अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाने एकतर्फी विलीन केलेल्या युक्रेनच्या चारही प्रांतांमध्ये जोरदार चकमकी झडत आहेत. यात युक्रेनची सरशी होताना दिसत असली तरी झापोरीझ्झियामधील लढाईने चिंता वाढवली आहे. कारण युरोपमधील सर्वांत मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेशी खेळ सुरू असून चेर्नोबिलप्रमाणे मोठ्या आण्विक अपघाताचा धोका वाढला आहे.

झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाची सध्याची स्थिती काय?

युक्रेनच्या सीमांमध्ये सैन्य घुसवल्यानंतर हा प्रकल्प रशियाच्या ताब्यात गेला. तत्पूर्वी युक्रेनच्या अणुऊर्जा संस्थेने प्रकल्पातील सर्व संच बंद करण्याची खबरदारी घेतली होती. नंतर युक्रेनने मुसंडी मारली आणि हा प्रकल्प पुन्हा ताब्यात घेतला. सध्या प्रकल्पावर युक्रेनचा ताबा असला तरी त्याला आता रशियाच्या फौजांनी वेढा घातला आहे. प्रकल्पाच्या परिसरात होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे पाच दिवसांत दोन वेळा प्रकल्पाचा बाह्य वीजपुरवठा खंडित झाला. ही चिंतेची बाब आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कोणता धोका?

सध्या अणुऊर्जा प्रकल्पातील सर्व संच बंद असले तरी तेथील अणुइंधन तसेच आहे. ते हटवण्यात आलेले नाही. हे किरणोत्सारी इंधन सुरक्षित राहावे, यासाठी शीतकरणासह (कूलिंग) अन्य यंत्रणांना विजेची आवश्यकता आहे. क्षेपणास्त्रांमुळे दोन वेळा वीजपुरवठा खंडित झाला आणि प्रकल्पात असलेल्या डिझेल जनरेटरवर ही सुरक्षा हस्तांतरित झाली. मात्र डिझेलचा साठा मर्यादित असल्यामुळे समस्या अधिक बिकट बनली आहे.

विश्लेषण : तापमान वाढीमुळे कोणत्या पाच देशांचे भविष्य अंधःकारमय? उर्वरित जगासाठी कोणता इशारा?

दुसरे ‘चेर्नोबिल’ होण्याची भीती आहे का?

अणुप्रकल्पातील इंधन पुरेसे सुरक्षित ठेवले गेले नाही, तर त्यातून किरणोत्सार होण्याचा धोका संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) दाखवून दिला. प्रकल्पाच्या परिसराचे तातडीने निर्लष्करीकरण करण्यात यावे आणि सुरक्षेशी कोणतीही तडजोड होऊ नये, असे दोन्ही देशांना खडसावले. मात्र त्याकडे दोन्ही देश, प्रामुख्याने रशिया काणाडोळा करत असल्यामुळे अनेकांच्या चेर्नोबिलच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

चेर्नोबिलमध्ये काय घडले होते?

२६ एप्रिल १९८६ रोजी उत्तर युक्रेनमधील (तेव्हा हा भाग सोव्हिएत महासंघात होता) चेर्नोबिल अणुभट्टीमधून किरणोत्सर्ग सुरू झाला. आतापर्यंत सर्वोच्च सातव्या स्तरावरील केवळ दोन आण्विक अपघात झाले आहेत. यातला एक चेर्नोबिल आहे आणि दुसरा २०११ साली जपानमध्ये झालेला फुकुशिमाचा अपघात आहे. चेर्नोबिलमध्ये अपघातामुळे मृत्यू केवळ १०० असले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम परिसरातील नागरिकांना अनेक पिढ्या भोगावे लागले. आता पुन्हा झापोरीझ्झियामध्ये तशीच स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

आण्विक अपघाताबरोबरच घातपाताचीही भीती?

आयएईएला भीती आहे, तसे काही घडलेच तर त्यात दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता म्हणजे वीजपुरवठा खंडित होण्यासारख्या घटनांमुळे होणारा किरणोत्सर्ग. मात्र रशियाच्या क्षेपणास्त्रांमुळे थेट प्रकल्पाचेच नुकसान झाले, तर तो अपघात नसून घातपात ठरेल. युक्रेनवर थेट अण्वस्त्र डागून महायुद्ध छेडण्यापेक्षा असे काही करून युक्रेनसह युरोपचे नुकसान करण्याची योजना पुतिन आखू शकतात. मात्र त्यामुळे झापोरीझ्झिया परिसराचे कधीही न भरून येणारे नुकसान होण्याची भीती आहे.

विश्लेषण : नैराश्याशी दीपिकानं दिलेला लढा चर्चेत; पण बॉलिवूडमध्ये अशा गोष्टी वाढतायत का? नेमकं काय घडतंय चंदेरी दुनियेत?

पुतिन यांची अण्वस्त्र वापराची धमकी किती खरी?

क्रिमिया पुलावरील स्फोटाचा बदला म्हणून गेल्या चार दिवसांपासून युक्रेनच्या शहरांवर रशियाची क्षेपणास्त्रे अक्षरश: आग ओकत आहेत. आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी (विलिनीकरण केलेल्या प्रांतांसह) टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी पुतिन यांनी दिली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आधी ही धमकी गांभीर्याने घ्यावी असे सांगितले, तर दुसऱ्या दिवशी ‘पुतिन अणुयुद्ध छेडतील असे वाटत नाही,’ असे ते म्हणाले. पुतिन यांच्याबाबत अमेरिका संभ्रमात असली, तरी युरोप मात्र इतका बेसावध नाही.

अणुयुद्धाच्या शक्यतेवर युरोप, नाटोची तयारी काय?

पुतिन यांची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी युरोपने अधिक गांभीर्याने घेतली आहे. ‘नाटो’ संघटनेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत रशियाला सज्जड शब्दांत इशारा देण्यात आला. पुतिन यांनी युक्रेनवर अण्वस्त्र डागले तर त्याला अशा पद्धतीने उत्तर दिले जाईल, की रशियाचे संपूर्ण सैन्य नेस्तनाबूत होईल असा इशारा नाटोने दिला. पुढल्या आठवड्यात नाटो आणि रशिया हे दोघेही आपला अणुयुद्धाभ्यास करणार आहेत. त्यामुळे तणावात भर पडणार आहे.

रशियाच्या भात्यामध्ये नेमकी किती अण्वस्त्रे?

रशियाकडे किती अण्वस्त्रे आहेत, याचा नेमका आकडा पाश्चिमात्य देशांकडेही नाही. मात्र अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार पुतिन यांच्या ताब्यात ५,९७७ अण्वस्त्रे आहेत. यापैकी सुमारे १,५०० अण्वस्त्रे बाद करण्यात आली असली तरी अद्याप ४,५००च्या आसपास अण्वस्त्रे वापरास उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यात लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर चढवलेली अण्वस्त्रेही आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia ukraine war nuclear radiation war possibility accident print exp pmw
First published on: 15-10-2022 at 07:56 IST