Calcutta killings of 1946: विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द बंगाल फाईल्स’ या चित्रपटामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. १६ ऑगस्ट रोजी कोलकात्यात होणारा ट्रेलर लाँच अचानक रद्द करण्यात आला. तसेच, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून कायदेशीर नोटीसदेखील बजावण्यात आली आहे. या चित्रपटाचे कथानक १९४६ मधील ग्रेट कलकत्ता किलिंग्स आणि नोआखली दंगलींवर आधारित आहे. त्यामुळे आता गोपाल पाठा हे नाव वारंवार चर्चेत येते आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्या काळात नेमके काय घडले होते आणि त्या घटनेत गोपाल पाठाची भूमिका काय होती? याचाच घेतलेला हा आढावा.
विवेक अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १६ ऑगस्ट रोजी कोलकात्यात त्याचा ट्रेलर लाँच अचानक रद्द करण्यात आला. अग्निहोत्री यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीसही मिळाली आहे. अग्निहोत्री यांनी यापूर्वी ‘द ताश्कंद फाईल्स’ आणि ‘द काश्मीर फाईल्स’ हे चित्रपट दिग्दर्शित केले होते. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. ‘द बंगाल फाईल्स’ हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
१९४६ मध्ये कोलकात्यात नेमकं काय घडलं?
अग्निहोत्री यांचा चित्रपट १९४६ मधील ग्रेट कलकत्ता किलिंग्स आणि नोआखली दंगलींवर आधारित आहे. या दंगली स्वातंत्र्यपूर्व काळातील अत्यंत भीषण आणि काळाकुट्ट अध्याय मानल्या जातात. या दंगली तब्बल चार दिवस सुरू होत्या, त्यात सुमारे १० हजार नागरिक मारले गेले. या दंगलीच्या मागे मूळ कारण ‘डायरेक्ट ॲक्शन डे’ची घोषणा मानली जाते. हा दिवस मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगने जाहीर केला होता. यामागे त्यांचा हेतू ब्रिटिश सरकारवर दबाव आणून मुस्लिमांसाठी स्वतंत्र मातृभूमी निर्माण करण्याचा होता. या कालखंडात जीनांची मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील संबंध पूर्णपणे तुटले होते.
बंगालमध्ये नक्की काय घडत होतं?
त्यामुळे त्या काळातील बंगालमधील राजकीय परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य होते, मात्र त्यापैकी बहुसंख्य पूर्व बंगालमध्ये राहात होते. याच भागाला आज आपण बांगलादेश म्हणून ओळखतो. कोलकाता मात्र प्रामुख्याने हिंदूबहुल होते. २० व्या शतकात बंगालमध्ये वारंवार धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडत होत्या. विशेष म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना बंगालमध्ये (ढाक्यात) झाली होती.
हुसेन सुहरावर्दी हे बंगाली मुस्लिम नेते आणि मुस्लिम लीगमधील जिनांचे प्रतिस्पर्धी होते. त्या काळी ते बंगालचे मुख्यमंत्री होते. या हत्याकांडाला अनेकजण सुहरावर्दी यांनाच जबाबदार धरतात. त्यांनी दिलेली काही भाषणे हिंसाचाराला दुजोरा देणारी होती, असे म्हटले जाते. इतकेच नव्हे तर पोलिसांना नियंत्रणात ठेवले जाईल, असेही त्यांनी भाषणात सांगितल्याचा उल्लेख आढळतो. १६ ऑगस्ट १९४६ रोजी कोलकात्याच्या रस्त्यांवर हिंसक जमाव उतरला आणि परिस्थिती झपाट्याने हाताबाहेर गेली. शहरात लूटमार आणि सामूहिक हत्याकांड सुरू झाले. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि अशा वेळी गोपाल पाठा हे नाव चर्चेत आले.
गोपाल पाठा कोण होते?
गोपाल पाठाचा जन्म १९१३ साली कोलकात्यात गोपालचंद्र मुखर्जी या नावाने झाला. ‘पाठा’ म्हणजे बंगाली भाषेत ‘बोकड’. कारण, त्याच्या कुटुंबाचा कॉलेज स्ट्रीटवर मटण विक्रीचा (खाटिक खाना) व्यवसाय होता. दंगली सुरू झाल्यानंतर त्याची भूमिका भारतीय इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व ठरली. त्याने हिंदू रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असे काही जण मानतात. तर काही जण त्याला गुन्हेगार आणि गँगलीडर समजतात. त्याच्या गटात सुमारे ५०० ते ८०० माणसं होती. १८ ऑगस्ट रोजी पाठाने कोलकात्यातील मुस्लिम जमावाविरुद्ध हिंदू प्रतिकार संघटित केल्याचा उल्लेख मिळतो.

…तर दहा खून करा
१९९७ साली पत्रकार अँड्र्यू व्हाईटहेड यांच्याशी बोलताना पाठाने त्या काळातील घटनांची आठवण सांगितली होती. तो म्हणाला, “देशासाठी तो फारच गंभीर काळ होता. जर हा सगळा प्रदेश पाकिस्तान झाला, तर अधिक छळ आणि दडपशाही निर्माण होईल, असं आम्हाला वाटलं. म्हणून मी माझ्या सगळ्या मुलांना (माणसांना) बोलावलं आणि सांगितलं की, आता प्रत्युत्तर द्यायची वेळ आली आहे. जर तुम्हाला कळलं की एक खून झाला आहे, तर तुम्ही दहा खून करा. हाच मी माझ्या मुलांना दिलेला आदेश होता. हे मूलत: कर्तव्य होतं, अडचणीत असलेल्यांना मदत करणे माझ्यावर बंधनकारक होतं.”
ग्रेट कलकत्ता किलिंग्सच्या वेळी गांधीजी कुठे होते?
कोलकाता हत्याकांडाचे साक्षीदार अतिशय भीषण दृश्यांचे वर्णन करतात. ज्या ठिकाणी मृतदेह एकमेकांवर तीन-चार फूट उंच रचलेले होते आणि त्यांतून काही ठिकाणी मेंदू बाहेर आले होते तर सर्वत्र रक्त बाहेर येत होते. पाठाच्या कथेत एक उपसंहार सांगितला जातो. दंगलीनंतर एक वर्षाने गांधीजी कोलकात्यात आले. दंगलीनंतर शहर अजूनही उद्ध्वस्त अवस्थेत होते. पत्रकारांच्या मते, अनेक लोक तलवारी, कट्यारी आणि बंदुका घेऊन आले आणि त्या गांधीजींच्या पायाशी ठेवून दिल्या. लॉर्ड माउंटबॅटन यांनी याला “कोलकात्याचा चमत्कार” असे संबोधले होते.
मात्र, पाठात्याने प्रभावित झाला नाही. त्याने आपली शस्त्रे समर्पण करण्यास नकार दिला. तो म्हणाला की, या शस्त्रांनी त्याने आपल्या परिसरातील स्त्रिया आणि लोकांचे रक्षण केले होते. “ग्रेट कलकत्ता किलिंग्सच्या वेळी गांधीजी कुठे होते?” असा सवालही त्याने केला.
अग्निहोत्रींनी स्वातंत्र्यसैनिकाच्या वारशाला कलंक लावला
गोपाल पाठाचे नातू शंतनु मुखर्जी यांनी या चित्रपटाविरोधात तीव्र आक्षेप घेतला आहे. शंतनु यांनी अग्निहोत्रींना कायदेशीर नोटीस पाठवली असून, आपल्या आजोबांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते आणि दिग्दर्शकाने त्यांच्या विचारसरणीला कमी लेखत, त्यांच्याविरुद्ध अवमानकारक भाषा वापरली आहे. “माझे आजोबा धाडसी होते. त्यांनी बंगाल मधील लोकांच्या रक्षणासाठी शस्त्र उचलले. मात्र दिग्दर्शकाने आमची परवानगी किंवा सल्लामसलत न करता त्यांच्याविषयी अपमानजनक शब्द वापरले आहेत,” असे शंतनु म्हणाले. त्यांनी आरोप केला की, अग्निहोत्रींनी त्यांच्या आजोबांना ‘कसाई’ म्हटले आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांच्या वारशाला कलंक लावला.
शंतनु यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, दंगलीदरम्यान त्यांच्या आजोबांनी आपल्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबांचेही संरक्षण केले होते. शंतनुंच्या बहिणीने दावा केला की, पाठाने आपल्या घराच्या टेरेसवर अनेक मुस्लिम कुटुंबांना आसरा दिला होता. ज्यात त्यांच्याकडील ‘रफीक चाचा’ नावाच्या रिक्षाचालकाचे नातेवाईकही होते.

शंतनु यांनी हेही स्पष्ट केले की, ‘पाठा’ या नावाचा अर्थ चुकीचा लावला जात आहे. स्थानिक बिहारी लोकांनी त्यांच्या आजोबांच्या शौर्यामुळे त्यांना ‘गोपाल पाठा’ असे म्हणायला सुरुवात केली होती आणि याचा बोकडांशी काहीही संबंध नव्हता. शंतनुंचा आरोप आहे की, हा चित्रपट अपुर्या संशोधनावर आधारित असून तो त्यांच्या आजोबांच्या प्रतिष्ठेला ‘नुकसान’ पोहोचवणारा आहे.
अग्निहोत्रींचे प्रतिउत्तर
अग्निहोत्रींनी प्रत्युत्तर देताना दावा केला की, शंतनु “टीएमसीबरोबर काम करतात. त्यामुळे त्यांना करावंच लागतंय तेच ते करत आहेत.” अग्निहोत्री म्हणाले, “ते नायक होते. मी त्यांना चित्रपटात नायक म्हणूनच दाखवले आहे. बीबीसीला दिलेल्या त्यांच्या मुलाखतीतील एक छोटा भाग मी जशाच्या तसा वापरला आहे. मला माहीत आहे की बंगालमधील लोक त्यांना नायक मानतात आणि मी त्यांची प्रतिमा तशीच दाखवली आहे.” मुखर्जी यांचे निधन २००५ मध्ये ९२ व्या वर्षी झाले. २०१५ साली कोलकात्यातील एका अति-उजव्या गटाने ग्रेट कलकत्ता किलिंग्सच्या स्मरणार्थ मोर्चा काढला होता आणि त्यात मुखर्जींच्या भूमिकेचा गौरव केला होता. या मोर्चादरम्यान मोठमोठ्या फलकांवर त्यांना “कोलकात्याचा रक्षक” असे संबोधण्यात आले, तसेच त्यांच्या नावापूर्वी “हिंदू वीर” ही उपाधीही लावण्यात आली.
आता द बंगाल फाईल्स प्रदर्शित होण्याच्या तयारीत असताना, मुखर्जींच्या भारतीय इतिहासातील भूमिकेवरचा वाद इतक्या लवकर थांबण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.