आहारात मीठ किती असावे, त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. जेवणातील मीठ हे त्याच्या चवीसाठी आवश्यक असले तरी त्याचे अतिसेवन धोकादायक ठरते. मिठाचा वापर कमी करून उच्च रक्तदाब आणि हृदयविकार टाळता येतो. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या आहारात दररोज सुमारे ५ ग्रॅम मीठ असावे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा निकष आहे. लहान मुलांसाठी हे प्रमाण दररोज २ ग्रॅम आहे. त्यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम गंभीर असून, ते कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकताच मीठ जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. प्रत्येक देशाने आपापल्या पातळीवर मिठाचा वापर करण्यासाठी प्रयत्न करावा, हा यामागील उद्देश आहे. त्यातून त्या देशांतील नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होणारा धोका कमी करता येणार आहे.

जास्त मीठ येते कुठून?

व्यक्तिगत पातळीवर आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित करणे ही अतिशय अवघड बाब आहे. कारण आपल्या आहारातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त मीठ हे प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून येते. त्यामुळे प्रत्येक देशाने यासाठी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करायला हवी. आहारातील जास्त मिठाचे स्रोत आधी निश्चित करावे लागतील. ते निश्चित झाल्यानंतर त्यातील मिठाचे प्रमाण कमी अथवा नियंत्रित करण्यासाठी धोरण आखावे लागेल. या धोरणाची अंमलबजावणी संबंधित उद्योगांकडून करून घेण्याची जबाबदारी संबंधित सरकावर असेल. यात सरकार यशस्वी झाल्यास नागरिकांच्या आहारातील मीठ कमी होऊ शकेल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

पोर्तुगालचे यशस्वी उदाहरण?

नागरिकांच्या आहारातील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोर्तुगाल अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. पोर्तुगालमधील नागरिकांच्या आहारात ब्रेड हा मुख्य घटक असल्याने त्यांनी ब्रेडमधील मिठाचे प्रमाण कमी करण्याचे पाऊल उचलले. देशात ब्रेडसाठी मिठाचे ठरावीक प्रमाण पोर्तुगालने २००९ मध्ये ठरविले. त्याचे पालन करण्याचा ऐच्छिक नियम ब्रेड उत्पादकांना लागू करण्यात आला. सुरुवातीला १०० ग्रॅम ब्रेडसाठी १.४ ग्रॅम हे मिठाचे प्रमाण निश्चित करण्यात आले. नंतर हे प्रमाण १०० ग्रॅम ब्रेडसाठी १ ग्रॅमवर आणण्यात आले. याचबरोबर मिठाचे प्रमाण जास्त असलेल्या खाद्यपदार्थांसाठीही अशाच प्रकारचे प्रमाण निश्चित करण्यात आले. यासाठी आधी त्या क्षेत्रातील कंपन्यांना विश्वासात घेण्यात आल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.

अडथळे कोणते?

तुमच्या आहारात मीठ किती आहे, ते तुम्ही मोजू शकत नाही. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन शक्य होत नाही. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी खाद्यपदार्थ उत्पादकांवर सक्ती करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, ही बाब अवघड आहे. कारण खाद्यपदार्थ उत्पादक सरकारच्या या पावलाला कितपत प्रतिसाद देतील, याबाबत साशंकता आहे. राजकीय पातळीवरूनच विरोध झाल्यास धोरणात्मक अंमलबजावणीत अडथळे येतात. पोर्तुगालच्या संसदेत मिठावर कर लावण्याचे विधेयक २०१६ मध्ये संमत झाले नव्हते. त्याऐवजी कंपन्यांना ऐच्छिक पातळीवर हे लागू करावे, अशी भूमिका घेण्यात आली.

नेमका परिणाम काय?

कमी मीठ खाल्ल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयविकार या दोन्हीचा धोका कमी होतो. दररोज प्रत्येक व्यक्तीच्या आहारात ५ ग्रॅम मीठ असावे, हा निकष असला तरी अनेक देशांमध्ये हे प्रमाण यापेक्षा खूप जास्त आहे. जास्त मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि इतर जीवघेणे आजार होऊ शकतात. जगातील अल्प व मध्यम उत्पन्न देशांनी आहारातील मीठ १५ टक्के कमी केल्यास १० वर्षांत ८५ लाख अकाली मृत्यू रोखता येतील. युरोपमधील प्रत्येक देशाने सार्वजनिक आरोग्य धोरणाच्या माध्यमातून आहारातील २५ टक्के मीठ कमी केल्यास २०३० पर्यंत असंसर्गजन्य आजारांमुळे होणारे ९ लाख मृत्यू टाळता येतील, असा अंदाज आहे. युरोपमध्ये दरवर्षी असंसर्गजन्य आजारांमुळे ४० लाख मृत्यू होतात. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.

काय करता येईल?

सार्वजनिक ठिकाणी मिठाचा वापर कमी करण्याचे पाऊल महत्त्वाचे ठरू शकते. शाळा, रुग्णालये आणि कारागृहे यासारख्या ठिकाणी सरकार आहारातील मिठाचे प्रमाण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करू शकते. याचबरोबर या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या परिणामांचे मूल्यमापन करता येईल. यातील चांगले परिणाम जनतेसमोर मांडून आहारातील मिठाचे प्रमाण कमी करण्याबाबत धोरणात्मक पावले उचलता येऊ शकतात, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sanjay.jadhav@expressindia.com