अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कट्टर समर्थक आणि सल्लागार, अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क हे त्यांच्या बेदरकार पवित्र्याबद्दल ओळखले जातात. अमेरिकेच्या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावल्यानंतर आता त्यांना युरोपचे राजकारणही स्वतःला हवे तसे वळवण्याची इच्छा आहे. परिणाम? युरोपमध्ये मस्क यांची ड्रीम कार टेस्लाच्या विक्रीत झालेली लक्षणीय घट.

टेस्लाची निराशाजनक कामगिरी

‘द गार्डियन’ने टेस्लाच्या कामगिरीविषयी दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात युरोपमध्ये टेस्ला कारच्या विक्रीमध्ये लक्षणीय, जवळपास निम्मी, घट झाली. ‘युरोपीयन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (एसीईए) जाहीर केलेल्या डेटानुसार, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात युरोपमध्ये एकूण १८,१६१ टेस्ला कार विकल्या गेल्या होत्या. ही घट ४५ टक्के इतकी आहे. एकूण बाजारपेठेत टेस्लाचा हिस्सा १.८ टक्क्यांवरून कमी होऊन १ टक्क्यावर गेला आहे. जर्मनीमध्ये गेल्या महिन्यात टेस्लाच्या १,२७७ नवीन कारची विक्री झाली. ‘ब्लूमबर्ग’च्या माहितीनुसार, जुलै २०२१नंतर हा टेस्लाच्या एका महिन्यातील विक्रीचा नीचांक आहे. फ्रान्समध्ये तर हे प्रमाण ६३ टक्के इतके आहे. तिथे टेस्लाची ऑगस्ट २०२२नंतरची ही सर्वात वाईट कामगिरी आहे.

मस्क यांचे अतिउजवे धोरण मारक?

टेस्ला हा विद्युत कारमध्ये आघाडीचा ब्रँड आहे. विशेषतः त्यांच्या विनाचालक कार जगभरात कुतूहल आणि आकर्षणाचा विषय ठरतो. तरीही गाड्यांची विक्री झपाट्याने कमी का होत आहे असा प्रश्न आहे. इलॉन मस्क यांचा जागतिक, विशेषतः अमेरिका आणि युरोपमधील राजकारणात नको तितका हस्तक्षेप त्यांची लोकप्रियता कमी व्हायला कारणीभूत होत आहे. जगभरातील विविध प्रकल्पांना मदत करणारा अमेरिकेचा यूएसएड हा उपक्रम बंद करणे, सरकारी कर्मचाऱ्यांची कपात, अधिकार नसतानाही महत्त्वाच्या आणि गोपनीय फाइल पाहण्यासाठी संबंधितांवर दबाव टाकणे यासारख्या निर्णयांनी अमेरिकेत त्यांच्याविषयी नाराजी वाढत आहे. दुसरीकडे त्यांना अटलांटिकच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या युरोपमध्येही दादागिरी वाढवायची आहे.

जर्मनीमधील अतिउजव्या पक्षाला पाठिंबा

जर्मनीमध्ये नुकत्याच झालेल्या पार्लमेंटच्या निवडणुकीत त्यांनी नाझीवादी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाला उघडपणे पाठिंबा दिला. एएफडी हा पक्ष जर्मनीच्या भविष्यासाठी सर्वात उत्तम असल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी जानेवारीमध्ये दिले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच या पक्षाला निवडणुकीत लक्षणीय यश मिळाल्यानंतर मस्क यांनी पक्षाच्या नेत्या अॅलिस विडेल  यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या उद्योगांमुळे त्यांच्याविषयी जर्मनीमध्ये नाराजी कमालीची वाढली आहे.

ब्रिटनमधील मजूर पक्षावर निराधार आरोप

मस्क यांनी ब्रिटनमधील सत्ताधारी मजूर पक्षालाही लक्ष्य केले. ब्रिटनमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे प्रस्थ वाढत असून त्याला पंतप्रधान कीर स्टार्मर आणि इतर ज्येष्ठ राजकीय नेते जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. हे नेते या टोळ्यांना अभय देत असल्याचा गंभीर आरोप करताना त्याच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा सादर करण्याची गरज त्यांना वाटली नाही. आपल्या मालकीच्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून अतिउजव्या पक्षांच्या धोरणांची भलामण करायची आणि डाव्या विचारांच्या राजकीय नेत्यांची निंदानालस्ती करायची असा बेजबाबदार उद्योग त्यांनी सुरू ठेवले. मस्क यांची वाढती लुडबूड पाहून स्टार्मर यांच्याबरोबरच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ, तसेच जर्मनी आणि नॉर्वेच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये त्यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

बाजारातील स्थिती आणि स्पर्धा

ब्रिटनमध्ये टेस्लाची विक्री चीनच्या ‘बीवायडी’ या स्पर्धक कारपेक्षा कमी झाली. त्या देशात विद्युत कारची बाजारपेठ जानेवारीत ४२ टक्क्यांनी वाढली असताना टेस्लाची विक्री मात्र आठ टक्क्यांनी घसरली. दुसरीकडे विद्युत कारच्या मागणीत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘एसीईए’च्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये युरोपमध्ये एकूण एक लाख २४ हजार ३४१ नवीन विद्युत कार विकल्या गेल्या. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही विक्री ३४ टक्के जास्त आहे. त्यामुळे एकूण कार बाजारपेठेत विद्युत कारचा हिस्सा १५ टक्के इतका झाला. जर्मनी, बेल्जियम आणि नेदरलँड्स या तीन देशांमध्ये सर्वाधिक विद्युत कार खपतात. त्या देशांमध्ये जानेवारीत ही विक्री अनुक्रमे ५३.५ टक्के, ३७.२ टक्के आणि २८.२ टक्क्यांनी वाढली. याचाच अर्थ विद्युत वाहनांच्या विक्रीत घट झाल्यामुळे मस्क यांना फटका बसलेला नाही. तर त्यांच्या अतिउजव्या धोरणाचा परिणाम टेस्लाच्या विक्रीवर झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nima.patil@expressindia.com