पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून जे विदेशी ETF मध्ये म्हणजेच एक्सचेंज ट्रेडेड फंडात पैसे गुंतवतात, त्यात त्यांना आता गुंतवणूक करता येणार नाही. बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने म्युच्युअल फंडांना नवीन गुंतवणूक करण्यास बंदी घातली आहे. विदेशी ETF मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा १ अब्ज डॉलर्स (सुमारे ८,३३२ कोटी) निश्चित केली आहे. त्यामुळेच सेबीने हा आदेश दिला आहे. सेबीने देशातील म्युच्युअल फंड घराण्यांचे प्रमुख असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) या संस्थेलाही पत्र लिहिले आहे.

SEBI ने म्युच्युअल फंड घराण्यांनाच का निर्देश दिले?

भांडवली बाजार नियामक सेबीनं मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (AMCs) त्यांच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये ओव्हरसीज एक्स्चेंज ट्रेडेड फंडा (ETFs) द्वारे गुंतवणूक स्वीकारू नये, असे सांगितले आहे. कारण या गुंतवणुकीसाठी १ बिलियन डॉलरची मर्यादा ओलांडण्याच्या जवळ आहे. म्युच्युअल फंड उद्योग आधीच १ अब्ज डॉलर मर्यादेच्या ९५ टक्क्यां (९५० दशलक्ष डॉलर) पर्यंत पोहोचला आहे. सेबीने म्युच्युअल फंडांना परदेशी ईटीएफमध्ये पैसे स्वीकारणे तात्पुरते थांबवण्यास सांगितले आहे,” असे म्युच्युअल फंड हाऊसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बाजार नियामकाने १ एप्रिलपासून अशा योजनांमधील नवा पैसा रोखला आहे.

हेही वाचाः विश्लेषण : HbA1c चाचणी मधुमेह निदानासाठी महत्त्वाची का आहे? ती कुणी आणि किती सातत्याने करावी?

परदेशातील ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडांची एकूण मर्यादा किती?

खरं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने परदेशातील शेअर किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फंड हाऊसना ७ अब्ज डॉलरची एकूण मर्यादा निश्चित केली आहे. विशेष म्हणजे म्युच्युअल फंड घराण्यातील विदेशी एक्सचेंज ट्रेडेड फंडांमध्ये १ बिलियन डॉलरपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे. म्युच्युअल फंड उद्योगही RBI कडे विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ७ अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याची मागणी करीत आहे. यंदा जानेवारीमध्ये RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना म्युच्युअल फंडांद्वारे परदेशातील गुंतवणुकीच्या मर्यादेवर पुनर्विचार करण्याच्या योजनांबद्दल विचारण्यात आले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर राहिल्यास यावर निर्णय घेतला जाऊ शकतो, असंही शक्तिकांत दास म्हणाले होते. “म्युच्युअल फंड उद्योग नेहमीच अशी विनंती आमच्याकडे करीत आहे. आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ. डॉलरच्या तुलनेत स्थिर असणे आवश्यक आहे,” असेही शक्तिकांत दास यांनी अधोरेखित केले होते.

हेही वाचाः विश्लेषण : कंगना रणौतला लोकसभा उमेदवारी देण्यामागे भाजपाची भूमिका काय?

आता नवे पर्याय काय?

भारतीय गुंतवणूकदार आयसीआयसीआय डायरेक्ट, एचडीएफसी सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज, कोटक सिक्युरिटीज आणि ॲक्सिस सिक्युरिटीज यांसारख्या पारंपरिक भारतीय ब्रोकरेजद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापार खाती देखील उघडू शकतात. इंटरएक्टिव्ह ब्रोकर्स, चार्ल्स श्वाब, अमेरिट्रेड, स्टॉकल यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेजचा वापर परदेशी ट्रेडिंग खाती उघडण्यासाठी आणि थेट व्यापार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे काय?

एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ETF) ही एक प्रकारची एकत्रित गुंतवणूक सुरक्षा आहे, जी वैयक्तिक समभागांप्रमाणे खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते. ईटीएफ आणि म्युच्युअल फंडांमध्येही मुख्य फरक आहे. म्युच्युअल फंड ही एक एकत्रित गुंतवणूक असली तरी बाजार बंद झाल्यानंतर दिवसातून एकदाच त्याचा व्यवहार करता येतो. दुसरीकडे वैयक्तिक कमोडिटीच्या किमतीपासून ते सिक्युरिटीज सारख्या कोणत्याही गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी ETF ची रचना केली जाते. विशिष्ट गुंतवणूक धोरणांचा मागोवा घेण्यासाठी ETF देखील उघडले जाऊ शकते. एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) ही सिक्युरिटीजचा एक भाग आहे, जो शेअर्सप्रमाणेच बाजारात व्यापार करतो. ETF शेअर्सच्या किमतीत दिवसभर चढ-उतार होतात, कारण ETF ची खरेदी आणि विक्री सुरूच असते; हे म्युच्युअल फंडांपेक्षा वेगळे आहे. ETF मध्ये शेअर, कमोडिटी किंवा रोख्यांसह सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचा समावेश असू शकतो; यात जास्त करून आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करतात, वैयक्तिकरीत्या शेअर खरेदी करण्यापेक्षा ईटीएफच्या माध्यमातून खरेदी केलेले शेअर्स कमी खर्चाचे असतात आणि ब्रोकरचे कमिशनही नगण्य असते. ज्यामुळे ते वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहेत. इतर म्युच्युअल फंड योजनांच्या तुलनेत ईटीएफमध्ये कमी कर आकारला जातो. ईटीएफचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत, त्यात इक्विटी ईटीएफ, बॉन्ड्स ईटीएफ, कमोडिटी ईटीएफ, इंटरनॅशनल ईटीएफ आणि सेक्टोरल/थीमॅटिक ईटीएफ यांचा समावेश आहे.