scorecardresearch

विश्लेषण : बुरशी, बेडूक आणि मलेरियाचा संबंध काय?

हे कदाचित कोणालाही खरे वाटणार नाही पण बुरशी, बेडूक आणि मलेरिया या तीन गोष्टींचा संबंध आहे.

विश्लेषण : बुरशी, बेडूक आणि मलेरियाचा संबंध काय?
सुमारे ४०० प्रजाती धोक्यात आल्या आणि त्यांची ९० टक्के संख्या धोक्यात आली. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य – रॉयटर्स)

-भक्ती बिसुरे

आपल्या पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी काही ना काही संबंध असतो, हे आपण जाणतोच. साधे अन्न साखळीचे उदाहरण घेतले तरी मधमाशीसारखा डोळ्यांना चिमुकला दिसणारा एखादा जीव निसर्गाच्या चक्राचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत असतो. तसाच काहीसा संबंध बुरशी, बेडूक आणि मलेरिया या तीन गोष्टींचा आहे, हे कदाचित कोणालाही खरे वाटणार नाही. मात्र, बुरशी या प्रकारामुळे बेडकांचा धोक्यात आलेला अधिवास आणि माणसाचा जीव घेणाऱ्या मलेरिया या आजाराचा परस्पर संबंध असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्या संशोधनाबाबत हे विश्लेषण.

संशोधन काय?

अमेरिकेतील मेरिलँड कॉलेज पार्क युनिव्हर्सिटीमध्ये कॅरेन लिप्स या पर्यावरण शास्त्रज्ञ आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. अमेरिकेतील संशोधनाअंती त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार बुरशीने बेडूक आणि उभयचर प्राण्यांच्या प्रजाती नष्ट करण्यास हातभार लावला आहे. त्याचा थेट परिणाम कीटकांची संख्या वाढण्यावर झाला आणि त्यामुळेच कीटकजन्य आजारांचे संक्रमण मानवामध्ये होण्याचा धोकाही वाढला. बेट्राकोकिट्रियम डेंड्रोबाटायडिस (बीडी) या रोगकारक बुरशी प्रकारामुळे बेडूक आणि उभयचर प्राण्यांची संख्या कमी कमी होत गेली. त्याचा परिणाम म्हणून बेडूक आणि उभयचर प्राण्यांचे अन्न असलेल्या कीटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. बीडी ही बुरशी मूळची आशिया खंडातील असून त्या बुरशीमुळे पर्यावरणाला आणि पर्यायाने मानवी जीवनाला असलेला धोका स्पष्ट होईपर्यंत बराच काळ निघून गेला. मधल्या काळात अंदाजे किमान ९० उभयचर प्राण्यांच्या प्रजाती नामशेष झाल्या. सुमारे ४०० प्रजाती धोक्यात आल्या आणि त्यांची ९० टक्के संख्या धोक्यात आली. थोडक्यात सुमारे ६ टक्के उभयचरांचा जीव धोक्यात आला. त्यातून जैवविविधता तर धोक्यात आलीच, मात्र रोगराईचे संकटही गंभीर झाले. कोस्टारिका आणि पनामा या भागांतील घटलेल्या बेडूक आणि उभयचर प्राण्यांच्या संख्येमुळे तेथील मलेरियाच्या संख्येत झालेल्या वाढीबाबत कॅरेन लिप्स आणि इतर काही शास्त्रज्ञांचे संशोधन हे एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे संशोधन म्हणजे धोक्याची घंटा?

वायर्ड डॉट कॉम या अमेरिकेतील एका वृत्तमाध्यमाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्या वृत्तात मिशिगन विद्यापीठातील पर्यावरण आणि उत्क्रांतीतज्ज्ञ जॉन वेंडरमीर म्हणतात, की जैवविविधता सुंदर आणि अद्भुत आहे. तिचा नाश होत आहे, हे गंभीर आहे. मात्र, जैवविविधतेचे नुकसान आणि मानवाचे आयुष्य, विशेषत: आरोग्य यांचा परस्पर संबंध या संशोधनाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे. १९८० ते २००० या कालावधीत बीडी या बुरशी प्रकाराने अमेरिकेतून बेडूक आणि उभयचरांना नामशेष केले, मात्र त्याचे मानवी आरोग्यावरील परिणाम हे अलीकडेच उजेडात येऊ लागले आहेत. पनामा आणि कोस्टारिकातील जैववैविध्य कमी होण्याचा आणि तेथील साथरोगांचा ‘डेटा’ तुलनात्मक अभ्यासासाठी तपासला असता बुरशीमुळे बेडूक आणि उभयचरांच्या संख्येवर झालेला परिणाम आणि त्यातून वाढलेली मलेरियासारखी साथ यांचा परस्पर संबंध उलगडणे शक्य असल्याचे अमेरिकेतील तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, ज्या प्रमाणात अमेरिकेत बीडी बुरशीचा प्रसार होत गेला त्याच कालावधीत त्या त्या प्रदेशातील पूर्वी शून्य असलेल्या मलेरिया रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत गेल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट करणे शक्य असल्याचेही या संशोधनाच्या निमित्ताने चर्चिले जात आहे. पर्यावरण आणि मानवी आरोग्य आणि आयुष्य यांचा परस्पर संबंध, पर्यावरणाच्या ऱ्हासाचा मानवी आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम नागरिकांसमोर आणणे हेच जैवविविधतेच्या जपणुकीतील मानवी सहभाग वाढवण्याचा खात्रीशीर मार्ग असल्याचे कॅरेन लिप्स या संशोधनाच्या निमित्ताने स्पष्ट करतात.

जैववैविध्य नाशास कारणीभूत मानवही?

बीडी बुरशी हे जैवविविधतेच्या नाशास मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे कोस्टारिका आणि पनामातील उदाहरणांवरुन स्पष्ट होत असले तरी बुरशी किंवा तत्सम कारणे ही जैवविविधतेच्या ऱ्हासास कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट असल्याचे शास्त्रज्ञ नमूद करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारवृद्धीमुळे वाढता मानवी हस्तक्षेप हेही यामागचे एक कारण असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. २०००मध्ये बुरशी नियंत्रणासाठी उपाययोजनांबाबत एक आंतरराष्ट्रीय परिषदही बोलवण्यात आली. त्यामध्ये काही निर्बंध निश्चित करण्यात आले. मात्र, असे निर्बंध पाळल्यानंतरही बुरशी प्रसाराचा वेग रोखणे शक्य न झाल्याचे एका दशकानंतर आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे वाढता व्यापार उदीम, त्यातून होणारा मानवी हस्तक्षेप, त्यातून धोक्यात आलेले जैववैविध्य आणि मानवाचे आरोग्य असे एक भीषण दुष्टचक्र मानवाला वेढून आहे आणि ते भेदण्याचे आव्हान मानवजातीसमोर असल्याचे या संशोधनामुळे अधोरेखित होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या