डायनॉसॉरप्रमाणे महाकाय असणाऱ्या ‘जायंट मोआ’ या न्यूझीलंडमधील नामशेष झालेल्या पक्ष्याला पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा पक्षी ६०० वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये नामशेष झाला. आता वूली मॅमथ, डायर वुल्फ, डोडो बदक यांप्रमाणेच मोआलाही जनुकीय तंत्रज्ञानातून पुनरुज्जीवित केले जात आहे. नेमके काय आहे हे संशोधन, जाणून घेऊ.
प्राणी-पक्ष्यांना पुन्हा जिवंत करणारे स्टार्टअप?
जायंट मोआ हा एके काळी न्यूझीलंडमध्ये वावरलेला पक्षी. तीन मीटर म्हणजे जवळपास १२ फुटांहून अधिक उंच असलेला हा महाकाय पक्षी कधी काळी पृथ्वीवरचा सर्वात उंच पक्षी समजला जात होता. नामशेष झालेल्या या पक्ष्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न एका अमेरिकन स्टार्टअपने सुरू केला आहे. ‘कोलोसल बायोसायन्सेस’ या टेक्सासमधील कंपनीने ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या प्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शक पीटर जॅक्सन यांच्याकडून १५ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे १२५ कोटी रुपयांचा निधी मिळवून या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. मोआ हाडांचा सर्वात मोठा खासगी संग्रह जॅक्सन यांच्या ताब्यात आहे.
या प्रकल्पासाठी कंपनीने न्यूझीलंडमधील कँटरबरी विद्यापीठातील न्गाई ताहू रिसर्च सेंटरशी भागीदारी केली आहे. पाच ते दहा वर्षांत हे पक्षी पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा कंपनीचा मानस आहे.
कसा होता हा पक्षी?
जायंट मोआ हा पक्षी १२ फुटांहून अधिक म्हणजे जवळपास एका मजल्याहून अधिक उंचीचा होता. पंख नसलेला हा पक्षी साधारण इमू पक्ष्यासारखा दिसे. त्याच्या महाकाय शरीरामुळे तो डायनॉसॉरसारखाही भासे. उंच मान असलेला हा पक्षी स्वतःच्या बचावासाठी पाय झाडी, म्हणजेच लाथ मारल्याप्रमाणे पायाने हल्ला करत असे. अधिक उंचीमुळे त्याचे पाय खूप मजबूत होते. सुमारे ६०० वर्षांपूर्वी हा पक्षी नामशेष झाला. त्यांच्या नामशेष होण्यामागे अत्याधिक शिकार आणि मानवी वस्तीमुळे अधिवास नष्ट होणे ही प्रमुख कारणे आहेत. उडता न येणारे हे महाकाय जीव सहज शिकार व्हायचे.
जायंट मोआचे पुनरुज्जीवन कसे केले जाणार?
या प्रकल्पात सुरुवातीला नऊ वेगवेगळ्या मोआ प्रजातींचा डीएनए गोळा करून त्याचा अभ्यास केला जाईल. यातून डायनॉरिस रोबस्टस (मूळ प्रजातीचे नाव) म्हणजेच जायंट मोआ हा त्याच्या जिवंत आणि नामशेष झालेल्या प्रजातींपेक्षा कसा वेगळा होता, हे समजण्यास मदत होईल. हा पक्ष्याशी जनुकीय दृष्ट्या सर्वात जवळच्या प्रजातींच्या डीएनएत सुधारणा करून पुन्हा निर्माण केले जातील. या पद्धतीला ‘डी-एक्स्टिंक्शन’ म्हणतात. मोआच्या नष्ट होण्याला फारसा कालावधी झाला नसल्यामुळे त्यांची हाडे, अंड्यांची कवचे आणि पिसेही उपलब्ध आहेत.
स्टार्ट अप कंपनीचे म्हणणे..
स्टार्ट अप कंपनी कोलोसलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेन लॅम यांनी म्हटले आहे की या प्रतीकात्मक पक्ष्याला परत आणण्याच्या प्रवासात भरपूर ज्ञान मिळणार आहे, आणि ते सर्वांसोबत वाटले जाईल. उदाहरणार्थ, सर्व मोआ प्रजातींच्या जनुकांचा अभ्यास केल्याने संवर्धन उपाययोजना आखण्यात आणि हवामान बदल व मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेवर होणारा परिणाम समजून घेण्यात उपयोग होईल.
स्टार्ट अप कंपनीचा इतिहास
एखादी नामशेष झालेली प्रजाती पुनरुज्जीवित करण्याची कोलोसल बायोसायन्सेस कंपनीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी कुत्र्यांची एक नामशेष झालेली प्रजाती पुन्हा जिवंत केली होती. ‘डायर वुल्फ’ नावाची ही कुत्र्यांची प्रजाती १२ हजार वर्षांपूर्वी नष्ट झाली होती. या कंपनीने ग्रे वुल्फ आणि नष्ट झालेल्या डायर वुल्फ यांच्या डीएनएचा संयोग करून ही नवी प्रजाती जन्माला घातली. या पिल्लांच्या १४ जीन्समध्ये २० अनुवांशिक बदल करून त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच त्यांचे शारीरिक गुणधर्म निर्माण करण्यात आले. हे कुत्रे सामान्य ग्रे वुल्फपेक्षा २० टक्के अधिक वजनदार आहेत. त्यांच्यात मोठे डोके, दाट पांढरा फर आणि मजबूत शरीरयष्टी हे डायर वुल्फचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दिसून येतात. याच प्रक्रियेद्वारे वुली मॅमथ, डोडो आणि थायलासिन (टास्मानियन टायगर) यांना देखील परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
पुनरुज्जीवन प्रक्रिया करावी का आणि ती करण्याची खरेच गरज आहे का असे प्रश्न विचारणारे तज्ज्ञ आहेत. ही प्रक्रिया पक्ष्यांच्या बाबतीत तितकी सोपी नाही, असे म्हणणारेही तज्ज्ञ आहेत. हार्वर्ड विद्यापीठातील पक्षीविज्ञानाचे प्राध्यापक स्कॉट एडवर्ड्स यांनी सीएनएनला सांगितले, की मोआसारख्या पक्ष्यांना परत आणण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची गरज डायर वुल्फपेक्षा वेगळी आहे. कारण पक्ष्यांचा विकास अंड्यात होतो. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक कठीण होते.” “ही कल्पना बौद्धिकदृष्ट्या रोचक असली तरी ती फारशी प्राधान्याची असायला नको. कारण सध्या न्यूझीलंड, हवाई आणि पॅसिफिक बेटांमध्ये शेकडो पक्षीप्रजाती संकटात आहेत, त्यांचे संवर्धन अधिक तातडीचे आहे,” असे मत कॅनडातील वेस्टर्न विद्यापीठाच्या एव्हीअन रिसर्च संस्थेचे सह-संस्थापक स्कॉट मॅकडगॉल-शॅकलटन यांनी व्यक्त केले.