गौरव मुठे

गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी निधन झाले. सर्वसामान्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळविता येतो असे स्वप्न भारतीय गुंतवणूकदारांना दाखवणाऱ्या व्यक्तींपैकी राकेश झुनझुनवाला होते. शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून समोर ठेवले होते. यामुळेच मध्यमवर्गीयांना राकेश झुनझुनवालांविषयी खूप आकर्षण होते. झुनझुनवाला यांचा शेअर बाजारातील प्रवेश ते बिग बुलपर्यंतचा प्रवास अतिशय रंजक राहिला आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद

राकेश झुनझुनवाला कोण होते?

गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरन बफेट’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा जन्म एका प्राप्तिकर अधिकाऱ्याच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरामध्ये झाला. ५ जुलै १९६० ला जन्मलेले झुनझुनवाला मुंबईत लहानाचे मोठे झाले. सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. सनदी लेखापाल अर्थात सीएचे शिक्षण घेत असताना त्यांनी वडिलांकडे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार बोलून दाखवला. झुनझुनवाला यांचा घरात ते लहान असल्यापासून शेअर बाजाराविषयी चर्चा होत असे. यामुळे किशोर वयापासून त्यांचा शेअर बाजाराकडे ओढा वाढला. दिवसभराच्या बातम्यांचा शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम होतो, याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांचा वडिलांनी त्यांना दिला. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी वडिलांनी त्यांना त्यांच्याकडून किंवा मित्रांकडून पैसे मागायचे नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले.

राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात कधी पाऊल ठेवले?

झुनझुनवाला यांनी प्रथम १९८५मध्ये ५ हजार रुपयांच्या भांडवलासह शेअर बाजारात पहिली गुंतवणूक केली. त्यांनी गुंतवणुकीची सुरुवात टाटा समूहातील कंपनीचे समभाग खरेदी करून केली. टाटा समूहातील टाटा टी कंपनीचे सुमारे पाच हजार समभाग ४३ रुपये प्रति समभागाप्रमाणे त्यांनी खरेदी केले. तीन महिन्यांच्या कालावधीत समभागाची १४३ रुपये प्रति समभाग झाल्यावर त्यांनी नफावसुली केली. त्यांनी केलेल्या पहिल्या गुंतवणुकीतून त्यांना तिपटीहून अधिक फायदा झाला. त्यांनतर पुन्हा १९८६मध्ये त्यांनी शेअर बाजारात केलेल्या अडीच लाख रुपयांवर त्यांना पाच लाख रुपयांचा नफा झाला. बिग बुल म्हणजेच शेअर बाजारात सर्वाधिक नफा कमावणाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांना हर्षद मेहताच्या काळात मोठा नफा झाला होता. १९९२मध्ये हर्षद मेहताचा घोटाळा बाहेर आल्यावर त्यावेळी मोठे नुकसान देखील सहन करावे लागले होते. झुनझुनवाला यांनी शॉर्ट सेलिंग म्हणजेच एखादा समभाग बाजारात आधी जास्त किमतीला विक्री करायचा आणि त्या समभागाची किंमत कमी झाली की, तो खरेदी करायचा अशा माध्यमातून मोठा नफा मिळविला होता.

झुनझुनवाला शेअर बाजारातील ‘बिग बुल’ कसे बनले?

झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या सोबत रारे एन्टरप्रायझेस नावाची स्टॉक मार्केट ट्रेडिंग फर्मची सुरुवात केली. रारे एन्टरप्रायझेस हे नाव त्यांनी स्वत:च्या आणि पत्नीच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवले होते. २००३ मध्ये टाटा समूहातील घड्याळे आणि दागिने बनवणाऱ्या टायटन कंपनीचे सुमारे ६ कोटी समभाग खरेदी केले. टायटन कंपनीचे हे समभाग त्यांनी अगदी ३ रुपये प्रतिसमभाग इतक्या अत्यल्प किमतीला खरेदी केले. अजूनही त्यांच्या कंपनीकडे टायटन कंपनीचे ४.५ कोटींहून अधिक समभाग असून त्यांची किंमत ८,००० कोटींहून अधिक आहे. ते टायटन कंपनीमधील एक मोठे गुंतवणूकदार होते. टायटन कंपनीबरोबरच टाटा मोटर्स, क्रिसिल, लुपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नाझरा टेक्नोलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा क्रॉप, डीबी रिअॅलिटी आणि टाटा कम्युनिकेशनसारख्या कंपन्यांमध्येदेखील त्यांनी गुंतवणूक केली. त्यांनी भांडवली बाजारात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे ३५,००० कोटींच्या पुढे आहे. अशा प्रकारे शेअर बाजारातील सुरुवातीच्या अगदी अत्यल्प गुंतवणुकीतून झुनझुनवाला शेअर बाजारातील बिग बुल बनले. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे ६ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ४५,३२८ कोटी रुपयांची आहे. गेल्या वर्षी झी मीडियामध्ये सुरू असलेल्या एका वादामुळे झुनझुनवाला यांनी काही दिवसांपूर्वीच झीचे शेअर खरेदी करून त्यातून जवळपास ५० टक्क्यांहून अधिक नफा मिळविला होता. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील काही कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करून त्या कंपन्यांमध्ये मोठे भागधारक बनले होते. त्यामुळे शेअर बाजारातील ते एक प्रभावी गुंतवणूकदार होते.

विश्लेषण: ७५ वर्षात रुपया किती घसरला? आज एक डॉलर ८० रुपयांच्या जवळ, जाणून घ्या आत्तापर्यंतचा इतिहास

अपयशाबद्दल काय म्हणाले होते?

राकेश झुनझुनवाला यांनी चालू वर्षात ‘आकासा एअर’ ही विमान वाहतूक कंपनी सुरू केली. तर चालू ऑगस्ट महिन्यात आकासा एअरच्या प्रत्यक्ष सेवेलादेखील सुरुवात झाली. एकीकडे विमान वाहतूक कंपन्या करोनामुळे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या खनिज तेलाच्या किमतीमुळे अडचणीचा सामना करत असताना देखील झुनझुनवाला यांनी विमान वाहतूक कंपनी सुरू करण्याचे धाडस केले. एप्रिल महिन्यात झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या छायाचित्राची समाजमाध्यमांमध्ये सगळीकडे चांगलीच चर्चा झाली होती. त्या बैठकीनंतरच आकासा एअरला सरकारचा हिरवा कंदील मिळाला. कंपनीने पुढील चार वर्षांत १८० आसन क्षमतेची ७० विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४०० कर्मचाऱ्यांसह सेवा सुरू करण्यात आली असून कंपनीकडे दोन बोईंग विमाने आहेत. पुढील वर्षात मार्चपर्यंत कंपनीच्या ताफ्यात १८ विमानांचा समावेश असेल असा दावा आहे. विमान वाहतूक कंपन्यांसाठी कथिक काळ असताना किफायतीशीर किमतीत विमान सेवा पुरवण्याच्या निर्णयावर एका मुलाखतीत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी मी अपयशासाठी तयार आहे. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करून अयशस्वी होणे कधीही चांगले असे उत्तर त्यांनी दिले होते.

शेअर बाजाराबद्दल झुनझुनवाला काय म्हणाले होते?

शेअर बाजाराचा कोणीही राजा नसतो. ज्यांनी शेअर बाजाराचा राजा होण्याचा प्रयत्न केला त्यांचे आर्थर रोड हे घर बनले. शेअर बाजार हा स्वतःच स्वतःचा राजा आहे. निसर्ग, मृत्यू आणि शेअर बाजार याबाबत कोणीही काहीही सांगू शकत नाही, या तीन गोष्टींबाबत भविष्यकथन करणे अशक्य आहे. शेअर बाजार हा कायम गूढ आणि अस्थिर राहिला आहे. तो कधी कोणत्या दिशेला झेपावेल याबाबत कोणीही भविष्यकथन करू शकत नाही.

झुनझुनवाला शेअर बाजाराशी संबंधित कोणत्या वादात अडकले होते?

झुनझुनवाला, त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला आणि इतर आठ व्यक्तींनी अॅप्टेक लिमिटेडच्या शेअरमध्ये इनसायडर ट्रेडिंगच्या माध्यमातून मोठा नफा मिळविल्याचा आरोप करण्यात आला होता. इनसाइडर ट्रेडिंग म्हणजे ज्यात गोपनीय माहितीच्या आधारे, स्वतःच्या फायद्यासाठी शेअर बाजारात व्यवहार केला जातो. ही व्यवसायाची चुकीची पद्धत आहे. यामुळे भांडवली बाजार नियामक सेबीने झुनझुनवाला आणि इतरांना ३७ कोटींचा दंड केला होता. या रकमेमध्ये सेटलमेंट शुल्क, चुकीच्या पद्धतीने मिळविलेला नफा आणि व्याजाचे शुल्क याचाही समावेश होता. यामध्ये स्वतः झुनझुनवाला यांनी १८.५ कोटी आणि त्यांची पत्नी रेखा यांनी ३.२ कोटींचा दंड भरला. या आधीदेखील झुनझुनवाला यांची सेबीने चौकशी केली होती. सेबीने २०१८मध्ये त्यांची दुसऱ्या एका कंपनीतील संशयास्पद व्यवहाराबाबत चौकशी केली होती. झुनझुनवाला यांनी नंतर २.४८ लाख रुपये देऊन, सहमतीने हे प्रकरण सोडवले होते. ‘सहमती’ या प्रक्रियेद्वारे गुन्ह्याचा स्वीकार न करता किंवा आरोप न फेटाळता सेबीला शुल्क देऊन संबंधित नियम उल्लंघन प्रकरणी तोडगा काढता येऊ शकतो.

विश्लेषण : रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचा RBIचा निर्णय, ५ लाख ठेविदारांना पैसे परत मिळणार का? जाणून घ्या सविस्तर

झुनझुनवाला यांनी शेअर बाजाराविषयी काय आर्थिक मंत्र दिले?

झुनझुनवाला म्हणायचे की, भाव ईश्वर आहे. शेअर बाजारात नेहमी किमतीचा आदर करा. प्रत्येक किमतीवर, एक खरेदीदार आणि एक विक्रेता उपलब्ध असतोच. कोण बरोबर आहे हे फक्त भविष्य ठरवते.

शेअर बाजार हा नेहमीच बरोबर असतो. बाजारात फक्त एकच नियम आहे तो म्हणजे बाजारासाठी कोणतेही नियम नाहीत.

बरोबर किंवा चुकीचे असे काही नसते. तुम्ही बरोबर असताना तुम्ही किती पैसे कमावले आणि तुम्ही चुकीचे असताना किती गमावले हेच केवळ महत्त्वाचे आहे.

gaurav.muthe@expressindia.com