Great Calcutta Killing 16 August 1946: भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या घटनेस यंदा ७८ वर्ष पूर्ण झाली. परंतु, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक वर्ष आधी १६ ऑगस्ट १९४६ रोजी धार्मिकतेच्या नावाखाली प्रचंड हिंसाचार झाला होता. त्या दिवशी मुस्लिम लीग आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांनी ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’ असा नारा दिला, त्यावेळेस मोठ्या संख्येने मुस्लिम कलकत्याच्या रस्त्यावर जमा झाले आणि काही तासांच्या आतच हजारो हिंदूंचे हत्याकांड घडवून आणण्यात आले. हे हत्याकांड एवढे भयावह होते की, ‘‘द ग्रेट कलकत्ता किलिंग’ अशी त्याची इतिहासात नोंद झाली.

अधिक वाचा: Bangladesh: बांगलादेशातील ‘ढाकेश्वरी’ला मुस्लीम विद्यार्थ्यांचा पहारा; काय सांगतो या हिंदू मंदिराचा इतिहास?

हत्याकांडाची पार्श्वभूमी

१९४६ साली भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. ब्रिटिशांकडून सत्तांतराची प्रक्रिया सुरु झाली झाली होती. याच सगळ्या प्रक्रियेसाठी ब्रिटिश पंतप्रधान क्लीमेंट एटली यांनी तीन सदस्यीय दल म्हणजेच ‘कॅबिनेट मिशन’ भारतात पाठवून दिले होते. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट भारतीयांना सत्ता हस्तांतरित करण्याच्या योजनेला मूर्त स्वरूप देणे हे होते. १६ मे १९४६ रोजी या कॅबिनेट मिशनने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. या चर्चेअंती असे ठरवण्यात आले की, भारतीय गणराज्याची स्थापना करण्यात येईल आणि शेवटी सत्ता हस्तांतरित केली जाईल. परंतु मोहम्मद अली जिन्ना यांनी वायव्य आणि पूर्व भारताच्या सीमेवर स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि संविधान सभेवर बहिष्कार टाकला. यानंतर जिन्ना यांनी १९४६ च्या जुलै महिन्यात आपल्या मुंबईच्या घरात एक पत्रकार परिषद घेतली. मुस्लिम लीग वेगळ्या पाकिस्तानसाठी संघर्षाच्या तयारीत आहे. मुस्लिमांना वेगळं पाकिस्तान दिलं नाही तर ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’ डेची पूर्ती केली जाईल, असे सांगत शेवटी जिन्ना यांनी १६ ऑगस्ट हा दिवस डायरेक्ट अ‍ॅक्शन डे असेल, अशी घोषणा केली.

१६ ऑगस्ट १९४६, नेमकं काय घडलं?

१६ ऑगस्ट पर्यन्त कोणालाही याची कल्पना नव्हती की मुस्लिम लीगचा डायरेक्ट एक्शन डे नक्की काय आहे. मूलतः त्यांनी संपूर्ण देशाला या दिवसाची धमकी दिली होती, तत्कालीन बंगालमध्ये त्यांचेच वर्चस्व होते. त्यावेळी सत्तेत असलेल्या पंतप्रधान हसन शहीद सुहरावर्दीला बंगालमधील हिंदूंच्या नरसंहाराचा कर्ता मानले जाते. १६ ऑगस्ट १९४६ या दिवशी सकाळपासून वातावरण सामान्यच होते. दुपार होईपर्यंत काही ठिकाणी तोडफोड, दगडफेकीच्या घटनांच्या बातम्या येऊ लागल्या. असं असलं तरी या घटना हिंदू नरसंहारात बदलतील याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. मात्र काही वेळातच कलकत्ता आणि आजूबाजूच्या परिसरात मुस्लिम गोळा होऊ लागले. नमाजाची वेळ होती. परंतु नेहमीपेक्षा यादिवशी जमा झालेल्या मुस्लिमांची संख्या प्रचंड होती. बहुतांश लोकांच्या हातात रॉड आणि लाठ्या-काठ्या होत्या. या बहुसंख्य लोकांसमोर ख्वाजा नजीमुद्दीन आणि सुहरावर्दी यांचं भाषण झालं.

पाच लाखांचा जमाव

या दिवसाची नोंद असणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की किती लोक जमा झाले होते याची संख्या वेगवेगळी आहे. बहुतांश अहवालात ही संख्या पाच लाखांच्या आसपास दिली आहे. बाहेरून लोकांना बोलावण्यात आले होते असे काही अहवालांत म्हटले आहे. त्यानंतर प्रत्यक्ष दंगल सुरु झाली. राजा बाजार, केला बागान, कॉलेज स्ट्रीट, हॅरिसन रोड, बर्राबाजार सारख्या भागात घरं, दुकान जाळण्यात आली. रात्रीपर्यंत अनेक भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला. परिस्थिती सामान्य होत आहे, असे वाटत असतानाच दुसऱ्या दिवशीही रक्ताच्या नद्या वाहिल्या. हिंदूंना वेचून मारण्यात आलं, तर हिंदू स्त्रियांच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगण्यात आली. पूर्व -बंगालच्या नौखाली भागात भीषण नरसंहार झाला. जिथे सैन्य होते त्याभागातील स्थिती नियंत्रणाखाली होती, परंतु ज्या भागात सैन्य नव्हते तिथली परिस्थिती भीषण होती.

अधिक वाचा: Bangladesh 1971: चार लाख महिलांवर बलात्कार, ३० लाख मृत्यू; बांगलादेश पुन्हा त्याच वाटेवर आहे का? काय सांगतो इतिहास?

हे मृत्यूचं तांडव २० ऑगस्ट पर्यन्त चाललं. कलकत्त्यात ७२ तासात ६००० हिंदू मारले गेले, २० हजारपेक्षा अधिक लोक जखमी होते. अनेकांनी कलकत्ता सोडलं. याबद्दल फिलिप टैलबॉट यांनी इन्स्टीट्यूट ऑफ करंट वर्ल्ड अफेयर्सला पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं की, “प्रांतीय सरकारने मृतांचा आकडा ७५० सांगितला आहे, तर लष्कराकडून हा आकडा ७ ते १० हजार असा सांगण्यात येत आहे. सध्या तरी ३,५०० मृतदेह गोळा करण्यात आले आहेत. पण हुगळी नदीत किती जणांना फेकलं, शहरातील तुंबलेल्या नाल्यांमध्ये किती जण गुदमरून मेले हे कोणालाही माहीत नाही. शिवाय जाळपोळीच्या घटनांमध्ये किती मेले आणि कितीजणांचे त्यांच्या नातेवाईकांनी मूकपणे अंत्यसंस्कार केले हेही माहीत नाही. त्यामुळे आम्ही एक सामान्य अंदाज बांधला आहे, त्यानुसार मृतांची संख्या चार हजार पेक्षाअधिक होती आणि जखमींची संख्या सुमारे ११ हजार होती.” तथागत रॉय यांच्या ‘My People, Uprooted: A Saga of the Hindus of Eastern Bengal’ या पुस्तकात या झालेल्या दंगलीचे सविस्तर विश्लेषण केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच १६ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या हिंसाचाराची दहशत पुढील काही काळ सुरूच राहिली ज्याचा परिणाम नंतर भारत-पाक फाळणीत झाला!