बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले. तसेच कौटुंबिक संबंधही तोडल्याची घोषणा केली. समाज माध्यमात तेजप्रताप यांच्या एका छायाचित्राने वादळ उठले. बिहारमध्ये या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणूक होतेय. राजकीय नफा-नुकसानीचा विचार करता लालूंनी हा निर्णय घेतल्याचे मानले जाते. कथित छायाचित्राने वादळ ३७ वर्षीय तेजप्रताप यादव हे नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात सापडतात. आताही एका महिलेबरोबर समाज माध्यमात त्यांचे छायाचित्र आल्याने हा वाद सुरू झाला. १२ वर्षांपासून संबंधात असल्याचे त्या मजकुरात नमूद केले. अर्थात तेजप्रताप यांनी हा मजकूर नंतर काढून टाकला. आपल्याला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान आहे, आपले समाज माध्यम खाते कुणीतरी हॅक केले, अशी कारणे त्यांनी दिली. मात्र विवाह झालेला असताना वेगळ्याच महिलेबरोबर असे छायाचित्र येण्याने वादाची ठिणगी पडली. तेजप्रताप हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या हिच्याशी २०१८ मध्ये विवाहबद्ध झाले. पुढे काही महिन्यांतच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. पाटणा कौटुंबिक न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. एका वृत्तसंकेतस्थळावरील बातमीनंतर जुलै २०२२ मध्ये तेजप्रताप यांनी छळवणुकीच्या चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी दिली होती. कुटुंबाला त्रास देण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
वादग्रस्त व्यक्तिमत्त्व
लालूप्रसादांचे पुत्र या नात्याने संधी मिळाली तरी राजकारणात त्यांना प्रभाव पाडता आला नाही. तेजप्रताप हे २०१५ ते १७ या काळात राज्यात आरोग्य मंत्री होते. मात्र ते प्रशासकीय कौशल्य दाखवू शकले नाहीत. याच वर्षी होळीच्या कार्यक्रमात त्यांनी सुरक्षा सेवेतील पोलिसाला नृत्य करायची सक्ती केली अन्यथा निलंबनाचा धाक दाखवल्याची चित्रफित प्रसारित झाली होती. पुढे संबंधित कर्मचाऱ्याला त्यांच्या सुरक्षा ताफ्यातून हटविण्यात आले. २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची खात्री नसल्याने वैशाली जिल्ह्यातील महुआा या त्यांचा जुना मतदारसंघ बदलून समस्तीपूरमधील हसनपूर येथून त्यांना विधानसभेला संधी देण्यात आली. ते निवडून आले, त्यात पक्षाचा व जातीय समीकरणांचा मोठा वाटा आहे. यापूर्वी त्यांनी अंतर्गत बंडाळीचा प्रयत्न केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तीन समर्थकांना संधी द्यावी म्हणून आग्रह धरला होता. पुढे तीन जणांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले होते. मात्र राज्यातील राजकीय स्थिती पाहता नंतर धाकटे बंधू तेजस्वी यांचे नेतृत्व मान्य करावे लागले. आताही पक्षात तेजस्वी हेच मुख्यमंत्रीपदाचे स्पष्ट दावेदार आहेत. त्यांच्या खालोखाल अब्दुल सिद्दीकी बारी हे ओळखले जातात. पक्षात तसेही तेजप्रताप यांचे महत्त्व कमी आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये तेजूभय्या अशी ओळख. कुटुंबापासून स्वतंत्रपणे सरकारी बंगल्यात स्वतंत्र ते राहतात. धार्मिक असलेल्या तेजप्रताप यांची बासरीसह छायाचित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जन्मावेळी रोजदार वारे असल्याने त्यांचे नाव तेजप्रताप ठेवण्यात आले. मोटारसायकल तसेच विमान चालविण्याची त्यांना आवड. वैमानिकाचा परवाना मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. धर्मनिरपेक्ष सेवक संघाची त्यांनी स्थापना केली होती. मात्र त्यात फारशी प्रगती झाली नाही.
कुटुंबाचा पाठिंबा
लालूप्रसाद यादव हे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात आहेत. त्यांच्या दृष्टीने पुत्राला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय आव्हानात्मक होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या प्रतिमेचा विचार करून ही कठोर घोषणा करावी लागली. अन्यथा विरोधकांचा याचा फायदा झाला असता. विवाह झाला असतानादेखील लालूपुत्राची अशी छायाचित्रे समाज माध्यमात येणे ही स्थानिकांच्या दृष्टीने धक्कादायक बाब आहे. लालूंच्या कुटंबीयांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. त्यांची थोरली कन्या मिसा भारती या खासदार असून, पाटलीपुत्र मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर दुसरी कन्या रोहिणी आचार्य यांनी पक्षाकडून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्या पराभूत झाल्या. समाज माध्यम संदेशाद्वारे त्यांनी तेजप्रतापबाबतच्या निर्णयाचे समर्थन केले. तेजस्वी यांनीही वडिलांना पाठिंबा दर्शवला.
विरोधकांना लाभ मिळण्याची चिंता
बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार आहे. गेली अडीच दशके कधी भाजप तर कधी राष्ट्रीय जनता दलाबरोबर राहून नितीशबाबूंनी आपले मुख्यमंत्रीपद शाबूत ठेवले. आता काही प्रमाणात सत्ताविरोधी नाराजीने राष्ट्रीय जनता दलाला (राजद) संधी खुणावतेय. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्यात झंझावाती दौरे केले. राजदच्या काळात जंगलराज होते ही प्रतिमा पुसून काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी तेजप्रताप यांचा मुद्दा हा विरोधकांना आयता मिळाला. निवडणुकीत त्याचा लाभ विरोधकांना होईल याची चिंता असल्याने लालूप्रसादांनी तातडीने त्यांना हटविले. कौटुंबिक व नैतिक मूल्ये महत्त्वाची असल्याचे लालूंनी समाज माध्यमावर स्पष्ट केले. मात्र विरोधकांनी यावर लालूंना अनेक प्रश्न विचारले आहेत. मुळात आता तेजप्रताप काय करणार, हा मुद्दा आहे. अशा संवेदनशील गोष्टींचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होतो. सध्याच्या समाज माध्यमाच्या युगात तर एखादी गोष्ट झपाट्याने पसरते. त्यामुळेच राष्ट्रीय जनता दल पर्यायाने लालूप्रसाद सावध झाले. बिहार विधानसभा निवडणुकीला पाच महिन्यांचा अवधी आहे. हा मुद्दा त्या पक्षाची पाठ सोडेल असे दिसत नाही.