Wireless headphones security हेडफोन्सचा, इअरफोन्सच्या वापराचे प्रमाण वाढले आहे. प्रवासात असताना, रिकाम्या वेळी, फोनवर बोलताना जवळजवळ प्रत्येक जण हेडफोन्सचा वापर करतात. परंतु, अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी याविषयी गंभीर इशारा दिला आहे. २०२४ च्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पहिल्यांदा ‘द लेट शो विथ स्टीफन कोलबर्ट’ (The Late Show with Stephen Colbert) या टीव्ही शोला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी वायरलेस हेडफोन्सच्या वापराबाबत इशारा दिला.
डेमोक्रॅटिकच्या नेत्या असलेल्या हॅरिस यांनी सांगितले की, त्या फक्त वायर्ड इअरफोन्सचा वापर कॉल्स घेण्यासाठी करतात. त्यांनी वायरलेस तंत्रज्ञान टाळण्याचे कारणही सांगितले. गेल्या महिन्यात भारताच्या सायबर सुरक्षा एजन्सी ‘कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ‘(CERT-In)नेदेखील ब्ल्यूटूथ ऑडिओ डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी गंभीर असल्याचा इशारा जारी केला होता. एजन्सीने या उपकरणांमध्ये अनेक सुरक्षा त्रुटी असल्याचे सांगितले. वायरलेस हेडफोन्सचा वापर धोकादायक का आहे? याचा वापर बंद करावा का? अमेरिकेच्या माजी उपराष्ट्रपती व तज्ज्ञ याविषयी काय सांगतात? जाणून घेऊयात…
अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्षांनी वायरलेस हेडफोन्सच्या वापराबाबत कोणता इशारा दिला?
- अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी एका टीव्ही शोला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांच्या 107 Days या नवीन पुस्तकातील काही अप्रकाशित फोटो त्यांना दाखवण्यात आले.
- एका फोटोबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हा जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली, तेव्हा त्यांना मित्र आणि हितचिंतकांकडून शेकडो कॉल्स आले. त्या म्हणाल्या की, त्या कॉल्स घेण्यासाठी फक्त वायर्ड इअरफोन्स वापरत होत्या.
- त्या वायरलेस तंत्रज्ञान का टाळतात हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

त्या म्हणाल्या, “मी सिनेट इंटेलिजन्स कमिटीमध्ये काम केले आहे. मी विशेष बैठकांमध्ये सहभागी झाले आहे. तुम्ही ट्रेनमध्ये इअरपॉड्स वापरत असल्यास कोणी तुमचे संभाषण ऐकू शकत नाही, असे समजू नका. माझ्या मते, वायर्ड इअरफोन्स थोडे अधिक सुरक्षित आहेत,” असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जेव्हा जो बायडेन यांचा विजय झाला, तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हॅरिस यांनी त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांच्या एका हातात वायर्ड हेडफोन्स असल्याचे दिसले होते. २०२१ मध्ये ‘पॉलिटिको’ने हॅरिस यांच्या हेडफोन्सच्या निवडीबद्दलचे वृत्तही दिले होते. त्यांच्या एका माजी प्रचार अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, त्यांना हेडफोन्स हा एक सुरक्षा धोका आहे, असे नेहमीच वाटते आणि त्यामुळे त्या वायर्ड हेडफोन्सचा वापर करतात.
ब्ल्यूटूथ हेडफोन्समध्ये समस्या काय?
सिक्युरिटी आर्किटेक्ट व सर्टिफाईड हॅकर मारिल वर्नॉन यांनी ‘हफपोस्ट’ला सांगितले की, ब्ल्यूटूथ ठरावीक मर्यादेत हवेच्या मदतीने डेटा पाठवू शकते. त्यामुळे त्यांच्या वापराने सुरक्षेचा धोका निर्माण होतो. त्या म्हणाल्या की, वायर्ड हेडफोन्स वापरण्याचा हॅरिस यांचा निर्णय हुशारीचा आहे. सल्लागार फर्म ‘सिक्योर आयडियाज’चे कार्यकारी अधिकारी केविन जॉन्सन यांनी ‘हफपोस्ट’ला सांगितले की, जर हॅरिस यांनी ब्ल्यूटूथ हेडफोन्स वापरले असते, तर हॅक झालेल्या कनेक्शनद्वारे कोणीतरी त्यांचे कॉल ऐकण्याची शक्यता अधिक होती. सुरक्षा विश्लेषक व ईआरएनडब्ल्यू येथील संशोधक डेनिस हेन्झे यांच्यासह सुरक्षा संशोधकांनी नुकत्याच जारी केलेल्या एका इशाऱ्यात ब्ल्यूटूथशी संबंधित अनेक सुरक्षा त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
डेनिस हेन्झे यांनी फोर्ब्सला सांगितले की, अनेक प्रकरणांमध्ये हल्लेखोरांना ब्ल्यूटूथद्वारे हेडफोन्सवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. ते डिव्हाइसच्या रॅम आणि फ्लॅश मेमरीमधील डेटादेखील अॅक्सेस करू शकतात आणि त्यात बदल करू शकतात. तसेच हेडफोन्सशी जोडलेल्या फोनसारख्या इतर डिव्हाइसलाही हॅक करू शकतात.
‘कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ काय इशारा दिला?
भारताच्या सायबर सुरक्षा एजन्सी ‘कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ने जुलैमध्ये ब्ल्यूटूथ ऑडिओ डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी एक गंभीर इशारा जारी केला. एजन्सीने सांगितले की, एरोहा ब्ल्यूटूथ फर्मवेअरमध्ये अनेक सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे हल्लेखोर Sony WH-1000XM5, JBL Live Buds 3, Bose QuietComfort Earbuds आणि Marshall Motif II सारख्या डिव्हायसेसवर नियंत्रण मिळवू शकतात किंवा त्यांना हॅक करू शकतात. त्यांनी इशाऱ्यात सांगितले, “हल्लेखोर मोबाईल डिव्हाइस आणि ऑडिओ ब्ल्यूटूथ डिव्हाइसमध्ये कनेक्शन स्थापित करून आणि ब्लूटूथ हँड्स-फ्री प्रोफाइल (HFP)द्वारे कमांड देऊन या त्रुटींचा फायदा घेऊ शकतो.” एजन्सीने असाही इशारा दिला की, हल्लेखोर ऑडिओ संवादावर लक्ष ठेवू शकतात किंवा त्यात हस्तक्षेप करू शकतात.
तुम्ही वायरलेस हेडफोन्सचा वापर बंद करावा का?
बहुतेक वापरकर्त्यांसाठी याचा धोका कमी आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, जोवर तुम्ही पत्रकार, अधिकारी, नेते किंवा संवेदनशील क्षेत्रात काम करीत नसाल, तोवळ काळजी करण्याचे फारसे कारण नाही. सामान्यतः हाच गट हल्लेखोरांचे लक्ष्य असतो. हेन्झे यांनी सल्ला दिला की, जेव्हा एखादे अपडेट येईल तेव्हा प्रत्येकाने आपले फर्मवेअर लगेच अपडेट करावे. डेनिस हेन्झे यांनी सांगितले, “कृपया तुम्ही हेडफोन्स आणि तुमच्या मोबाईल फोनमधील पेअरिंगदेखील काढून टाका.” मुख्य म्हणजे बहुतेक वापरकर्ते काही सोप्या गोष्टी करून आपले वायरलेस हेडफोन्स सुरक्षितपणे वापरू शकतात. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी ‘हफपोस्ट’ला सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी ब्ल्यूटूथ वापरताना सुरक्षित राहण्यासाठी ते पुढील बाबी पाळतात :
- ब्लूटूथ नेहमी चालू ठेवू नका.
- नियमितपणे तपासा की कोणती डिव्हायसेस जोडलेली (paired) आहेत.
- ब्लूटूथचे नवीन वर्जन वापरा आणि अपडेट्स इन्स्टॉल करा.
- डिव्हाइसचे नाव बदलत राहा.