Tien Kung 4 missile आज जगातील प्रत्येक देश आपली क्षेपणास्त्र क्षमता वाढवत असल्याचे चित्र आहे. आता तैवाननेदेखील टिएन किंग ४ क्षेपणास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे ‘रिपब्लिक ऑफ चायना (ROC)’ म्हणून ओळखले जाणारे स्व-शासित बेट आहे. तैवान २०२६ पासून या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या (surface-to-air) क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू करणार आहे. तैवानला ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’कडून (People’s Republic of China) म्हणजेच चीनकडून आक्रमणाची भीती आहे. चीनने तैवानला तशी धमकीही दिली आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र विकसित झाल्यास कुठे ना कुठे चीनची चिंता वाढणार, हे नक्की. काय आहे टिएन किंग ४ क्षेपणास्त्र? या क्षेपणास्त्राची ताकद किती? या क्षेपणास्त्राचा चीनवर काय परिणाम होणार? जाणून घेऊयात.
टिएन किंग ४ चे उत्पादन वाढवणार
- टिएन किंग ४ क्षेपणास्त्र प्रणाली तैवानच्या ‘चुंगशान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ने विकसित केली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली टिएन किंग ३ प्रणालीची सुधारित आवृत्ती आहे.
- त्याच्या मदतीने तैवान चीनकडून येणाऱ्या मध्यम ते लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून स्वत:चे संरक्षण करू शकते.
- हे क्षेपणास्त्र ७० किलोमीटर उंचीवर क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना अडवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
- त्या तुलनेत टीएन किंग ३ व PAC-३ ही क्षेपणास्त्रे केवळ ४५ किलोमीटर ते ६० किलोमीटर उंची गाठू शकतात.
- राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, तैवान १२२ पॉड्सची ऑर्डर देणार आहे. २०२६ मध्ये ४६ पॉड्स उपलब्ध होतील आणि उर्वरित ७६ पॉड्स २०२७ मध्ये पुरवले जातील. संरक्षण सूत्रांनुसार, प्रत्येक पॉडमध्ये एक क्षेपणास्त्र असेल.

टिएन किंग ३ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय?
या क्षेपणास्त्राबद्दल विस्तृत माहिती उपलब्ध नाही. मुख्य म्हणजे टिएन किंग ३ चेही उत्पादन वाढवण्यात येणार आहे. टिएन किंग ३ ने २००१ मध्ये पहिले चाचणी उड्डाण केले. २००७ मध्ये हे क्षेपणास्त्र पहिल्यांदा सर्वांसमोर आणले गेले आणि २००८ मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. २०११ पर्यंत या क्षेपणास्त्राचे मूल्यांकन सुरू होते. टिएन किंग २ मध्ये एक सक्रिय रडार मार्गदर्शन प्रणाली (active radar guidance system) आणि मध्यमार्ग मार्गदर्शन प्रणाली (inertial midcourse guidance) आहे. क्षेपणास्त्राच्या पुढील भागात म्हणजेच नाकावर असणारे मायक्रोवेव्ह सिकर लक्ष्य गाठण्यास मदत करते. या क्षेपणास्त्राची श्रेणी आणि प्रवेग जास्त आहे. कारण- त्यात सॉलिड प्रोपेलेंट्स वापरण्यात आले आहे.
या क्षेपणास्त्राचा वेगही जास्त आहे. मुख्य म्हणजे अत्यंत कुशलतेने दिशा बदलणाऱ्या लक्ष्यांना हे क्षेपणास्त्र रोखू शकते. टिएन किंग ३ च्या उत्पादनावर ९०८.१ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च केला जाणार आहे. त्याचे लाँचर आधीच्या टिएन किंग २ प्रमाणे असेल, जे उभ्या दिशेने प्रक्षेपित केले जातात. त्याच्या ‘फेज्ड ॲरे रडार’मध्ये अनेक लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता, मित्र किंवा शत्रूची ओळख करण्याची क्षमता इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. टिएन किंग ३ चे लाँचर क्षेपणास्त्र त्याच्या मध्य-मार्ग टप्प्यात असताना त्याला लक्ष्याची माहिती पाठवू शकते. मात्र, असे असले तरीही या क्षेपणास्त्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पाडण्याची क्षमता नाही.
तैवान आपला संरक्षण कार्यक्रम का वाढवतेय?
एका वेगळ्या अहवालात अशी माहिती आहे की, राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने (MND) सीएम-३३ क्लाऊडेड लेपर्ड (CM-33 Clouded Leopard) प्लॅटफॉर्मवर आधारित एका नवीन आठ चाकी चिलखती लढाऊ वाहनासाठीदेखील योजना आखल्या आहेत. ‘तैपेई टाइम्स’ने नमूद केल्यानुसार, १०५ मिलिमीटरच्या रायफल्ड तोफेने सुसज्ज असलेल्या या नवीन वाहनाने २०२३ मध्ये आपली क्षमता चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. संशोधन, विकास आणि चाचण्या २०२६ च्या जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर २०३० मध्ये ५०० युनिट्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची योजना आहे.
या प्रकल्पात मुख्य लढाऊ वाहने आणि त्याच्या प्रकारांसाठी २० वेगवेगळ्या प्रणालींचा समावेश आहे. या वाहनांमध्ये १०५ मिलिमीटर तोफेव्यतिरिक्त, चिलखत भेदक, फिन-स्टेबलाईज, अँटी-पर्सनेल गोळे डागता येणेदेखील शक्य आहे. हे वाहन ७.६२ मिलिमीटर मशीनगन आणि रिमोट वेपन स्टेशनमध्ये बसवलेल्या १२.७ मिलिमीटरच्या हेवी मशीनगननेदेखील सुसज्ज असणार आहे.
तैवानच्या या घोषणेमागील कारण काय?
तैवानला चीनकडून वाढत्या क्षेपणास्त्र धोक्यांचा सामना करावा लागत आहे. चीनने सातत्याने आपली हवाई आणि क्षेपणास्त्र क्षमता वाढवली आहे. त्यामुळे तैवानच्या हवाई संरक्षणावर गंभीर ताण येत आहे. तैवाननेदेखील परदेशातून अमेरिकेच्या पॅट्रियट (Patriot) प्रणालीसारख्या प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली घेतल्या आहेत. तसेच, त्यांनी स्वदेशी ‘टिएन किंग’ (Tien Kung) किंवा ‘स्काय बो’क्षेपणास्त्रे विकसित करण्यावरदेखील लक्ष केंद्रित केले आहे. तैवान सामुद्रधुनीमुळे भौगोलिक फायदा असल्याने तैवानची निश्चित जमीन ते हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे चीनच्या अचूक हवाई-ते-जमीन शस्त्रास्त्रांसाठी आणि अँटी-रेडिएशन क्षेपणास्त्रांसाठी असुरक्षित आहेत. तैवानची रणनीती केवळ क्षेपणास्त्रांची संख्या वाढवणे नसून, त्यांच्या प्रणालींची टिकाऊपणा आणि गतिशीलता सुनिश्चित करणेदेखील आहे. थोडक्यात, चीनच्या क्षेपणास्त्र वर्चस्वाला तोंड देण्यासाठी तैवान आधुनिकीकरण, टिकाऊपणा आदींवर भर देत आहे.
तैवानला अधिकृतपणे रिपब्लिक ऑफ चायना (आरओसी) म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षांपासून चीन तैवानवर आपला प्रदेश म्हणून दावा करत आहे. हा तणाव १९४९ मध्ये चिनी गृहयुद्ध (Chinese Civil War) संपल्यानंतर सुरू झाला. तेव्हा माओ त्से-तुंग (Mao Zedong) यांच्या नेतृत्वाखालील चिनी कम्युनिस्ट पार्टीने मुख्य भूभाग ताब्यात घेतल्यानंतर आरओसी सरकार तैवानमध्ये गेले.
आर्थिक आणि लष्करी दबावानंतरही तैवान वास्तविकपणे स्वतंत्र आहे. त्यांना त्यांच्या सार्वभौमत्वासाठी देशांतर्गत मजबूत पाठिंबा आहे. राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासाठी आणि जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी त्यांनी लष्करी हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.