Highway Hypnosis : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर विविध राजकीय नेत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तर काही जण अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. हा अपघात कसा झाला? त्यावेळी नेमकं काय घडलं? ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झाला का? गाडीत चालवताना त्याला झोप लागली होती का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

विनायक मेटे यांचा अपघात होण्यामागे ‘हायवे हिप्नोसिस’ हे कारणही सांगितले जात आहे. पण ‘हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नक्की काय? ते कशामुळे होतं? आणि ते टाळण्यासाठी काय करावे लागते? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. के.ई.एम रुग्णालयाचे माजी डीन अविनाश सुपे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते लोकसत्ता डॉट. कॉमशी बोलत होते.

हायवे हिप्नोसिस’ म्हणजे नेमकं काय?

‘हायवे हिप्नोसिस’ याला रोड हिप्नोसिस असेही ओळखले जाते. हिप्नोसिस या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे संमोहन. ‘हायवे हिप्नोसिस’ ही अशी एक शारीरिक स्थिती आहे ज्याची कल्पना बहुतांश चालकांना अजिबातच नसते. एखाद्या मोठ्या हायवेवर गाडी चालवताना चालकामध्ये किवा गाडीत बसलेल्या प्रवाशांना एका विशिष्ट प्रकारची मोनोटोनी येते. यामुळे लक्ष विचलित होते. यालाच ‘हायवे हिप्नोसिस’ असे म्हणतात. रस्त्यावर वाहन चालवताना साधारण २.५ तासांनी ‘हायवे हिप्नोसिस’ होऊ शकते.

यावेळी संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू मात्र क्रियाशील राहत नाही. तो डोळ्यांनी काय पाहतो हे त्याला समजत नाही. याचे परिणाम चालकावर स्पष्टपणे दिसतात. तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला अचानक गाडी धडकणे, मागून एखादी गाडी आपल्या गाडीला येऊन धडकणे असे प्रकार हायवेवर घडण्यामागचे मूळ कारण ‘हायवे हिप्नोसिस’ आहे. मुंबईत किंवा ट्राफिकच्या ठिकाणी गाडी चालवताना हे प्रकार सहसा आढळत नाहीत. कारण या ठिकाणी गाडी चालवताना तुमच्यासमोर अनेक अडथळे असतात. यामुळे आपण संमोहित होत नाही.

‘हायवे हिप्नोसिस’मध्ये नेमकं काय होतं?

जर तुम्ही हायवेवर गाडी चालवत आहात आणि तुमच्या डोळ्यांना तोच तोच पणा दिसत असेल तर तुम्हाला ‘हायवे हिप्नोसिस’ झालंय हे ओळखावे. यावेळी चालक हा वेगळ्या ट्रान्समध्ये जातो. मनात तुमच्या तेच तेच विचार येत असतात. बऱ्याच वेळा गाड्या काय वेगाने चालल्यात हे देखील समजत नाही. गाडीचा वेग किती वाढला, किती कमी झाला हे देखील कळत नाही. त्यामुळे हे अपघात होतात.

परदेशात ‘हायवे हिप्नोसिस’मुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. परदेशातील रस्त्यांना दोन्ही बाजूंनी विशिष्ट प्रकारचे बोर्ड लावलेले असतात. त्यामुळे चालक हा संमोहित होतो. यामुळे अनेकदा गाड्या एकमेकांवर आदळतात. भारतात याचे प्रमाण कमी असले तरी नाकारण्यायोग्य नक्कीच नाही. अनेकदा भारतातही ‘हायवे हिप्नोसिस’मुळे अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

‘हायवे हिप्नोसिस’ झालेल्या चालकाला गाडीचा अपघात होईपर्यंत किंवा ती गाडी आदळेपर्यंत शेवटच्या १५ मिनिटात काहीही आठवत नाही. गाडीचा चालक किती वेगाने गाडी चालवत आहे, तो काय करतोय याचे त्याला काहीही भान नसते. विशेष म्हणजे समोरच्या दिशेने एखादी गाडी येत असेल तर त्याचा अंदाजही त्याला लावता येत नाही. तसेच हायवेवरील गाड्यांचा वेग हा साधारण ८० ते १०० कि.मी असतो. त्यामुळे जर गाड्यांची टक्कर झाली तर प्रचंड नुकसान होते. प्रसंगी माणसाला जीवही गमवावा लागतो.

‘हायवे हिप्नोसिस’ टाळण्यासाठी काय करावे?

जर तुम्हाला ‘हायवे हिप्नोसिस’पासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर चालकाने दर दीड ते दोन तासांनी गाडी थांबवावी. यावेळी त्याने चहा-कॉफी घ्यावी, जेणेकरुन त्याची सुस्ती उडेल. तसेच शक्य असेल तर थोडी विश्रांती घ्यावी. गाडी रस्त्याच्या कडेला किंवा एका बाजूला उभी करुन १० मिनिटे चालावे. तसेच डोळ्यावर पाणी मारावे, जेणेकरुन डोळ्यावरील ताण कमी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच चालकाने पुरेशी झोप घेतली आहे की नाही याचीही खात्री करणे गरजेचे आहे. त्यासोबत ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने झोप घेण टाळलं पाहिजे. त्याच्यासोबत गप्पा मारायला हव्यात. छान गाणीही गाडीत लावायला हवी. तसेच गाडी चालवण्यापूर्वी सर्दी, खोकला याबद्दलची औषधे घेणे टाळावीत.