा फटका ठाणे, कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये बसला आहे. ही शहरे एकेकाळी एकसंध शिवसेनेची आणि ठाकरे यांची बलस्थाने मानली जात होती. मात्र या शहरांवर ठाकरे यांचा नाही तर शिंदे आणि भाजपचा वरचष्मा आहे. ठाणे जिल्ह्यात तीन जागांचा अपवाद सोडला तर १५ ठिकाणी शिंदे आणि भाजपचे आमदार आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली पट्ट्यात ठाकरे यांची शिवसेना अस्तित्वासाठी झगडत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकमेव आमदार कल्याण ग्रामीण या मतदारसंघात होता. एकनाथ शिंदे यांचे पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत तेथे तत्कालीन आमदार राजू पाटील यांचा पाडाव केला. राजू पाटील यांना हा पराभव जिव्हारी लागला. लोकसभा निवडणुकीत पूर्ण मदत करूनही खासदार शिंदे यांनी आपल्या पराभवासाठी दिवसरात्र एक केली याचा राग राजू पाटील यांच्या मनात आहे. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे राजू पाटील आणि स्थानिक ठाकरे गटाचे नेते आतापासूनच एकत्र आल्याचे पहायला मिळत आहे. ठाण्यात अविनाश जाधव, राजन विचारे आणि आमदार जितेंद्र आव्हाड एकत्रितपणे शिंदे यांना आव्हान उभे करण्याच्या स्थितीत येताना दिसत आहेत. रसातळाला जात असलेल्या पक्षांमध्ये या नव्या समीकरणामुळे धुगधुगी आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
फुटीचा धोका टळला?
विधानसभा निवडणुकांमधील दारुण पराभवानंतर ठाकरे गटाला मोठी गळती लागली. राज्यभरात जेथे ठाकरे गटाचे प्रभावशील पदाधिकारी दिसतील त्यांना आपल्या पक्षात आणावे असा एककलमी कार्यक्रम शिंदे यांच्याकडून राबविला जात होता. ठाकरे यांच्या पक्षात धुगधुगीदेखील शिल्लक ठेवायची नाही असा हा आक्रमक प्रयत्न होता. पडेल ती किंमत मोजून त्यासाठी राबणारी एक मोठी फळी शिंदेसेनेत कार्यरत होती. पण ठाकरे बंधूंच्या मनोमीलनाचे चित्र पुढे येत असताना उद्धव यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.