दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जागतिक स्तरावरील अव्वल शास्त्रज्ञांना आकर्षित केले. विज्ञानविषयक उदासीनतेचा अभाव आणि संशोधनासाठी अनुकूल धाेरणे व वातावरण यांमुळे अनेक देशांतील वैज्ञानिक, संशोधकांनी मायभूमी सोडून अमेरिकेला पसंती दिली. मात्र ट्रम्प प्रशासनाची चुकीची धोरणे आणि चीनच्या वाढत्या संशोधन क्षमतेमुळे अनेक शास्त्रज्ञ चीनकडे आकर्षित होत आहेत. शास्त्रज्ञ अमेरिकेतून चीनमध्ये स्थलांतर का करत आहेत, याविषयी…
विज्ञान क्षेत्रात चीनची अमेरिकेशी स्पर्धा?
अमेरिकेशी असलेल्या वैज्ञानिक प्रतिभेच्या स्पर्धेत चीन आधीच विजय मिळवत होता. जगातील काही सर्वोत्तम संशोधकांना आपल्या देशामध्ये आणण्यात गेल्या काही वर्षांत चीनने बरेच प्रयत्न केले आहेत. नोबेल पारितोषिकांनी सन्मानित शास्त्रज्ञ, मॅकआर्थर अनुदानप्राप्त प्रतिभावान व्यक्ती, काही महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित सर्जनशील व्यक्तींसाठी चीनने पायघड्या घातल्या आहेत. मात्र तरीही बहुतेक संशोधक, शास्त्रांना अमेरिकेचेच आकर्षण होते. पण ट्रम्प प्रशासनाची धोरणे चीनच्या वैज्ञानिक आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना बळकटी देत आहेत.
ट्रम्प धोरणांचा वैज्ञानिक प्रतिभेला धोका?
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञानात जागतिक नेता म्हणून आपली प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यास मदत करणाऱ्या संशोधन निधीत कपात करत आहे. ट्रम्प देशातील प्रमुख विद्यापीठांवरही हल्ला करत आहेत आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. कमी निधी, कठोर स्थलांतर नियम आणि वाढता राजकीय दबाव यांमुळे संशोधकांना अमेरिकेत काम करणे कठीण झाले आहे. निधी कपात आणि युरोपीय महासंघामधील देशांमध्ये वाढत्या संधी यांमुळे अमेरिकेतून अनेक संशोधक, तज्ज्ञ देशांतर करत आहेत. ट्रम्प प्रशासनाने नुकताच हार्वर्ड विद्यापीठाचा निधी रोखल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्यापीठातील अनेक शास्त्रज्ञांनी त्यांचे संशोधन प्रकल्प थांबवले आहेत.
शास्त्रज्ञ, वैज्ञानिकांचे स्थलांतर आणि परिणाम…
यंदाच्या वर्षात मार्चमध्ये ‘नेचर जर्नल’ने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की अमेरिकेतील तीन-चतुर्थांश संशोधक देश सोडण्याचा विचार करत आहेत. या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की परदेशात नोकरीसाठी अर्जांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये चीन आणि युरोप प्रमुख ठिकाणे म्हणून उदयास येत आहेत. युरोपीय महासंघाने संशोधकांना आकर्षित करण्यासाठी ५००० लाख पौंड देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे वैज्ञानिक प्रतिभेसाठी जागतिक स्पर्धा अधोरेखित झाली आहे. निरीक्षकांनी इशारा दिला आहे की हवामान आणि पर्यावरणीय संशोधनासारख्या क्षेत्रात अमेरिकेने निधी कपात करण्याचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांचे जागतिक नेतृत्व कमकुवत होऊ शकते.
अमेरिकेत ‘चायना इनिशिएटिव्ह’
२०२४ च्या सुरुवातीला स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासात २०१० पासून अमेरिका सोडून जाणाऱ्या चिनी वंशाच्या शास्त्रज्ञांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले. २०१८ मध्ये ‘चायना इनिशिएटिव्ह’ सुरू झाल्यानंतर हा ट्रेंड वाढला, असे अभ्यासात नमूद केले आहे. हा कार्यक्रम अमेरिकेच्या न्याय विभागाने ‘आर्थिक हेरगिरी’ (व्यापार गुपिते, बौद्धिक संपदा आणि गोपनीय व्यावसायिक माहितीची चोरी) रोखण्यासाठी चालवला होता. या उपक्रमाअंतर्गत बहुतेक प्रकरणे पुराव्याअभावी वगळण्यात आली असली तरी, या चौकशीने एक भयानक परिणाम निर्माण केला, अनेक संशोधकांना तपास, कारकीर्दीतील अडचणी आणि आर्थिक ताणतणावाचा सामना करावा लागला. या अहवालानुसार चिनी वंशाच्या शास्त्रज्ञांनी अमेरिका सोडण्यात ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संशोधकांनी असेही नमूद केले की विज्ञानातील चीनची गुंतवणूक आणि आकर्षक भरपाई पॅकेजेस यांमुळे संशोधकांना चीनचे आकर्षण वाढले आहे.
sandeep.nalawade@expressindia.com