Secret Affairs At Workspace India सध्याच्या काळात ऑफिस अफेअर हा एक सामान्य ट्रेंड होत चालला आहे. याच संदर्भात एका जागतिक सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या सर्वेक्षणातून समोर आले आहे की, ऑफिस अफेअर्समध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘ॲशले मॅडिसन’ आणि ‘यूगव्ह’ या संस्थांनी संयुक्तपणे हा सर्व्हे केला आहे. त्यानुसार, दर दहापैकी चार भारतीयांनी कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्याला डेट केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमेरिका, यूके, कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीसह ११ देशांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यात १३,५८१ प्रौढांचा समावेश होता. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कार्यालयीन प्रेमसंबंधांची कबुली देणाऱ्या लोकांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. परंतु, भारतात ‘ऑफिस अफेअर’चा ट्रेंड का वाढतो आहे? याच्या कारणांविषयी आणि परिणामांविषयी तज्ज्ञ काय सांगतात? जाणून घेऊयात…
जागतिक क्रमवारी आणि भारताचे स्थान
सर्वेक्षणाच्या या यादीत मेक्सिको देश आघाडीवर आहे, जिथे ४३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सहकाऱ्याबरोबर संबंध ठेवल्याचे सांगितले, तर भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील ४० टक्के प्रतिसादकर्त्यांनी सहकाऱ्याबरोबर संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे. या तुलनेत अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडासारख्या देशांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी, म्हणजेच सुमारे ३० टक्के आहे. या निष्कर्षांवरून हे स्पष्ट होते की, व्यावसायिक मर्यादांविषयी वाढती जागरूकता असूनही, कार्यालयीन संबंध आजही भारतातील आधुनिक कार्यालयीन संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहेत.
या अभ्यासातून स्त्री-पुरुषांमधील संबंधांच्या गतिमानतेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. हे प्रमाण पुरुषांमध्ये (५१ टक्के) आणि महिलांमध्ये (३६%) असल्याचे आढळून आले आहे. संभाव्य परिणामांच्या चिंतेबद्दल बोलायचं झाल्यास, २९ टक्के महिलांनी व्यावसायिक परिणामांना घाबरून कार्यालयीन संबंध टाळले, तर २७ टक्के पुरुषांनी अशी चिंता व्यक्त केली. विशेष म्हणजे, पुरुषांना वैयक्तिक परिणामांबद्दल जास्त काळजी वाटते असे या सर्वेक्षणातून दिसून आले. १८ ते २४ वयोगटातील तरुण कर्मचारी याबाबत सर्वात जास्त सावध असल्याचे दिसून आले. अशा संबंधांमुळे त्यांच्या करिअरवर कसा परिणाम होईल, याची चिंता ३४ टक्के तरुणांनी व्यक्त केली. हे जनरेशन झेड कर्मचाऱ्यांमध्ये वाढणारी व्यावसायिकता आणि मर्यादांची जागरूकता दर्शवते.
तज्ज्ञ वाढत्या प्रमाणाविषयी आणि त्याच्या परिणामांविषयी काय सांगतात?
विवाहित लोकांसाठी असलेल्या ‘ग्लीडन’ या डेटिंग ॲपने केलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणानुसार, ३५ टक्के भारतीय सध्या ‘ओपन रिलेशनशिप्स’मध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीदाराने परवानगी दिल्यास ४१ टक्के लोक तसा विचार करण्यास तयार आहेत. विशेष म्हणजे, ही प्रवृत्ती फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाहीये. तामिळनाडूतील कांचीपुरमसारख्या शहरांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये सर्वाधिक रस असल्याचे नोंदवले गेले आहे. या निष्कर्षांवरून हे दिसून येते की, भारताची विकसित होत असलेली नातेसंबंधांची संस्कृती वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामधील रेषा पुसट करत आहे. विवाहबाह्य कार्यालयीन प्रेमसंबंधांमध्ये कोलकाता आणि मुंबई आघाडीवर असून येथील ३५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.
या सर्वेक्षणाच्या निर्मात्यांनी विवाहबाह्य कार्यालयीन प्रेमसंबंधांचे मुख्य कारण म्हणून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागणारे कामाचे तास आणि उच्च ताण असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विवाहाच्या मर्यादेबाहेर पाऊल टाकणे या तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी एक सोपा मार्ग प्रदान करते, असा लोकांचा समज आहे. समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सोहिनी रोहरा नमूद करतात की, त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक कॉर्पोरेट कर्मचारी दुर्लक्षित असल्याची किंवा भावनिकरित्या एकटेपणाची भावना व्यक्त करतात, विशेषत: जेव्हा त्यांचा जोडीदार वारंवार दूर असतो किंवा सतत कामात व्यस्त असतो.
त्या स्पष्ट करतात, “जेव्हा एक जोडीदार खूप नियंत्रण ठेवणारा किंवा जास्त अवलंबून असतो, तेव्हा दुसऱ्याला अडकल्यासारखे वाटू शकते आणि तो स्वातंत्र्यासाठी धडपडतो, त्यामुळे नातेसंबंधातील चित्र बदलते. याव्यतिरिक्त, जेव्हा शारीरिक जवळीक कमी होते किंवा जोडीदार समाधानकारक नसतो, तेव्हा या भावनिक अंतराकडे दुर्लक्ष करणे अधिक कठीण होते, ज्यामुळे काही लोक बाहेर पर्याय शोधू लागतात.” मुंबईसारख्या प्रमुख महानगरांमध्ये ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते.
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ नम्रता जैन याबाबत इशारा देतात. त्या म्हणतात, “माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिले आहे की विवाहबाह्य संबंध फार काळ टिकत नाहीत आणि जर ते टिकले तरी ज्या जोडीदाराने मार्ग बदलला आहे तो शेवटी दुःखी होतो. एकदा तो सुरुवातीचा उत्साह संपला की नातेसंबंध टिकवून ठेवणे कठीण होते आणि ते अनेकदा तुटतात. लोक शेवटी हे ओळखतात की ते त्यांच्या वैवाहिक संबंधातून ज्या भावनिक पद्धतींमधून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करत होते, त्याच पद्धती या विवाहबाह्य संबंधातही आहेत.” अशा संबंधांचा दुष्परिणाम लोकांच्या व्यावसायिक क्षेत्रावर होतो. त्या पुढे सांगतात, “मी क्लायंट्सना त्यांचा उत्साह, त्यांचा उद्देशाची भावना आणि त्यांच्या कामाची आवड गमावताना पाहिले आहे. जेव्हा तुमचे वैयक्तिक जीवन अस्थिर वाटते, तेव्हा बाकी सर्व काही अस्थिर वाटू लागते,” असे त्यांनी सांगितले.
